“यज्ञासारखे सनातन वैदिक कर्म हे मानव कल्याण व आत्मिक उत्थानाचा मार्ग आहे.
प.पू. विद्यानंदजी सागर महाराज यांनी भागवत कथेत केले स्पष्ट
लातूर ,दि. 14 ( वृत्तसेवा )-यज्ञ ,भागवत कथा, होम हवन आदी धार्मिक कार्य आदी कार्याची सध्या यंत्रयुगात वावरणाऱ्या प्रगत राष्ट्रातील लोकांना गरजच काय ? असा सवाल तथाकथित बुद्धिवादी उपस्थित करून हिंदू धर्माची हेटाळणी करतात ,परंतु यज्ञ, कथा, होम हवन ,कीर्तन आदी धार्मिक कार्य हे थोतांड नसून स्वतःच्याच उदर भरण्याला जीवन समजून जिवन जगत असलेल्या समाजाला जागृत करण्यासाठीचे आणि मानव कल्याणाचे ते एक उत्तम साधन आहे. हा एक धर्मयज्ञच आहे ; या धर्म यज्ञात प्रत्येकाने समर्पणाची आहुती टाकावी, असा हितोपदेश परमपूजनीय विद्यानंदजी सागर महाराज (बाबा )यांनी दिला .

श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग समिती लातूरच्या वतीने मानव कल्याण एवं विश्वशांतीसाठी लातूरमध्ये दि. 14 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत श्री श्री अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरूद्र महायाग एवं श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे .राजीव गांधी चौकातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात आयोजित या कथा ज्ञान यज्ञाची आजपासून सुरुवात झाली. दुपारी २ ते ५ या वेळात होणाऱ्या प.पू. विद्यानंदजी बाबा महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या पहिल्याच दिवशी जनसागर लोटला होता. यात महिला भाविक भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती .कथेस येणाऱ्या सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची (भोजनची ) व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
आपल्या अमोघ वाणीच्या आशीर्वाचनात पूजनीय बाबाजींनी यज्ञ ,होम ,हवन ,भागवत कथेचे महत्व अनेक उदाहरणे देत सविस्तराने विशद केले. ते म्हणाले की ,यज्ञ ,होम, हवन हे हिंदू संस्कृतीत अनादी कालापासून चालत आलेले आहे .पूर्वीच्या काळी ऋषीमुनी जंगलामध्ये होम हवन आदी यज्ञ कर्म करायचे .यज्ञ हा सनातन संस्कृतीचा मूळ प्राण आहे. यज्ञ हा भारतीय संस्कृतीचा मूल स्त्रोत आहे . यज्ञाला संस्कृती चा पिता तथा पुरातन पुरुष म्हटले जाते .पूर्वीच्या काळी मानव कल्याणासाठी अश्वमेध, पर्जन्यवृष्टी महायज्ञ सातत्याने केले जायचे त्याला राजाश्रयही मिळायचा ; परंतु हल्ली यज्ञादी कार्य,कार्य करण्यासाठी साधु संतांना पुढे यावे लागते .यज्ञ आदी कर्म हे तुमच्या आमच्या इच्छेने होत नाही त्यासाठी परमात्माची कृपा आणि इच्छा असावी लागते,तूम्ही आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. यासाठी आपण फक्त साधना,समर्पण धेय्यनिष्ठा ठेवून पूर्ण समर्पित व्हावे.
प.पू. विद्यानंदजी बाबा महाराजांनी कथेच्या पहिल्याच दिवशी तथाकथित शब्दज्ञानी लोकांना ही उपदेश केला.स्वतः शब्दज्ञानी असणारे हे लोक अनुभवापासून दूर असल्यामुळे आपल्या डोळ्याला झापड लावून वाटेल तसे बरळत असतात .चार पुस्तके वाचली म्हणजे कोणी ही ज्ञानी ठरत नाही. स्वतःच्या धर्माचे अनुकरण करायला अनेकांना लाज वाटते .आपल्या देशाची वैदिक परंपरा ही अपौरोषीय आहे .परंतु समजून न घेता केवळ टीका- टिप्पणी करण्यात काही वर्ग स्वतःला धन्य समजतात .
प्रारंभी पूजनीय विद्यानंद सागर महाराज व देशभरातून आलेल्या साधुसंतांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले .तसेच भागवत ग्रंथाचे ब्रह्मवंदांच्या मंत्रोच्चारामध्ये पूजन करण्यात आले. बाबांच्या या भागवत कथेस संगीतमय साथ मिळत आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी पूजनीय बाबांनी उपस्थितांची मने जिंकली ,असेच म्हणावे लागेल .याप्रसंगी व्यासपीठाचे पूजन देखील करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, सनातन धर्म की जय आदीचा जयघोष करण्यात आला.
