संत साहित्य परिषद समारोप

0
390

 

संतांनी दिला लोकशाही, समरसता

आणि अंत्योदयाचा विचार 

डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे मतः 

एमआयटी डब्ल्यूपीयूत पहिल्या भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेचा समारोप

पुणे, दिः १८ जुलै: “संत साहित्य हे जीवनदृष्टी देणारे आहे. शिक्षणाचा उद्देश हा माणूस घडविणारा आहे. संतांनी लोकशाही, समरसता आणि अंत्योदय हे अत्यंत महत्वाचे विचार दिले आहेत.” असे मत इंडियन कॉन्सिल फॉर कल्चरल रिलेशन (आयसीसीआर)चे अध्यक्ष व खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती, आळंदी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या ‘भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदे’ च्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे ते म्हणून बोलत होते. एमआयटी डब्लयूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, खासदार स्वामी सुमेधानंद सरस्वती आणि खासदार महंत बालक नाथयोगी हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. ही परिषद एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे.

यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. बापूसाहेब मोरे, कार्याध्यक्ष ह.भ.प. श्री. रविदास महाराज शिरसाठ आणि समन्वयक डॉ. संजय उपाध्ये हे उपस्थित होते.

डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले,“संत ज्ञानेश्‍वरांनी ॥जो, जे वांछिले तो ते लाहो। प्राणिजात॥ हा विचार आजच्या काळात लोकशाही या अर्थात लाभतो. त्यानंतर समाजाची मनोभूमिका बनविण्यासाठी त्यांनी समरसतेचा विचार मांडला. पुढे चालून हाच विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. उपेक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी संतांनी अंतोदयाचा विचारही ठेवला. महात्मा गांधी यांनी ही अंतोदयाच्या विचाराला खूप महत्व दिले आहे. संताचे विचार हे आधुनिक काळाशी जोडले तर ते मनुष्य घडविणारे आहे.”

“संताच्या साहित्याची शिदोरी आणि विचार संचित हे समाजाला मिळालेली मोलाची देणगी आहे. संतांनी ग्रंथ, गीते, अभंग, काव्य लिहून त्यातून व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाचे चिंतन समाजासमोर मांडले आहे. संतांचे विचार आणि साहित्य यांचा आजच्या शिक्षण पद्धतीत अंतर्भाव झाल्यास संस्कारित पिढी निर्माण होवून बलशाली भारत घडेल.”

डॉ. विजय भटकर म्हणाले,“सत्याची जाणीव करुण देणे म्हणजे शिक्षण आहे. मी कोण आहे हा विचार आध्यात्मात आहे. त्यामुळेच सत्य जाणण्यासाठी शिक्षणात संत साहित्याचा समावेश करावा. या सृष्टीवर हजारो संस्कृती आल्या आणि कालानुरूप त्या लोप पावल्या. परंतू भारतीय संस्कृती टिकून ती नव अवतरित झाली आहे. त्यात संत साहित्याचा समावेश होतो. परंपरा व संस्कृतीचा विचार केल्याशिवाय शिक्षण कधीही पूर्ण होवू शकणार नाही. संत साहित्य शाश्‍वत आहे.”

स्वामी सुमेधानंद सरस्वती म्हणाले,“भारतीय शिक्षण पद्धतीला समृद्ध करण्यासाठी संत साहित्य अत्यंत महत्वाचे आहे. स्वामी विवेकांनद सांगतात की मनुष्य हा आईच्या मांडीत, वडिलांच्या सानिध्यात, घराच्या अंगणात, गावातील गल्ली बोळात आणि विद्यालयात परिपूर्ण तयार होतो, परंतू आजच्या काळात याचा अभाव दिसून येतो. मानवाचा मुख्य उद्देश म्हणजे आत्मिक सुख आहे आणि हे केवळ आध्यात्मातूनच मिळू शकते. आध्यात्माच्या माध्यमातून मन, बुद्धि आणि चित्ताला स्थिर केले जाते.”

प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“संत साहित्याच्या माध्यमातून मानवाने जीवन कसे जगावे व कसे जगू नये याचा संदेश दिला आहे. भारतीय संतांनी धर्मशास्त्र आणि आध्यात्मशास्त्राचे ज्ञान संपूर्ण मानवजातीच्या उन्नती व कल्याणासाठी उपलब्ध करून दिले आहे. ज्ञानेश्‍वर माऊलींनी हे विश्‍वची माझे घर हा संदेश जगाला दिला आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असा संदेश देणार्‍या संतांच्या विचारांचे अनुकरण केल्यावर आपले जीवन सुखमय होईल. दासबोध हा ग्रंथ व्यवस्थापनशास्त्राचा उत्तम ग्रंथ आहे. त्याचाही अभ्यास तरूण पिढीने करून जीवनाची वाटचाल करावी.”

रविदास महाराज शिरसाठ म्हणाले,“ मनुष्यातील दुर्गुण संपविण्यासाठी त्यावर संस्कार होणे गरजचे आहे. हे संस्कार बाल वयातच केल्यावर त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलेल. त्यामुळे पाठ्यक्रमामध्ये संतांच्या साहित्याचा समावेशक करावा.”

प्रास्ताविकात बापूसाहेब मोरे म्हणाले, तळागळापासून उच्च शिक्षणापर्यंत संतांचे विचार पोहोचविण्यासाठी ही परिषद महत्वाची होती. तसेच खासदार महंत बाल नाथयोगी यांनी समाजसेवा हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी प्रकृतीचा आदर करुन ईश्‍वराने जे कार्य आपल्याला दिले आहे ते पूर्ण करावे. आजच्या युगात मानवाला संत साहित्यांच्या विचारांनी संस्कारित बनविले पाहिजे असे सांगितले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय उपाध्ये यांनी आभार मानले.

बॉक्सः

या परिषदेत ठराव पारित करण्यात आले. ते आता राज्य व केंद्र सरकारला पाठविले जाणार आहेत.

१: अभ्यासक्रमाव्यतिरिक्त संतसाहित्य परीक्षांचे आयोजन शासनाने करावे.

२: संत साहित्यावर आधारित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा शासनाने आयोजित करून अंतिम फेरी राज्यस्तरीय व्हावी.

३: शालेय व महाविद्यालयीन कीर्तन स्पर्धाचे आयोजन रियॅलिटी शो सारखे खाजगी शिक्षण संस्थांनी प्रायोजित करावे.

४: संतसाहित्यावर इंग्रजीतून वक्तृत्व स्पर्धा इंग्रजी माध्यम शाळांनी आयोजित कराव्यात.

५: प्रत्येक महाविद्यालयात संत साहित्य अभ्यास अध्यासन स्थापन करणे अनिवार्य केले जावे.

६: वर्षातून एकदा भारतीय संत साहित्यावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र सरकारने आयोजित करावी.

७: युनेस्कोच्या धरतीवर वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षणप्रणाली मध्यवर्ती ठेवून तर Value Base Education Social Cultural Organization ची स्थापन व्हावी.८: सीबीएसईच्या देशभरातील शाळांमध्ये त्या त्या राज्यातील सर्व संतांचे एकत्रित भव्य स्मारक व वाचनालय निर्माण व्हावे.

९: आयआयटीच्या धारतीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज डिवाइन (आयआयकेडी) ची स्थापना केली जावी.

१०: प्रत्येक तीर्थक्षेत्रावर, सरकारी अनुदानाचे डिजिटल डिवाइन नॉलेज लायब्ररीची स्थापना केली जावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here