17.2 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसाहित्य*संगीत क्षेत्रातील एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख*

*संगीत क्षेत्रातील एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख*

पुस्तक परिचय

पुस्तक : आयी चांदनी रात —
लेखक : किरण भावठाणकर
पुस्तक परिचय : अरुण डवलेकर

1 ऑगस्ट हा, महामहोपाध्याय पंडीत स.भ.देशपांडे मास्तर यांचा जन्मदिन. या निमित्त त्यांना आदरांजली म्हणून, त्यांचे नात शिष्य, किरण भावठाणकर, यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रात्मक पुस्तक, आयी चांदनी रात, या पुस्तकाचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न.– —संपादक

पुुस्तक परिचय करुन देण्याआधी मला हे पुस्तक कसे वाचायला मिळाले त्याविषयी. मागच्या वर्षी हैदराबाद मधे, एका कार्यक्रमात, प्रसिद्ध तबला वादक किरण देशपांडे , यांची भेट झाली होती. माझ्या सवयी प्रमाणे मी त्यांना तुम्ही मुळ कुठल्या गावचे म्हणून विचारले. ते म्हणाले, अकोला जिल्ह्यातील, त्यावेळच्या वाशीम तालुक्यातील वडगाव चा. माझा ही जन्म अकोला जिल्ह्यातील, मुर्तिजापूर चा. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील एक माणूस , उच्च श्रेणीतील कलाकार आहे ह्याचा आनंद झाला. ते सहज म्हणाले होते, हैदराबाद मधे ज्यांनी विवेक वर्धिनी संगीत महाविद्यालयाची स्थापना केली होती ते, स.भ.देशपांडे , माझे काका.

मराठी साहित्य परिषद हैदराबाद, यांनी मालिनीताई राजुरकर , विशेषांक काढला होता व त्याचे प्रकाशन 30 जुन 2024 ला झाले होते. कार्यक्रम अतिशय सुंदर झाल्याने त्या कार्यक्रमाचा वृत्तांत मी whatsapp वर लिहिला होता. कसा कोण जाणे तो मेसेज फिरत फिरत, किरण भावठाणकर, लातूर, यांनी वाचला व ते म्हणाले मला अंक कुठे मिळेल. मी त्यांना त्याची माहिती दिली. ते म्हणाले , मी माझे आजे गुरू स.भ.देशपांडे यांच्यावर मी पुस्तक लिहिले आहे. मी म्हणालो स.भ.देशपांडे यांचा जन्म माझ्याच जिल्ह्यातील असल्याने आपल्या जिल्ह्यातील, माणसाचे चरित्र वाचायला मला नक्कीच आवडेल. ते म्हणाले मी पुस्तक तुम्हाला पाठवतो व लगेच त्यांनी ते पाठवले. ते पुस्तक वाचले व खूूप आवडले .

स.भ.देशपांडे मास्तरांचे कार्य नवीन पिढीतील संगीत रसिकांना समजावे व जुन्या पिढीतील संगीत रसिकांच्या आठवणींना उजाळा मिळाला तर तो त्यांना आवडेल, असे वाटल्याने या पुस्तकाचा परिचय थोडक्यात करून देत आहे.

या पुस्तकात तुम्हाला मास्तरांचे आजे गुरू विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या काळा पासूनचा म्हणजे साधारण 1900 साला पासूनचा संगीताचा इतिहास वाचायला मिळेल. 1900 मधे संगीत कले करीता राजाश्रय आवश्यक होता. फक्त दिवाणे खास मधील लोकं संगीताचा आनंद घेऊ शकायचे. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी मात्र संगीताचा आनंद सर्व साधारण माणसालाही कसा मिळू शकेल यावर विचार करून संगीत प्रसार व प्रचार करण्याचे व निर्व्यसनी , निष्ठावान , शिस्तप्रिय , संगीत कलाकार, संगीत शिक्षक तयार करण्याचे व्रत घेतले. अगदी सर्व सामान्य माणसाला परवडेल असे अत्यल्प शुल्क आकारून संगीताचे जाहीर कार्यक्रम करून संगीताचा आनंद सर्व साधारण माणसाला मिळवून दिला. संगीत कला राजाश्रया पासुन लोकाश्रया कडे आणली. त्यांचे म्हणणे होते मला तानसेन नाही तर कानसेन तयार करायचे आहेत. चांगले कानसेन निर्माण करण्या करीता त्यांनी पहिले गांधर्व महाविद्यालय 5 मे 1901 मधे लाहोर ला स्थापन केले. या साठीचा कोर्स डिझाईन केला. त्या करीता आवश्यक पुस्तकांची निर्मिती केली व संगीत शिक्षण सर्वां करीता खुले केले. याआधी संगीत शिक्षण हे फक्त गुरू शिष्य परंपरेतुनच घेण्याची पद्धत होती . त्यामुळे ती बरीचशी गुरुंच्या लहरी वरती व अतिशय कष्टदायक होती. त्यामुळे फार कमी शिष्य ही संगीत कला आत्मसात करू शकतं. संगीत महाविद्यालय सुरू झाल्याने संगीत शिक्षकांची पण आवश्यकता निर्माण झाली व त्यामुळे अनेकांना आपला आवडीचा रोजगार पण मिळायला लागला . संगीत प्रचार व प्रसार जोमाने व्हायला सुरुवात झाली. मुंबईत 1908 साली गांधर्व महाविद्यालय सुरु झाले . याशिवाय विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी आपल्या विचारांचे अनेक शिष्य घडवले. त्यापैकी एक मास्तरांचे गुरू विनायक बुवा पटवर्धन. मास्तरांनी विनायक बुवा पटवर्धन यांचे कडून गरु शिष्य परंपरेनुसार संगीताचे धडे घेता घेता पुण्यात 1932 मधे सुरु झालेल्या गांधर्व महाविद्यालयात शिकत असणाऱ्यां मुलांना शिकवून थोडे मानधन मिळवणे सुरू केले . भारतभरातील अनेक शहरात गांधर्व महाविद्यालयं सुरु होत होती. या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्या साठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची स्थापना 1931 मधे झाली होती.
मास्तरांनी काही दिवस पुण्यातील हिंगणे येथे महर्षी कर्वे यांच्या स्री शिक्षण संस्थेने सुरू केलेल्या महिला काॅलेज मधे पण संगीत शिक्षक म्हणून काम केले. 1951 मधे त्यांचे गुरू विनायक बुवा यांनी त्यांना हैदराबाद ला संगीत प्रसार व प्रचार करण्याचे काम करण्यास सांगितले. त्यावेळी हैदराबाद मधे संगीताचा विशेष बोलबाला नव्हता. मास्तरांनी हैदराबाद येथे आल्या बरोबर विवेक वर्धिनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष व कार्यवाह यांची भेट घेतली व आपला संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा मनसुबा सांगितला. विवेक वर्धिनीच्या कार्यकारणीला ही तो आवडला . संगीत महाविद्यालयात जे विद्यार्थी येतील त्यांची फी तीन रुपये ठरली. त्यातले दोन रुपये संस्थेला व एक रुपया मास्तरांना मिळेल असे ठरले. मास्तरांनी या प्रस्तावाला होकार दिला. 1951 च्या कोजागिरी पौर्णिमेस विवेक वर्धिनी संगीत महाविद्यालयाची स्थापना विवेक वर्धिनीच्या शाळेत झाली व संगीताचे वर्ग संध्याकाळी सुरु झाले.


पहिले काही दिवस एक ही विद्यार्थी आला नाही. काही दिवसांनी एक प्रौढ विद्यार्थी शाळेत आला. त्याचे नाव नारायणराव कर्हाडे. शाळा सुरू झाली व हळूहळू विद्यार्थी पण यायला लागले पण विद्यार्थीनी येत नव्हत्या. म्हणून मास्तरांनी आपल्या पत्नीचे नाव विद्यार्थीनी म्हणून नोंदवले. त्यावेळचे विवेक वर्धिनी शाळेचे सुपरिटेंडेंट भावे यांनी आपल्या मुलीचे नांव नोंदवले व संगीत शाळेत हळूहळू , विद्यार्थीनी येऊ लागल्या व शाळा व्यवस्थित सुरू झाली. हे संगीत महाविद्यालय गांधर्व महाविद्यालय मंडळाशी संलग्न होते त्यामुळे संगीताचा अभ्यासक्रम व परीक्षा त्याच पध्दतीने व्हायच्या. याशिवाय मास्तर संगीतात ज्यांना विशेष रस आहे त्यांना गुरूशिष्य परंपरेने घरी पण शिकवायचे.

उत्तम गुरू – मास्तर विवेक वर्धिनी संगीत महाविद्यालयात साधारण 1977 पर्यंत प्रिन्सिपॉल म्हणून कार्यरत होते . त्यांनी हैदराबाद मधील कार्यकाळात संगीतातील अनेक मोठ्या दर्जाचे कलावंत घडवले. त्यातील काही नामवंतांची नावे अशी. नारायणराव कर्हाडे, चिदंबरराव देशपांडे, गजानन घारापुरकर, कमलाकर परळीकर, मोहन देशपांडे, रा.ना.शिंदे, नारायणराव जुक्कलकर , शाम दडपे, प्रभा काळे, मीरा पानसे, विमलराजे देशपांडे, कमलाताई पोतदार, रामभट जोशी, शंकरदास प्रेमी, बी सरलादेवी, रमेश हैदराबादकर, व्यंकटेश मोहरीर, शामकांत नळदुर्गकर , आशालता करलगीकर, शालिनीताई सलगरकर.
1977 मधे मास्तर विवेक वर्धिनी संगीत विद्यालयातून निवृत्त झाले. त्यानंतर हैदराबाद मधे पेेन्शनर ग्रुप मधे राहण्यापेक्षा, त्यांनी मिरजेला जाऊन गांधर्व महाविद्यालय मंडळात कार्यरत राहण्याचे ठरवले व तेथील जबाबदारी स्विकारली. तेथील गुरूकुल पध्दतीत त्यांनी सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास असे मार्गदर्शन करतं काही विद्यार्थिनींची संगीत विशारद ह्या परीक्षेची तयारी करुन घेतली. त्या विद्यार्थिनी होत्या, मंगल म्हैसकर, हेमा दामले, ज्योती आपटे, शशीकला रानडे.


1980 मधे मास्तर औरंगाबादला शिफ्ट झाले. तेथे पण त्यांनी चित्ररेखा देशमुख, विजयालक्ष्मी बर्जे , करुणा देशपांडे यांना संगीत प्रवीण परीक्षे साठी मार्गदर्शन केले. या व्यतिरिक्त संध्या देशमुख, संदीप देशमुख , चारुता आपटे , विजय देशमुख, फणसळकर , शुभदा शिराळकर, अनगरकर, ज्योती देशपांडे, प्रभाकरराव काळे यांनी मार्गदर्शन घेतले.
मास्तरांच्या उत्तरार्धाच्या काळात ते नांदेड ला होते तेथे ही त्यांचे मार्गदर्शन रमेश कानोले, शाम गुंजकर, सीता मोहनराव, नलिनी देशपांडे, राजेन्द्र व त्रिंबक देशमुख, ही मंडळी नियमित घेत असे.
मास्तरांनी आयुष्य भर निष्ठेने संगीत विद्या दानाचे काम केले.

उत्तम गायक – मास्तर हे उत्तम गायक होते. खरं तर ते डी.व्ही.पलुस्कर यांच्या बरोबरंच, विनायकबुवा यांच्या कडे गाणे शिकले होते पण त्यांना सिंगर्स नोडुल झाल्याने त्यांच्या गाण्यावर थोड्या मर्यादा आल्या होत्या , नाही तर ते डी.व्ही.पलुस्कर, भीमसेन जोशी यांच्या इतके प्रसिद्ध गायक झाले असते. तरीही ते खूपच छान गात असतं . हैदराबाद मधील अनेक मैफिलीत तसेच हैदराबाद मधील गुरुवार मंडळातील ते आवडते गायक होते.

उत्तम गायक नट – मास्तरांनी हैदराबाद मधे , विमल नाट्य समाज या संस्थेत, संगीत सौभद्र नाटकात श्रीकृष्णाची , विद्याहरण नाटकात कच यांची , संशय कल्लोळ मधे अखिल शेठ , संगीत मत्स्यगंधा मधे पराशराची भुमिका खूप सुंदर करुन, उत्तम गायक नट म्हणून नाव मिळवले होते.

उत्तम बंदीशकार – मास्तरांनी साधारण 30 बंदीशी रचल्या आहेत. यातील काही बंदीशी त्यांचे शिष्य आठवणीने त्या अजून ही गातात. आयी चांदनी रात शरद की, ही बंदिश, प्रसिद्ध गायिका वीणा सहस्त्रबुध्दे यांनी त्यांच्या ऋतुचक्र या कॅसेट मधे गायली आहे.

उत्तम व्याख्याता – मास्तर संगीत विषयावर खूप माहितीपूर्ण व्याख्यानं पण द्यायचे. त्यांचे गाणे कसे ऐकावे , याविषया वरील व्याख्यान तर संगीतातले फारसे न कळणाऱ्या लोकांना संगीताचे कानसेन तयार करण्यासाठी फार उपयुक्त होते.

उत्तम आयोजक – हैदराबाद मधील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी मल्लिकार्जुन मन्सूर, बसवराज राजगुरू, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, गजानन बुवा जोशी अशा अनेक नामवंतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या परीक्षांच्या पदवीदान समारंभाचे आयोजन 5 वेळा हैदराबाद मधे केले होते. त्यांनी मंडळाच्या संगीत शिक्षकाच्या त्रैवार्षिक संमेलनाचे आयोजन ही एकदा हैदराबाद मधे केले होते. यात भारत भरातून 1200 संगीत शिक्षक आले होते.

उत्तम संघटक – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे ते 1972 ते 1982 , सचिव होते. ते सचिव असतांनाच महाराष्ट्र राज्य सरकार कडून पंडीत विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे स्मारक उभारण्या साठी, मुंबईतील वाशी येथे जागा मिळवली. आज तेथे मंडळाची तीन मजली इमारत उभी आहे व हेच आता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे मुख्य कार्यालय आहे. आज भारत तसेच परदेशातील मिळून जवळ जवळ एक लाख विद्यार्थी , 1200 च्या वर परीक्षा केन्द्रातून संगीतातील विविध परीक्षांना बसतात व त्याचे काम या मुख्यालयातून बघितले जाते.

आदरणीय व्यक्ती – मास्तरांबद्यल त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाला त्यांच्या बोलण्या मुळे व स्वभावामुळे आदर वाटतं असे. पारनेर च्या पूर्णवाद परिवारावर, जीवनात संगीत व ललित कला सर्वोच्च आनंद देतात असा संस्कार आहे. यामुळे मास्तरांचा ही या परिवाराशी संबंध होता. या परिवाराने त्यांचे गुरु, विष्णू महाराज यांचा षष्ठब्दी पुर्ती चा कार्यक्रम परभणी येथे करायचे ठरवले होते. संगीतातले मास्तरांचे कार्य लक्षात घेऊन त्यांना संध्याकाळच्या संगीत कार्यक्रमात प्रमुख म्हणून बोलावले होते. मास्तरांचे परभणीतील शिष्य कमलाकर परळीकर यांचे ही गाणे ठेवले होते. संगीतातील परंपरेनुसार मास्तरांच्या गाण्यानी कार्यक्रमाची सांगता करायचे ठरले होते. कार्यक्रमाच्या आधी मास्तर म्हणाले मी आधी गाईन व नंतर माझे शिष्य कमलाकर परळीकर कार्यक्रमाची सांगता करतील. माझे वय आता 85 आहे. माझे शिष्य आता माझ्या पेक्षा सरस गातात म्हणून मला आता असे करणे योग्य वाटते. मास्तर 85 वयात ही उत्तमच गायले. त्यांचे जानकी नाथ सहाय करे , हे पद त्यांनी अतिशय तल्लीन व तादात्म्य पावून गायल्याने, श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रु पाझरले. त्यानंतर त्यांचे शिष्य कमलाकर परळीकर यांनी कार्यक्रमाची उत्तम गाऊन सांगता केली. हे मास्तरांच्या सहज , निर्लेप व निर्व्याज स्वभावाचे उत्तम उदाहरण आहे. शिष्याला आपल्या नंतर गायला सांगण्यातून मास्तरांची विनम्रता व मोठेपणा द्दुष्टीगोचर होतो.

या पुस्तकात तुम्हाला मास्तरांच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत चा प्रवास अतिशय सविस्तर पणे त्यांचा मुलगा , मुलगी, त्यांचे नातेवाईक , अनेेक शिष्य , मित्र, यांनी त्यांच्या विषयी लिहिलेल्या आठवणीतून वाचायला मिळेल. लेखकानी या सर्व आठवणी मिळवण्या करीता किती परिश्रम घेतले असतील याची कल्पना पुस्तक वाचतांना येते. लेखकानी या आठवणींची मांडणी पण खूप छान केल्याने पुस्तक खूप वाचनीय झाले आहे. जरूर वाचा . संगीत क्षेत्रातील एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख या पुस्तकातून करुन दिल्याबद्दल किरण भावठाणकर या लेखकाला धन्यवाद देतो व थांबतो.

अरूण डवलेकर ,हैदराबाद
1/8/2024
मोबाइल नंबर 9966375011

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]