संत साहित्य हे जीवन जगण्याची कला शिकविते
माजी राज्यपाल न्या.विष्णू कोकजे यांचे विचारः
एमआयटी डब्ल्यूपीयूत पहिल्या भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेचे उद्घाटन
पुणे, दिः १५ जुलै: “मातृभाषेतील शिक्षण हळु हळु बंद होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संत साहित्याची ओळखच नाही. आजच्या शिक्षण पद्धतीत भौतिकतेचा पगडा अधिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढून नैराश्य आले आहे. अशावेळेस मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची कला शिकवायची असेल तर संत साहित्यांचा खजिना त्यांना द्यावा.” असे विचार विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल न्या.विष्णू कोकजे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती, आळंदी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या चार दिवसीय भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते. अध्यात्मिक गुरू ह.भ.प.किसन महाराज साखरे हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व परिषदेचे मुख्य निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एन.टी.राव, परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. बापूसाहेब मोरे, कार्याध्यक्ष ह.भ.प. डॉ. रविदास महाराज शिरसाठ, समन्वयक डॉ. संजय उपाध्ये आणि प्रा.डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.
न्या.विष्णू कोकजे म्हणाले,“उच्च शिक्षणावर विचार करावा लागणे हेच सर्वात महत्वाचे आहे. आजच्या काळात संत साहित्यांच्या ज्ञानाची खूप मोठी गरज आहे. चांगले नागरिक घडविणे आणि त्यांच्यात भारतीय संस्कार रुजविणे हे संत साहित्याचे कार्य आहे. संस्काराशिवाय शिक्षण देणे हे महाभयंकर कार्य आहे. विद्या विनयेन शोभते हे सुभाषित आहे. पण त्यात आध्यात्मिक ज्ञान असेल तर जीवन सुखमय होईल.”
“संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सोप्या भाषेत आध्यात्माची शिकवण दिली आहे. शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक ज्ञान हे विद्यार्थी दशेत मनाला वेगळे वळण लावून त्यांना नव ऊर्जा देऊ शकते. आध्यात्मातून आत्मिक सुख मिळविता येते. आजच्या काळात डॉक्टर, इंजिनियर, वकील यांसारख्या अन्य क्षेत्रातील लोकांना शपथा घेऊन आपल्या कार्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली जाते. पण शपथा घेऊन संस्कार कधीही येत नाहीत. त्यासाठी शिक्षणामध्ये संत साहित्यांचा समावेश करणे ही काळाची गरज आहे.”
ह.भ.प.श्री. बापूसाहेब मोरे,“शिक्षणामध्ये संत साहित्याचा समावेश व्हावा अशी कल्पना प्रथम डॉ. कराड यांनी मांडली. काळाची पाऊले ओळखून त्यांनी आज ही परिषद आयोजित करणे हे समाजाला दिशा दर्शक असेल. आज सर्वांना संतांचे विचार कळणे गरजचे आहे. संत तुकाराम महाराजांनी संगतीवर खूप मोठ्या प्रमाणात लिखाण केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून संताचे विचार मिळाले तर त्यांचे जीवन बदलेल.”
ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे म्हणाले,“एकीकडे मेकॉॅले ने शिक्षणाची घालून दिलेली चौकट आजपर्यंत कोणीही तोडू शकले नाही. यामुळे देशातील व्यक्ती हे वैदिक तत्वज्ञानापासून दूर गेलेे आहेत. शिक्षणाचा मुख्य उद्देश्य म्हणजे मानवला स्वः स्वरुपाचे ज्ञान करून देणे आहे. एमआयटीने सुरूवातीपासूनच शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती केली, अशा वेळेस संत साहित्याचा समावेश करणे ही महत्वपूर्ण बाब आहे.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“जगभर प्रसिद्ध असलेल्या वेदशास्त्रात ज्ञान आणि विज्ञानाचे सखोल ज्ञान समाविष्ठ आहे. आजची पिढी पाश्चात्य संस्कृतीमुळे वेगळ्या मार्गावर चाललेली आहे. त्यामुळे त्यांचे स्वत्व, स्वाभिमान आणि स्वधर्म गळूण पडला आहे. त्याला जागृत करण्याचे कार्य संत साहित्यातून होईल. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून समाजात सुख, समाधान आणि शांती नांदेल. तरूणांमध्ये भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचा संदेश रूजविल्यास संस्कारक्षम पिढी निर्माण होईल. तसेच, संत साहित्याचा उच्च शिक्षणामध्ये अंतर्भाव झाल्यास समाजोन्नती होईल. त्याग, समर्पण, मानवता आणि संतांचे तत्वज्ञान विद्यार्थ्यांमध्ये रूजविणे ही काळाची गरज आहे. या जगाला ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांसारख्या संताचा संदेशच तारू शकेल.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“स्वातंत्र्यानंतर देशात जी प्रगती झाली ती खूप छान आहे. पण शिक्षण क्षेत्रात हवी तेवढी प्रगती झालेली नाही. त्यासाठी आपल्या शिक्षणात संत साहित्यांचा समावेश करून त्यावर संशोधन करणे गरजेचे आहे. यामुळे नवी पिढी ही देशाला नवी दिशा देऊ शकेल. वेस्टर्न जगात सर्व गोष्टी चांगल्या आहेत अशा मानसिकतेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढणे गरजचे आहे. विद्यार्थ्यांना धर्म निरपेक्ष म्हणजे काय, धर्माचा खरा अर्थ समजावून सांगणे गरजचे आहे. आज संपूर्ण जगात भारताची अस्मिता जागविण्यासाठी शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणे गरजेचे आहे.”
ह.भ.प. श्री. रविदास महाराज शिरसाठ म्हणाले,“ संत वाड्मयामध्ये ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, भक्ती, कर्तव्य, आरोग्य या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आहे. म्हणून संत साहित्य हे शालेय व उच्च शिक्षणात समावेश करून विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे संस्कार दिल्यास संस्कारक्षम पिढी निर्माण होईल. त्यातून समाजाचे कल्याण होईल.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, “ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, भक्ती आणि श्रद्धा या सर्वांचा ऊहापोह करणारे संतसाहित्य उच्चशिक्षणात समावेश करणे काळाची गरज आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये संत साहित्याचा अंर्तभाव दिसत नाही. एकीकडे पाहिले तर संत साहित्य काळाच्या कसोटीवर उतरलेले असून ते धार्मिक नाही तर पूर्णंपणे वैज्ञानिक आहे.”
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.