नंद के आनंद भयो ..जय कन्हैया लाल की ..हाती घोडा पालकी… जय कन्हैया लाल की …!
…आणि जणू कथास्थळी गोकुळच अवतरले
श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा हर्षोल्लासात मध्ये साजरा
लातूर;दि.१७( वृत्तसेवा ) -’नंद के आनंद भयो.. जय कन्हैया लाल की… हाती घोडा पालकी… जय कन्हैया लाल की …’ आदीच्या जयघोषणात आज लातूर नगरीमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या हर्षोल्लासात भक्ती -भावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .कथास्थळी जणू गोकुळ ,द्वारका अवतरली की काय याचा भास निर्माण व्हावा एवढे मंगलमय वातावरण यावेळी पहावयास मिळाले.

श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग समितीच्या वतीने लातूर शहरातील राजीव गांधी चौक पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात गातेगाव येथील श्री राधाकृष्ण मंदिर अध्यात्म आश्रमाचे परमपूजनीय विद्यानंदजी सागर महाराज( बाबा )यांची श्रीमद् भागवत कथा होत आहे बाबा आपल्या अमोघ वाणीने भागवत ग्रंथातील एक एक प्रसंग कथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत आहेत .त्यांच्या कथेला ग्रामीण भागातून येणारा भक्तवर्ग आणि विशेषतः महिला वर्ग मोठ्या प्रमाणात येतो त्यामुळे बाबाजी ग्रामीण भागातील भाविकांना त्यांच्या बोली भाषेत ,समजेल अशा भाषेत कथा सांगत आहेत. तसेच भारतभरातून आलेल्या साधुसंतांनाही कथा श्रवण करता यावी म्हणून अधून मधून हिंदी भाषेत देखील ते कथा सांगत आहेत.
आज कथेच्या चौथ्या दिवशी पूजनीय बाबांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवाची कथा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने सांगितली. श्रीकृष्ण लीला ,रासलीला, कृष्णनिती ,श्रीकृष्णाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आदीबाबतही कथा प्रवक्ते बाबांनी वेगळी मांडणी केली .श्रीकृष्ण लीला ,रासलीला , श्रीकृष्ण नीती खरी काय होती आणि आपण त्याकडे वेगळ्या दृष्टीने कसे पाहतो हेही त्यांनी यावेळी विस्ताराने सांगितले. परंतु हे बरोबर नाही, भगवान श्रीकृष्णावर आपला जीव ओवाळून टाकणाऱ्या गोपिका आणि आपले संपूर्ण जीवन श्रीकृष्णाला अर्पण करून श्रीकृष्णाला पती -परमेश्वर मानणाऱ्या मीरेचे नि:स्वार्थ प्रेम यावरही बाबांनी प्रकाशझोत टाकत अशी नि:स्वार्थ भक्ती, निर्लेप्रेम प्रत्येकाने जर करायचे ठरवले ;तसा प्रयत्न केला तर सध्या निर्माण होत असलेले अनेक प्रश्न चुटकी सरशी सुटतील.
परमपूजनीय विद्यानंदजी सागर बाबांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवाची कथा सांगत श्रोत्यांना जागेवर खिळवून ठेवले .यावेळी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या मंगलमय वातावरणात व हर्षउल्हासात साजरा करण्यात आला. कथास्थळी फुगे ,रोषणाई, सुशोभिकरण करण्यात येऊन सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण करण्यात आले होते .कथास्थळी पुरुष भारतीय वेशात तर महिला भगव्या, रंगीबेरंगी साड्या परिधान करून आल्या होत्या. जणू आपल्या घरी लग्नकार्य आहे याप्रमाणे माता -भगिनी नटून थटून आल्या होत्या .यावेळी भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो असे बाबा आपल्या कथेत सांगत होते त्यावेळी नंदबाबा आपल्या डोईवर एका बालकाला (श्रीकृष्णाच्या वेशभूषेत ) घेऊन व्यासपीठावर येतात हे दृश्य हजारो भक्तांनी प्रत्यक्ष जागेवर उभे राहून आपल्या डोळ्यात साठवले आणि पुष्पवृष्टी करीत श्रीकृष्णाचा जयघोष केला.

तत्पूर्वी संयोजन समितीचे अध्यक्ष हरिप्रसाद मंत्री यांनी सपत्नीक पूजनीय बाबांची पाद्यपूजा केली.
धर्माच्या रक्षणासाठी भगवान श्रीकृष्णाने मोहीनी रूप धारण करून देवतांना अमृत पाजले, वामन रूप धारण करून बळी कडून पृथ्वीदान रूपाने घेतली याचे वर्णन करीत पूजनीय बाबांनी भगवान श्रीराम जन्म कथा ,श्रीकृष्ण जन्माची कथा खूप सुंदर पद्धतीने सांगत प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्णाचे चरित्र भावीक भक्तांना त्यांना उलगडून सांगितले. श्रीकृष्ण लीलावर देखील त्यांनी विस्ताराने भाष्य केले .जेव्हा धर्माला ग्लानी येते ,सर्वत्र अनाचार ,अत्याचार वाढतो तेव्हा भगवान या पृथ्वीवर अवतार घेऊन धर्माचे रक्षण करतात असे बाबा आपल्या कथेत म्हणाले.

…चौकट…..
पाद्य पूजा व उचित सन्मान
यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष हरिप्रसाद मंत्री व सौ सविता मंत्री यांनी कथेच्या प्रवेशद्वारात बाबाजींची पाद्यपूजा केली .आजही गजराजाने कथा मंडपात येऊन बाबांना पुष्पहार अर्पण करून नमन केले .तत्पूर्वी कथास्थळी जाण्यापूर्वी संयोजन समितीचे सिद्राम जाधव यांनी सपत्निक बाबांची पाद्यपूजा केली. यावेळी बाबुराव शंकराव जाधव ,विजयमाला बाबुराव जाधव, संगीता सिताराम जाधव, प्रगती सिद्राम जाधव, सुधाकर काळे व वनिता काळे उपस्थित होते. आजच्या कथेच्या वेळी संयोजन समितीच्या वतीने हभप राधाताई पाटील (धुळे )यांचा संयोजक समितीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला .तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष हरिप्रसाद मंत्री, सचिव संजय बोरा आणि इतर सदस्यांनी पूजनीय बाबांचा सत्कार केला,

कृष्ण जन्म सोहळ्यात भारतभरातून आलेल्या साधुसंतांनी तसेच कथा प्रवक्ते विद्यानंदजी सागर बाबा यांनीही नृत्याचा फेर धरीत आनंदोत्सव साजरा केला .यावेळी बाबांनी सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माची बधाई दिली.श्रीकृष्ण बनलेल्या बाळाचे वडील अजय अनंतराव जाधव , आई निकिता अजय जाधव असे आहे. वासुदेव महाराजांनी आपल्या टोकरीतून बाल कृष्णाला व्यासपीठावर आणले यावेळी बाबांनी बाल कृष्णाला आपल्या मांडीवर बसून जन्मोत्सव साजरा केला.
