*सक्षम कार्यकारी मंडळ व उच्चशिक्षित अनुभवी कर्मचा-यामुळे श्री गुरुजी पतसंस्था नावारूपाला येईल*
*शुभारंभप्रसंगी विनोद कुचेरिया यांना विश्वास
लातूर; दि. ( प्रतिनिधी) कुठलीही संस्था असो त्या संस्थेत कोण काम करतो , त्यांचा उद्देश काय? हे पाहिले जाते . या पतसंस्थेतील कार्यकारी मंडळ हे विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन प्रामाणिक व स्वच्छ कारभार करणारे असल्यामुळे ही संस्था लवकरच नावारूपाला येईल , असा विश्वास सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक विनोद कुचेरिया यांनी व्यक्त केला.
सरस्वती कॉलनी, जुना औसा रोड येथे स्थापित श्रीगुरुजी नागरी सहकारी मर्यादित लातूर या संस्थेचा शुभारंभ कुचेरिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला . याप्रसंगी ते बोलत होते .यावेळी ज्येष्ठ अभियंता देवीकुमार पाठक व संस्थेचे अध्यक्ष अतुल ठोंबरे, उपाध्यक्ष भूषण दाते , सचिव संजय प्र.अयाचित यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
विनोद कुचेरिया यांनी आपल्या छोटेखानी भाषणात जानाई परिवाराच्या सामाजिक उपक्रमाचा आढावा घेतला. अतुल ठोंबरे यांचे त्यांनी विशेष करून कौतुक केले. अतुलजीची अनेक नवनवीन प्रयोग करण्याची हातोटी आहे. सेवाकार्य असो की सहकार सगळ्या क्षेत्रात नीटनेटके व हटके काम करण्याची त्यांची हातोटी आहे. बँकिंग व सहकार क्षेत्रात त्यांचा चांगला अभ्यास असल्यामुळे त्यांचे इतर प्रतिष्ठान जसे अल्पावधीत नावारूपाला आले आहेत तशीच येत्या काही महिन्यात गुरुजी ही पतसंस्था नावारूपाला येईल ,असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी बोलताना काढले .
अतुल ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले .आपल्या प्रास्ताविकात त्यांनी जानाई प्रतिष्ठान ,अर्थवर्धिनी जानाई महिला पतसंस्था, श्रीगुरुजी आयटीआय संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला .ते म्हणाले की , जानाई परिवाराची ही पतसंस्था आहे .विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी जानाई प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले .त्यानंतर बचत गट ,नंतर पतसंस्था काढली. भविष्यात एखादी बँक स्थापन करण्याचा आमचा मानस आहे.
यावेळी पहिले ठेवीदार सूर्यकांत राऊत , मनोज सप्तर्षी , पहिले कर्जदार दैवशाला देशमुख यांचा सत्कार करण्यात आला .देवीकुमार पाठक यांनी अध्यक्षीय समारोप केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुनीता पाटील यांनी केले. पतसंस्थेच्या व्यवस्थापिका अमृता देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.