लातूर ; (प्रतिनिधी)-
एकविसाव्या शतकातील महान संगीत साधक आणि तपस्वी स्वर्गीय पंडित शांतारामजी चिगरी गुरुजी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ सुरताल संगीत महाविद्यालय लातूर यांच्या वतीने शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस उपाधीक्षक लातूर शहर श्री.भागवत फुंदे ,Times now चे लातूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत पाटील,गुरुमाई श्रीमती सुमित्राताई चिगरी ,सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, प्राचार्य संजय गवई सर व युवा गायिका कु.श्रुती बोरगावकर यांच्या हस्ते महान तपस्वी पंडित शांतारामजी चिगरी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजनानंतर सूरताल संगीत महाविद्यालयाच्या वतीने सर्व प्रमुख अतिथींचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी सोनू डगवाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
आपल्या प्रास्ताविकांमधून त्यांनी गुरुजींबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. शशीकांत पाटील व पोलीस उपअधीक्षक भागवत फुंदे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. उद्घाटन समारंभानंतर पं. पांडुरंग देशपांडे यांच्याकडे सांगीतिक शिक्षण घेत असलेली व पंडित रघुनंदन पणशीकर पुणे यांचेकडे जयपूर अत्रोली घराण्याच्या गायकीचे अध्ययन करणारी युवा गायिका श्रुती बोरगावकर यांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला प्रारंभ झाला. अहिर भैरव रागातील व विलंबित एक तालातील शुभ दिन आज दिखायो " या बंदिशीने गायनास प्रारंभ झाला. त्यानंतर द्रुत तीन तालातील
मोहे छेडो ना गिरीधारी, ईतनी अरज हमारी”ही बंदिश सादर केली. स्वरांवरील मजबूत पकड, आलाप, बोल आलाप, ताना अत्यंत सफाईदारपणे घेऊन अहिर भैरव रागाचे स्वरूप कु.श्रुती बोरगावकर हिने रसिकांसमोर सादर केले. त्यानंतर उपशास्त्रीय प्रकारातील व देश रागातील दादरा हा प्रकार सादर केला. नाट्यगीत हा श्रुतीचा सर्वात आवडता प्रांत. मैफिलीचा समारोप संगीत सौभद्र या नाटकातील वद जाऊ कुणाला शरण ग या पदाने झाला. श्रुती बोरगावकर यांच्या गायनाला तबला साथ संगत श्री प्रकाश बोरगावकर यांनी केली तर हार्मोनियमची साथ संगत गणेश सुतार व पंडित बाबुराव बोरगावकर यांनी केली. फक्त मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण भारतभर आपले शिष्य उत्तम घडवणारे महान संगीत तपस्वी शांतारामजी चिगरी
गुरुजी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या मैफिलीला लातूर शहर व परिसरातील संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर कलावंत मंडळी उपस्थित होती. उपप्राचार्य लखादिवे सर, कबाडे सर, प्रा.विजयकुमार धायगुडे प्रा.शशिकांत देशमुख, प्रा.लक्ष्मण श्रीमंगले, वेदांग धाराशिवे, आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार विजेते प्रा.संदीप जगदाळे, संजय सुवर्णकार, मीनाताई कोळी, हरीश कुलकर्णी, अभिमन्यू मोहिते, उमाकांत खानापुरे, मीनाक्षी कोळी, नभा बडे यांच्यासह अनेक कलावंतांनी शास्त्रीय संगीत मैफिलीसाठी रसिक म्हणून उपस्थिती दर्शवली. सूरताल संगीत महाविद्यालय येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर पाटील यांनी तर आभार काळे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनू डगवाले, परमेश्वर पाटील शिवाजी कंदगुळे, रुपेश सूर्यवंशी यांच्यासह सुरताल संगीत महाविद्यालयाचे विद्यार्थी वृंद यांनी परिश्रम घेतले.