आयुष्याच्या संध्या काळी दुर्देवानी साथीदार लवकर गेला तर आयुष्याचं वाळवंट होतं… अशा वेळी एकमेकांना सावली देणारे हात जवळ यावेत…आजच्या काळात मुला, मुलींना त्यांच्या स्वातंत्र्याच्या कक्षा हव्या असतात, आणि त्यात चूक नाही… अशा वेळी साथीदार नसणाऱ्या व्यक्तीचा कोंडमारा होतो… ज्या वयात माणुस अनेक विंवचनेतून मुक्त होतो त्यावेळी तो मनाच्या अधिक जवळ जातो, त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीही मनाला लागतात.. अशा वेळी सोबत असणं मानसिकरित्या गरजेचं असतं… मला एका मित्राने विचारले, सर्व वयात प्रेम एक सारखंच ना मी म्हणालो नाही… वया परत्वे प्रेमाच्या परीभाषा बदलतात… प्रेमात पडायला अमुक एक वय अवश्यक नसते हे खरेच आहे. मात्र ते प्रेम, त्या वेळच्या वयानुसार वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते.
किशोर वयातील अल्लड प्रेमाला उत्कट शारीरिक आकर्षण आणि कमालीच्या पझेसिव्हनेस चा गंध असतो. तो युवा अवस्थेत सुद्धा कायम राहतोच.पण हळू हळू लैंगिक आकर्षण कमी होवून मानसिक भावबंध तयार होतात.
आपल्या मुलाची आई, एक गोड गृहिणी,आपला संसार सांभाळणारी एक कर्तव्यदक्ष स्त्री अशी ओळख कमावलेली आपली पत्नी आता आपल्या प्रेमादराची हक्कदार होते. मग उतार वयात सहचरांचे प्रेम एकमेकांची काळजी घेण्यातून व्यक्त होते.अशा प्रकारे प्रत्येक प्रकारच्या प्रेमाच्या अविष्कराला वेगवेगळे वय असते आणि त्यावयालाही तसेच प्रेम जास्त भावते.
एकूण मानवी जीवनातून प्रेम वजा केले तर मागे उरते फक्त घटनांचे भेंडोळे…प्रेम ही मनाची भाषा आहे. तो मानसिक आधार आहे…आणि संध्या काळात तर ती अफाट महत्वाची गोष्ट आहे…!!
तुम्हाला वाटेल आजच का हा विषय मांडला… गोष्ट ताजी आहे… रात्री आम्ही ‘ स्थळ आलं धावून ‘ हे अत्यंत हलकंफुलकं आशयघन नाटक बघितलं.. त्यात फक्त तीन पात्र आहेत डॉ. गिरीश ओक, संजय मोने, पौर्णिमा तळवळकर या तिघांनी मानवी जीवनाच्या संध्या काळाची पापुद्रे अत्यंत सुरेखपणे उलघडून दाखविली आहेत.
एकटेपणाची सल, अंगावर धावून येणारा काळ, मुलांच्या स्वातंत्र्याची, त्यांच्या खाजगी आयुष्याची स्पेस असते ही समज आलेल्या काळात…सोबती असणं किती गरजेचं आहे.. या नाही म्हटलं तरी नाजूक विषयाला हात घालून लोकशिक्षण देणारं हे नाटक आहे… नक्कीच बघायला हवं… भावनेचे पदर हळवे असतात.. पण वर्तमान जगताना मनाला मलम लावणारे दुसरे मन सोबत हवे ही मानवी चेहरा असलेली गाज… गरजेची असते…!!
विषय भावला तो तुमच्या पर्यंत पोहचवावा म्हणून हात लिहता झाला…!!
@युवराज पाटील
( आणि हो डॉ. गिरीश ओक, पौर्णिमा तळवळकर यांना भेटून त्यांच्या कसदार कलेच कौतुकही आम्ही उभयतांनी केलं )
ता. क :- सध्या आमच्या जळगाव मुक्कामाच्या सांस्कृतिक भुकेच भरणपोषण आमचा लाडका मित्र हर्षल पाटील करतो आहे.. त्याच्या ऋणाईला शब्दात व्यक्त करण अवघड आहे.