18.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeशैक्षणिक*|| संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प ||*

*|| संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प ||*

एखाद्या अधिकाऱ्याने ,
कल्पकतेने चाकोरी बाहेर जाऊन काम केले तर किती सुंदर बदल घडू शकतात,हे आपल्याला संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्पाविषयी वाचून दिसून येते.
हा प्रकल्प राबवित असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
-संपादक

शाळा भेटी करताना विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन आणि हस्ताक्षर या बाबतीत तपासणी करताना, असे निदर्शनास आले की  विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी वाचन करताना पाहिजे तितका  आत्मविश्वास दिसून येत नाही. अधिकाऱ्यांपुढे मुलांनी व्यवस्थित वाचावे यासाठी शिक्षक सुद्धा त्यांना प्रेरित  करताना दिसून आले.हा दोष कुणाचाही नाही. फक्त विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासच कमी दिसून आला .

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काय करावे लागेल ? यावर चिंतन केले. मग मनाशी ठरवले. आपण ज्यावेळी शाळा भेटी करू, तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी दोघांमध्येही प्रेरणा निर्माण होण्यासाठी आपल्याला काय करता येईल? पालकांच्या  विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहेत? शिक्षकांकडून पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत? निव्वळ  अधिकारी म्हणून आपणच अपेक्षा ठेवणं हे कितपत  योग्य आहे? विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या ही काही समस्या असू शकतात. त्या सोडवण्यासाठी आपली अधिकारी म्हणून काय भूमिका आहे? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सामाजिक वातावरण कसे आहे ?

या सर्वांचा विचार करून मी एक प्रयोग करण्याचे ठरवले.
||इंग्रजी वाचनाबाबत|| – कोणतीही भाषा शिकण्यासाठी प्रथम श्रवण अत्यावश्यक आहे .आपल्या स्वतःचे कौशल्य वापरून श्रवण,भाषण, वाचन, लेखन या पायऱ्या नुसार छोटासा संवाद वाचन   प्रत्यक्ष  विद्यार्थी आणि शिक्षक यांना शिकवला. वाचन शिकवताना विद्यार्थ्यांना समक्ष काय समस्या येतात? याचा शोध मला लागला. इंग्रजी वाचताना मुलांची जीभ वळत नाही. इंग्रजी उच्चारानुसार ओठांची हालचाल होत नाही. अनोळखी शब्द परके परके वाटू लागतात. कानावर न पडलेले शब्द बोलायचे कसे? इंग्रजी पाठ वाचताना, जो पाठ  कधी शिकलोच नाही आणि डायरेक्ट वाचायचं? त्यांच्या चेहर्‍यावरील भाव मला स्पष्ट वाचता येत होते. यावर पर्याय म्हणून मी प्रत्येक  विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारले. त्यामुळे त्यांना माझी जवळीक वाटली. कारण मी काही त्यांना शिकवणारा नियमित शिक्षक नाही, मी तर फक्त तपासणी करणारा अधिकारी. शाळेमध्ये साहेब आलेले पाहून,शाळेचे पूर्ण वातावरणच बदलून जाताना, मी पाहिले आहे.

मी विद्यार्थ्यांना शिकवण्या अगोदर त्यांच्याशी गोड-गोड बोलून त्यांची मानसिक तयारी करून घ्यायला लागलो. साधारण दहा मिनिटांमध्ये इंग्रजी चा एक पॅरेग्राफ त्यांना वाचायला शिकवायचो. मी पहिल्यांदा विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य विकसित होण्यासाठी  स्पष्ट वाचन करून दाखवायचो. त्यांच्याकडून उच्चार म्हणवून घ्यायचो . त्यामुळे त्यांचे प्रथम श्रवण कौशल्य आणि नंतर भाषण कौशल्य विकसित होताना मला दिसून आले. आणि याच वेळी त्या शब्दांची एक प्रतिमा त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये, बुद्धी मध्ये तयार होताना जाणवले. लागलीच माझा प्रयोग यशस्वी झाला. मुलं आत्मविश्‍वासाने वाचन करून दाखवू लागली. त्यांना शिकवणारे शिक्षक सुद्धा आश्चर्याने भावना व्यक्त करू लागले. अनेक शाळा भेटी करता करता हा प्रयोग मी करायला लागलो.

प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जेव्हा शाळेतून निघायचो तेव्हा एक अचंबित करणारी गोष्ट माझ्या निदर्शनास आली. ज्या वर्गाला मी इंग्रजी वाचन शिकवलं, ती मुले -मुली आनंदाने मला टाटा,बाय-बाय म्हणू लागली. परत कधी येणार? असेही विचारू लागले. झाली विद्यार्थ्यांची माझी जवळीक. यातून मात्र एक शिकायला मिळालं.
ज्या शाळेवर तपासणीसाठी जाणार, विद्यार्थ्यांशी जवळीक कशी करायची, याचे कौशल्य ही मी आत्मसात करून घेतली.

मी ज्यावेळेस विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन शिकवत असे, त्यावेळी एखादे शिक्षक त्याची व्हिडिओ शूटिंग करीत असे.ते शूटिंग पालकांच्या व इतर शिक्षकांच्या ग्रुप वर जायचे , त्यामुळे या कामाचा प्रसार आणि प्रचार झाला.

काही शाळा भेटी मी न करताही व्हाट्सअप च्या माध्यमातून माझे व्हिडिओ पाहून, इतर शाळांनी हा प्रकल्प राबवायला सुरुवात केला. फोनवर माझे मार्गदर्शन घेतले. ज्या ठिकाणी समस्या येत होत्या,त्या ठिकाणी मला बोलावण्यात आले. जाणीवपूर्वक तेथे जाऊन तो प्रयोग यशस्वी करून दाखविला. चौथीची मुलं वाचायला लागलेली पाहून इतर लहान वर्गातील मुलेही, आम्हाला इंग्रजी वाचन शिकवा असे त्यांच्या शिक्षकांना म्हणून लागली. इंग्रजी वाचनाचे आकर्षण विद्यार्थ्यांना निर्माण झाले. घरी गेल्यावर पालकांनाही हट्ट करू लागले, माझा अभ्यास घ्या. मला इंग्रजी वाचन शिकवा. अनेक शाळांचे मुले इंग्रजी वाचन करतात,असे माझ्या निदर्शनास आले. त्यावरुन मला एक कल्पना सुचली. भेटी वेळी जे- जे विद्यार्थी चांगले वाचन करतील, त्यांचा व्हिडिओ मी काढू लागलो. माझ्या स्टेटस ला ठेवायला लागलो. माझे टेटस साधारण 800 पेक्षा जास्त लोक पाहतात. मला सर्वांनी अभिनंदन, सुंदर, फारच छान, आता जिल्हा परिषद शाळा पुढे जाणार, ग्रामीण भागातील मुले इंग्रजी शिकणार, विद्यार्थ्यांची इंग्रजीची भीती गेली, आपण फार चांगलं काम करत आहात, असे एक ना अनेक मेसेज यायला लागले. त्यातून असं वाटलं ,या नुसार आपण एक प्रकल्प तयार करू.. जे शिक्षक इंग्रजी वाचन शिकवतात, त्यांनीच आपल्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ काढायचा. आणि स्वतःच्या मोबाईल वर स्टेटस ठेवायचा. शिक्षकांकडे BLO. चे काम असल्यामुळे गावातील सर्व नागरिकांचे मोबाईल नंबर त्यांच्याकडे सेव आहेत, त्याचप्रमाणे शिक्षकांचेही मोबाईल नंबर संपूर्ण गावातील नागरिकांकडे  सेव आहेत. त्यामुळे एकमेकांचे टेटस ते पाहू शकतात, हि थीम लक्षात घेऊन, प्रकल्प माझ्यासमोर उभा राहिला.

राहता तालुक्यातील शिक्षकांना मी आवाहन केले, की आपण आपल्या वर्गातील, ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन येते त्यांचा छोटासा व्हिडीओ काढा. विद्यार्थ्यांना ते अप्रूप वाटू लागले. तो व्हिडीओ शिक्षक स्टेटसला ठेवू लागले.
आपण कसे वाचतो, हे पाहून विद्यार्थ्यांना अत्यानंद झाला. आपला पाल्य कसा इंग्रजी वाचतो ? हे स्टेटस ला पाहिल्यावर, पालकांना सुद्धा खूप आनंद झाला. गावातील एकाच वेळी अनेक नागरिक, आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन पाहू लागले. चर्चा सुरू झाली. आपल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी इतक्या चांगल्या रीतीने इंग्रजी वाचन करतात.

जिल्हा परिषद शाळेत इंग्रजी शिकवलं जात नाही असा एक लोकांचा समज होता. या प्रयोगामुळे पसरलेला गैरसमज दूर झाला. सरांच्या मोबाईल टेटस ला आपण दिसणार म्हणून विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली, एक प्रकारची स्पर्धा तयार झाली. त्याचबरोबर या उपक्रमाविषयी  वृत्तपत्रांमध्ये बातम्या येऊ लागल्या. त्या सर्व बातम्या पालक, शिक्षक वाचू लागले. प्रकल्पाला उत्तम रीतीने प्रसिद्धी मिळू लागली. मुले घरी गेल्यावर इंग्रजी पुस्तकच वाचू लागली. समस्या आल्यावर पालकांना विचारू लागली.  पालक सुद्धा मुलांचा अभ्यास घ्यायला लागले. पालक सुद्धा मुलांचे इंग्रजी वाचनाचे  व्हिडिओ काढायला लागले. ते व्हिडिओ शिक्षकांना पाठवू लागले. पालक स्वतः तो इंग्रजी वाचनाचा व्हिडिओ  स्टेटस ठेवायला लागले. त्यामुळे त्या पालकाचे नातेवाईक, मित्रमंडळी यांना हे छोटेसे विद्यार्थी  किती छान इंग्रजी वाचन करतात याबद्दल पालकांवर कौतुकाचा वर्षाव झाला.

या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांना शाबासकी मिळू लागल्याने सर्वजण प्रयत्नाला लागले. बघता बघता || संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प || हे नाव कधी त्या प्रकल्पाला मिळालं, मलाही समजलं नाही.
या प्रकल्पाचे फायदे :-
1) जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना इंग्रजी वाचन मुलांना शिकवण याबाबत प्रेरणा मिळाली.
2) इंग्रजी वाचन शिकण्यासाठी विद्यार्थी स्वतःहून पुढे यायला लागेल.
3) आपण इंग्रजी वाचू शकतो, हा आत्मविश्वास आल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे खुलून गेले.
4) सर, आज आपला व्हिडिओ काढून टेटस ला ठेवणार आहेत,या आनंदात,   विद्यार्थी बागडू लागले.
5) आपले बाळ इतके छान इंग्रजी वाचन करतोय आणि सगळं गाव टेटस वर पहातंय. त्यामुळे पालकांना अत्यानंद होऊन पालकाची एक प्रकारे गावात प्रतिष्ठा निर्माण झाली .
6) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कशाप्रकारे कामकाज चालू आहे, सर्व गावात कळायला लागल्यामुळे, प्राथमिक शाळे कडे पाहण्याचा दृष्टिकोन नागरिकांचा अधिक चांगला झाला.
7) गावात आणि शाळेत इंग्रजी वाचनाची शैक्षणिक चर्चा सुरू झाली.
8) शिक्षकांना अनेक कौतुकाचे मेसेज गावातून, नातेवाईकांकडून, मित्रमंडळी कडून  येऊ लागले . गावातून कौतुकाची थाप पडल्यामुळे शिक्षकांना भरपूर  प्रेरणा मिळाली व ऊर्जा मिळाली.
9) विद्यार्थी व शिक्षकांना इंग्रजी वाचनाबाबत कामकाज करण्याबाबत एक विशिष्ट दिशा मिळाली.
10) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे वाचन येत नाही म्हणून पालक अस्वस्थ होते. पालक सुद्धा आनंदित झाले.
11) गावात शिक्षकांचा मान आणि प्रतिष्ठा वाढली.
12) एखाद्या दिवशी जरी शिक्षकांनी इंग्रजी वाचन घेतले नाही तर विद्यार्थी त्याची आठवण करून देऊ लागली, की आमचे इंग्रजी वाचन घ्या. आम्हाला इंग्रजी वाचन शिकवा.
13) बऱ्याच  नागरिकांना वाटत होते की जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी शिकवले जात नाही, त्यांचा हा गैरसमज दूर झाला.
14) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा पाया पक्का झाला.
15) एका शिक्षकाचा उपक्रम पाहून अनेक शिक्षक प्रेरित होऊन, आपल्याही शाळेत उपक्रम राबवू लागले.
16) जिल्हा परिषद शाळेत मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या वाटा खुल्या झाल्या.
17) लहान मुलांचे गावात कौतुक व्हायला लागल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा झाली.
18) शिक्षकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव न देता उपक्रम सुरू केल्याने ते स्वयंप्रेरणेने  उपक्रम अगदी मनापासून राबवू  लागले.
19) इंग्रजी वाचन आपल्याला येते,या जाणिवेतून विद्यार्थ्यांना  सेमी इंग्रजीचा  अभ्यास करणे सोपे वाटू लागले.
20) आपला पाल्य इंग्रजी कसा वाचतो, हे पालकांना घरबसल्या समजू लागले.
21) विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील दरी कमी झाली.
22) बालक -पालक- शिक्षक सहसंबंध  वाढला.
23) शिक्षकांमध्ये एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण सुरू झाली.
24) शिक्षक, विद्यार्थी व अधिकारी यांच्यातील दरी कमी झाली.
25) जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही, असे  माझे  ठाम मत  आहे.
26) विद्यार्थ्यांना स्वतः अधिकारी शिकवतात, हा अनुभव विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस दिशा देणारा आहे.
27) जिल्हा परिषद  प्राथमिक शिक्षकांनी मनावर घेतले तर शाळाबाह्य किती कामे असली तरी गुणवत्ता वाढवू शकतात  शकतात, हे या प्रकल्पातून दाखवून दिले.
28) सर्व विद्यार्थ्यांची, सर्व शिक्षकांची, सर्व पालकांची, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची प्रतिष्ठा वाढविणारा हा प्रकल्प आहे.
29) शिक्षकांनी केलेले काम समाजाला दाखवण्यासाठी हा प्रकल्प उत्तम आहे.
30) विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा आत्मविश्वास वाढविणारा प्रकल्प आहे.       

     लेखन:संजीवन दिवे,
शिक्षण विस्तार अधिकारी,
पंचायत समिती,राहाता
संपादन:देवेंद्र भुजबळ
☎️9869484800

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]