सात्विक आहाराने आत्मोन्नती होते
डॉ. बालाजी तांबे यांचे मतः पहिल्या भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेचे चौथ्या सत्रात
पुणे, दिः १७ जुलै: “जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात की, स्वकष्टातून खाल्लेले अन्न हे शरीरासाठी योग्य आहे. अन्नाचा संबंध हा मन आणि मेंदू यांच्याशी आहे. पवित्र जागेत परमेश्वराच्या नामस्मरणाने भोजन केल्यास आत्मोन्नती होते. एकंदरीतच संतांनी आरोग्यासंदर्भात जे काही सांगितले त्याचे पालन केले तर सर्वांना सुख व शांती मिळेल.”असे विचार आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक डॉ. बालाजी तांबे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती, आळंदी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदे’ च्या तिसर्या दिवसाच्या ‘संत आणि आरोग्य व्यवस्थापन’ या विषयावरील चौथ्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे होते. यावेळी संत भगवानबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. अर्जुन महाराज लाड, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मुकुंद महाराज जाटदेवळेकर, ह.भ.प. बाळासाहेब बडवे, संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी आणि सुप्रसिद्ध डॉक्टर विश्वास सापत्नेकर हे सन्माननीय वक्ते म्हणून उपस्थित होते.
तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि डॉ. संजय उपाध्ये हे उपस्थित होते.
डॉ. बालाजी तांबे म्हणाले,“ समर्थ रामदास स्वामी यांनी अन्नाला पूर्ण ब्रह्म असे संबोधले आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोक म्हणून अन्नाचे सेवन केल्यास आपले जीवन निरोगी राहण्यास मदत होईल. त्यामुळे मेंदूत सकारात्मक भाव निर्माण होतात. तामसी अन्न हे सदैव रोग निर्मिती करतात. संतांनी उपवासाला ही महत्व दिले आहे. त्याचे कारण म्हणजे याकाळात आपली शक्ती परेश्वराचे चिंतन करण्यासाठी लावावे. यामुळे शरीरातील विषाण्य नष्ट होतात. संताच्या वाड्ःमयाचे अध्ययन केल्यास असे दिसते की मानवाचे आरोग्य उत्तम राहिल्यास हे जग नीट चालेल, सुव्यवस्था निर्माण होईल आणि मनुष्य हा मनुष्याचा आदर करेल. चांगले कर्म झाले तरच आत्मोन्नती होईल.”
डॉ. तात्याराव लहाने म्हणाले,“ उत्तम आरोग्यसाठी शुद्ध शाकाहार, व्यायाम, संतुष्टता, योग्य निद्रा, सहनशक्ती आणि चिंतामुक्त जीवन असावे. शुद्ध शाकाहार म्हणजे सात्विक अन्न जे शरीराबरोबरच मानसिक आरोग्य चांगले ठेवते. शारीरिक कष्ट व भरपूर व्यायाम केल्यानेही मन व शरीर मजबूत होते. जीवनात अल्प संतुष्टता असल्याने दुःख कधीही मिळणार नाही. तसेच शारीरिक झीज भरुन काढण्यासाठी ८ तास झोप घ्यावी. तसेच चिंतामुक्त जीवन हेच खरे जीवन आहे. या सर्व गोष्टींवर संतांनी आपल्या साहित्यात नोंद करून ठेवले आहे.”
डॉ. विश्वास सापत्नेकर म्हणाले,“ संतांनी मानव सेवेची शिकवण दिली आहे. याचे पालन करून पंढरपुरच्या वारीला जाणार्या वारकरण्याची वैद्यकीय सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. सेवेमुळे मनाला सदैव प्रसन्नता मिळते. आज वारीमुळेच संपूर्ण वर्षभर सत्कर्म करण्याचे बळ मिळते. सेवेसाठी एक ट्रस्ट तयार करून ५० डॉक्टरांची टीम केली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी वारकर्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभते.”
अर्जुन महाराज लाड म्हणाले,“ जे सर्व स्थितीत संतुष्ट असतात त्यांना संत असे म्हणतात. या संतांनीच मनाची जोपासना केली आहे. सर्व रोग हे मनातून निर्मित होते. वास्तविक शरीर रोगाचे भांडार आहे पण मन प्रसन्न असेल तर कोणत्याही रोगाचा परिणाम शरीरावर होणार नाही.तुकोबां ही म्हणतात मन प्रसन्न हे आरोग्याची गुरूकिल्ली आहे. औषधापेक्षा पथ्थे महत्वाचे आहे. संत साहित्यातून आरोग्य, विज्ञान, भौतिक व्यवहार आणि मानवाच्या जीवनातील सर्व घटकांचे विषय मांडून त्यांनी मार्गदर्शन केले आहे.”
मुकुंद महाराज जाटदेवळेकर म्हणाले,“ संत साहित्य आणि आरोग्य यांचा जवळीक संबध आहे. संतांनी केलेला उपदेश हा मानव कल्याणासाठीच असतो. त्यांची शिकवण ही संयमाची आहे. शरीर चांगले तर सर्व गोष्टींचा उपभोग घेऊ शकतो. त्यासाठी आरोग्य उत्तम ठेवावे. यासाठी कष्ट करून त्यावर संस्कार करावे”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड म्हणाले,“भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि प्राणीमात्रांचा विचार आमच्या संतांनी केला आहे. संतांनी मानवी कल्याणासाठी जे तत्त्वज्ञान सांगितले, त्याचे अनुकरण केल्यास संपूर्ण मानव जातीला सुख-समाधान आणि शांती मिळेल. त्याचबरोबर त्यांनी मनाच्या शास्त्राचे रहस्यही संपूर्ण मानवजातीसमोर मांडले.”
बाळासाहेब बडवे म्हणाले,“ शरीराच्या आरोग्याला खूप महत्व आहे. शरीर रोगी असेल तर त्यातील प्राण ज्योतीलापण वेदना होतात. त्यामुळे मानवाची ग्रहण शक्ती क्षीण झाली आहे. अशा वेळेस संतांच्या विचारांचे संस्कार धारण करावे. उत्तम आरोग्य म्हणजे मन व बुद्धि संयमित ठेवणे आहे. शरीराबरोबरच मनाचे आरोग्य ठेवण्यासाठी ध्यान साधना करावी.”
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी म्हणाले,“संत साहित्याचा अभ्यास करतांना दिसते की त्यांचा आयुर्वेदाशी मेळ आहे. वारीला जातांना विठ्ठलाचा जो गजर केल्या जातो, त्यामुळे शरीरात स्पंदने तयार होवून हद्याचे आजार कमी होतांना दिसतात. तसेच, शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी ही ओवी सांगून जाते की गर्भसंस्कार करतांना कसे संस्कार केले गेले पाहिजे. या वरून समजते की संत हे स्त्री रोग तज्ञ ही होते.”
डॉ. शैलश्री हरिदास यांनी स्वागतपर भाषण केले.
महेश महाराज नलावडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रोहिणी काळे यांनी आभार मानले.