भक्तिमय वातावरणात निघाली शोभायात्रा
माध्यम वृत्तसेवा
लातूर ; दि. २५ (प्रतिनिधी )– टाळ मृदंगाचा नाद , झिम्मा फुगडी , भगवंताचे नामस्मरण आणि राधे राधेचा जयघोष करीत निघालेल्या शोभायात्रेने लातूरकरांचे लक्ष वेधले. अतिशय शिस्तबद्ध रीतीने काढण्यात आलेल्या या शोभायात्रेचे भाविक भक्तांनी गुलाबपुष्पाची उधळण करून स्वागत केले.
या शोभायात्रेत परमपूजनीय विद्यानंदजी महाराज बाबा आणि विविध प्रांतातून आलेले साधू संत , महंत सहभागी झाले होते. श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने राजीव गांधी चौक , रिंग रोड भागातील पंचमुखी मंदिर परिसरात परमपूजनीय. विद्यानंदजी सागर महाराज यांच्या भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे .दि. २५ डिसेंबर २०२२ ते १जानेवारी २०२३ या कालावधीत दुपारी १ ते ४ या वेळेमध्ये ही कथा होणार आहे .
या भागवत कथा ज्ञान यज्ञाचा प्रारंभ भव्य शोभायात्रेने झाला . आदर्श कॉलनीतील आदर्श कम्युनिटी हॉल येथून ही शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अग्रभागी अश्व , ब्यांडपथक होते. माता भगिनी डोकीवर तुळशीचा कळस घेऊन सहभागी झाल्या होत्या. या शोभायात्रेत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. भगव्या व पिवळ्या रंगाच्या साड्या महिलांनी परिधान केल्या होत्या. तर पुरुषांनी पिवळे व पांढरे कपडे , फेटे परिधान केले होते .भजनी मंडळ , लेझीम पथक , वासुदेव, गोंधळी आदीपथक या शोभायात्रेत लातूरकरांचे लक्ष वेधून घेत होते.
टाळ मृदंगाच्या तालावर फेर धरीत भाविक स्त्री-पुरुष ज्ञानोबा तुकाराम , राधे राधेचा जयघोष करीत , नृत्य करीत तल्लीन झाले होते. या कथेचे यजमान हरिप्रसाद मंत्री सपत्नीक डोकीवर भागवत कथेचा ग्रंथ घेऊन भक्ती भावाने तल्लीन झाले होते. मध्यभागी एका सजवलेल्या रथावर परमपूजनीय विद्यानंदजी सागर महाराज बाबा बसले होते . ठिकठिकाणी ते भाविकांना आशीर्वाद देत होते. भाविक त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतानाचे दृश्य यावेळी दिसून आले . सगळ्यात शेवटी विविध प्रांतातून आलेले साधू संत , महंतही एका सजवलेल्या रथामध्ये बसले होते .
जवळपास तीन तास मार्गक्रमण करून ही शोभायात्रा कथा मंडपात आली. यावेळी बाबांनी सर्वप्रथम गोमातेचे पूजन केले .यावेळी 21 ब्रह्मवृंदांनी मंत्र पठण केले. यानंतर बाबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मंत्रोच्चार व बाबांच्या जयघोषात सगळेजण कथा मंडपात आले. व्यासपीठावर आल्यानंतर मंत्रपठण , आरती करण्यात आली .18 यजमानांनी यावेळी आरतीत सहभाग नोंदवला. यावेळी विविध प्रांतातून आलेल्या साधू संतांचा संयोजन समितीच्या वतीने यथोचित सत्कार करून त्यांना वंदन करण्यात आले .यामध्ये प.पू. 1008 महामंडलेश्वर अभयानंद गिरीजी महाराज (परभणी ) ,प.पू .ह भ प राजेंद्र गिरीजी महंत ( देवताळा) प. पू. नित्यानंद गिरीजी महाराज ( शिर्डी) , प.पू. महंत गोपाळ पुरीजी (उस्मानाबाद ) ,प. पू. महंत स्वामी पूर्णानंद सरस्वतीजी , प. पू. महंत सुनील भारतीजी (हनुमान गड , राजस्थान ) , प.पू. महंत गोविंदानंद गिरीजी (हरिद्वार ) , प. पू. महंत बालकानंद गिरीजी महाराज (आंध्र प्रदेश ) आदींचा समावेश होता.
प्रारंभी संयोजक व समितीचे अध्यक्ष संजय बोरा यांनी प्रास्ताविक केले . प. पू. विद्यानंद सागर महाराज यांनी भागवत कथा आयोजना मागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अब्दुल गालिब शेख , प्रा.द्वारकादास मोटे यांनी केले. संजय बोरा , राजेश्वर बुके, विशाल जाधव, सुरेश पवार , हरिप्रसाद मंत्री, नरसिंह देशमुख, चंद्रकांत बिराजदार , गणपतराव बाजूळगे आदींनी यावेळी बाबांचे स्वागत केले. कथेच्या ठिकाणी भव्य दिव्य मंडपाची उभारणी करण्यात आली असून हजारो स्त्री पुरुष भावीक कथेत सहभागी झाले होते .यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले.