*मातृभाषेतून घेतलेले शिक्षण सर्वोच्च शिक्षण**-सिनेअभिनेते राहूल सोलापूरकर यांचे मत*
लातूर/प्रतिनिधी:येथील श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्यावतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा दयानंद सभागृहात संपन्न झाला.मातृभाषेतून घेतलेले शिक्षण सर्वोच्च शिक्षण असते असे मत प्रसिद्ध सिनेअभिनेते व नाट्य कलावंत राहूल सोलापुरकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. याप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष जितेश चापसी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.मंचावर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य,जिल्हा संघचालक संजय अग्रवाल, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अप्पाराव यादव,भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाह अमरनाथ खुरपे,प्रा. चंद्रकांत मुळे,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजय गुरव,प्रविण सरदेशमुख, केशवराज प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष डॉ.मनोज शिरुरे,स्थानिक व्यवस्था मंडळ अध्यक्ष यशवंतराव देशपांडे तावशीकर,रेनिसन्स सीबीएससी स्कूलचे अध्यक्ष धनंजय तुंगीकर,शिशूवाटिका अध्यक्षा योगिनीताई खरे,आस्था संकुलाचे प्रमुख उमेश गाडे, जनसंपर्क अधिकारी राहूल गायकवाड,केशवराज माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक सुनिल वसमतकर,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव हेंडगे,रेनिसन्स सीबीएससी स्कूलच्या प्रधानाचार्या अलिशा अग्रवाल हे उपस्थित होते .
सोलापुरकर म्हणाले की,भाषेचं सामर्थ्य खूप मोठं असून प्रत्येक भाषेचं स्वतंत्र व्याकरण असतं. त्यानुसारच विचार करावा हे सांगताना त्यांनी माणसाच्या वयानुसार त्याला शिकवणारी बाराखडी फक्त मराठी भाषेतच असल्याचे सांगितले.आपल्या भाषेवर प्रेम करा.आपण सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेचे म्हणजेच पौर्वात्य आहोत म्हणून सूर्य ज्या दिशेला मावळतो त्या पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण न करता आपली संस्कृती व संस्कार जपा.आईवडिलांनी आपल्या इच्छा-आकांक्षा मुलांवर न लादता मुलांची क्षमता व आवडीनुसार त्याला निर्णय घेण्यास सांगावे.स्वतः फक्त मार्गदर्शकाची भूमिका बजवावी हे सांगितले. घरात राहून संपूर्ण कुटुंबाचं व्यवस्थापन सांभाळणारी,एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडणारी गृहिणी ही एखाद्या कंपनीच्या चेअरमन पदी बसलेल्या स्त्रीपेक्षाही मला श्रेष्ठ वाटते,असे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यानी कितीही मोठे यश मिळवले तरी आपले पाय जमिनीवरच राहतील.माता आणि मातृभूमी यांच्याप्रती सदैव कृतार्थ राहतील याचे भान ठेवावे असे मत व्यक्त केले. प्रारंभी मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील ४ तथा शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे १५७ गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे नूतन कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशात व जडणघडणीत शिक्षकांची मेहनत व एकीचे बळ ही भूमिका महत्त्वाची आहे,असे मत व्यक्त केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेश चापसी यांनी राष्ट्रभक्ती व संस्काराचे धडे देत विकास साध्य करणारी व सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था म्हणजे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आहे,असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे तर सूत्रसंचलन श्रीमती राजश्री कुलकर्णी व श्रीमती वैशाली फुलसे यांनी केले.आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर यांनी केले.संतोष बीडकर यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुनील वसमतकर, कार्यक्रम प्रमुख बालासाहेब केंद्रे, सहप्रमुख बबनराव गायकवाड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.यावेळी राजारामपंत बिलोलीकर,ॲड. विश्वनाथ जाधव,ॲड.जगन्नाथ चिताडे,माजी विद्यार्थी,सेवानिवृत्त शिक्षक,पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.