डॉ. पराग संचेती यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन
लातूर : पुण्याच्या डॉ. के.एस. संचेती यांनी ५६ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या संचेती हॉस्पिटल आणि लातूर शहराचे अत्यंत जवळचे नटे असून लातूरचे अस्थिरोगांविषयीचे जटील रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन विश्वासाने उपचार घेतात ,असे प्रतिपादन भारतातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ तथा संचेती इस्न्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक अँड रिहॅबिलिटेशन चे प्रमुख डॉ. पराग संचेती यांनी केले. लातूरच्या डॉ.अशोक पोद्दार संचालित पोद्दार ऍक्सीडेन्ट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. संचेती बोलत होते.
यावेळी डॉ. अशोक पोद्दार , पुण्याचे डॉ. सिद्धार्थ अय्यर, डॉ. शैलेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बदलत्या जीवन शैलीमुळे आजघडीला हाडांच्या विकाराने बाधित होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याचे सांगून डॉ. पराग संचेती पुढे म्हणाले की, अस्थिशल्य चिकित्सेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक अशा नवीन अद्यावत अशा १५० बेड्सच्या हॉस्पिटलची उभारणी आपण पुण्यामध्ये करत आहोत. १२ मजल्यांच्या या भव्य हॉस्पिटलमध्ये अस्थिरोगांविषयी अत्यंत अद्यावत उपचार यंत्रणा उपलब्ध असणार आहे. आपल्या जुन्या संचेती हॉस्पिटलमधील बेड्स यावेळी गरजू रुग्णांकरिता उपयोगात आणले जातील,असेही डॉ. संचेती म्हणाले. नूतन अद्यावत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकरिता इन्शुरन्स कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जेणेकरून उपचार महागडा आहे म्हणून एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही. नव्या संचेती हॉस्पिटलमध्ये अद्यावत सर्व सोयीसुविधांसह बोन बँक अर्थात हाडांची बँक सुरु केली जाणार आहे. गरजू रुग्णांचे शत्रक्रियेदरम्यान काढण्यात आलेले हाड या बँकेत उणे ६५ अंश सेल्सियस मध्ये जातं करून ठेवून ते अन्य गरजू रुग्णांसाठी उपयोगात आणले जाऊ शकेल. याशिवाय रोबोटिक सर्जरी, सांधा – गुडघा बदलण्याची शस्त्रक्रियाही याठिकाणी ओ आर्म टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अत्यंत अचूकपणे करणे शक्य होणार आहे. आपले हॉस्पिटल मागच्या ५६ वर्षांपासून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीद वाक्याप्रमाणे अव्याहतपणे सुरु आहे. भविष्यातही आपले पिताश्री पद्मविभूषण डॉ. के.एस. संचेती यांचा रुग्णसेवेचा वारसा आपण तेवढ्याच आत्मियतेने पुढे चालवण्याचे काम करत आहोत. आपल्या या नव्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना अत्यंत माफक व सवलतीच्या दरात आपण उपचार सुविधा देणार असल्याचेही डॉ. संचेती यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सिद्धार्थ अय्यर यांनीही सांधे, हाडाच्या ठिसूळतेविषयी मौलिक विचार व्यक्त केले. डॉ.अशोक पोद्दार यांनी डॉ. संचेती व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करून आपल्या हॉस्पिटलच्या वतीने शनिवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा,असे आवाहन यावेळी केले. यावेळी डॉ. दीपक गुगळे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.