हैदराबाद, १३ मार्च २०२२:
श्री. प्रकाश धर्म यांच्या ‘श्रावणी इंद्रधनूचे झेले’ या कविता संग्रहाचा देखणा प्रकाशन समारंभ ५ मार्च २०२२ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, हैद्राबाद येथे संपन्न झाला. हैदराबाद मधील वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या मराठी भाषिक गुणवंतांच्या सत्काराचे येथील महाराष्ट्र मंडळाकडून श्री प्रकाश धर्म हे सन्मानित झालेले आहेत. ते व्यवसायाने वास्तुविशारद आहेत. मनोमन जोपासलेले छंद म्हणून सिने-नाट्य अभिनय, चित्रकला यातील त्यांचे कामही स्पृहणीय आहे.
या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवर डॉ. विद्या देवधर (अध्यक्ष,मराठी साहित्य परिषद,तेलंगणा) डाॅ. जयंत कुलकर्णी (डायरेक्टर,विज्ञान भारती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) श्री. खळदकर (अध्यक्ष,मराठी ग्रंथ संग्रहालय) आणि साहित्य कट्टा,हैदराबादचे मान्यवर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय अभिनव पध्दतीने झाली. सर्वसाधारणपणे कविता प्रकाशनाच्या सोहळ्यात कार्यक्रमाची सुरवात कविता वाचनानेच केली जाते. परंतु या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या कलाकारांनी मिळून सादर केलेल्या नाट्यरूपी कविता. आपण जणू काही नाटकालाच आलो आहोत असा आभास होण्याइतपत. तसेच, प्रेक्षकांच्या हृदयी उतरण्याइतपत उत्कट भावनेतून वाचल्या गेलेल्या काही कविता.
सर्वप्रथम सहा कलाकारांनी मिळून ‘प्रेमळ बायको’ ही एक मजेदार कविता नाट्यपूर्ण पध्दतीने सादर केली. प्रेमळ बायको नवऱ्याला म्हणते आता मी तुमची बायको नसून फुल टाइम प्रेयसी आहे. ही ‘टॅग लाईन’ घेऊन आलेल्या कवितेने प्रेमळ बायकोचे फुल्ल टाईम प्रेयसीत होणारे रूपांतर मोठ्या रंजकतेने उलगडून दाखविले.
‘कविता केली नाही’ ही कविता पण सहा कलाकारांकडून शाळकरी मुलांच्या वेशभूषेत सादर केली गेल्याने प्रेक्षकांची वाहव्वा मिळवून गेली.
‘मी घेतले गांधी रंगवायला’ ही थोड्या गंभीर प्रकृतीची कविता एका वेगळ्याच नाट्यमयतेने सादर केली गेली. प्रकाश धर्म हे सृजनशील चित्रकारही असल्यामुळे या कवितेच्या सादरीकरणात फाटका कॅनव्हास, गळफास, पेंटिंगची चौकट आणि विशेष प्रकाशयोजना यांचा वापर केला गेला. सात कलाकारांच्या उत्कट सादरीकरणामुळे प्रेक्षकांना एक विचार करायला लावणारी अनुभूती आली.
‘माझा रंग’ या कवितेत उधाण आलेलं आयुष्य मनसोक्त जगल्यावर ‘माझा रंग आता पिंगट, पारवा झाला आहे’ असं ते म्हणतात. पुढच्या ओळींमधून ते तसे आयुष्य जगण्याचा अनुभवही व्यक्त करतात.
त्यांनी काही abstract पेंटिंग प्रमाणे काही abstract कविता केल्या आहेत . या प्रकारच्या सादर केलेल्या कविता म्हणजे ‘खडक’, ‘गूढ मौनात’, ‘भटकलेली सावली’, ‘वहीच्या पानात’ आणि ‘विस्कटलेला’.
प्रकाश धर्म यांना गायन,वादनातही रस असल्याचे त्यांच्या ‘मोहनवीणा’ व ‘आताआताशा ‘ या कवितेतून जाणवत होते.
‘हिरवा हिरवा झालो’, ‘गुलमोहोर’, ‘किती जमवशील’, ‘बंदमूठ’ या कवितांमधून निसर्गाकडे वेगळ्याच दृष्टीने बघितल्याचे जाणवले.
‘जगण्याचं वेड’ ही कविता प्रकाश धर्म व त्यांच्या पत्नी उज्वला धर्म यांनी अतिशय उत्तम प्रकारे सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. या कवितेचा थोडक्यात आशय असा की, कवि त्याच्या प्रेयसीला म्हणतो, ‘माझ्या स्वप्नात जर तू आली असतीस तर, दिसले असते तुलाही त्या इंद्रधनूचे आगळेवेगळे रंग, माझ्या वर उधळलेले, पण तु आलीच नाहीस’…….त्यावर प्रेयसी म्हणते, ‘तुझ्या प्रत्येक स्वप्नांत तुझ्याच सावली खाली लपून आहे मी. आजही तुझ्या जगण्याच ओझं, माझं वेड झालंय…..पण तू आलीच नाहीस…….’
सादरीकरणाला नितीन बसरूर यांनी उत्तम संगीत साज चढवल्याने कार्यक्रम अधिक उठावदार झाला
या सादरीकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे सादरीकरण करणारे सर्व कलाकार- प्रकाश धर्म, प्रकाश फडणीस, गिरीश मोंडकर, पुष्कर कुलकर्णी, प्रवीण कावडकर, माधव चौसाळकर, प्रणव घारीपुरीकर, व्यंकटेश कुलकर्णी, अवधूत कुलकर्णी, सुहास बर्वे, कविता वारके, सुप्रिया आगाशे, श्रुती काकडे, वैशाली केळकर , उज्वला धर्म, नितीन बसरूर हे सगळे साहित्य कट्टा, हैदराबाद चे सदस्य आहेत.
सादरीकरणानंतर ‘श्रावणी इंद्रधनूचे झेले’ या कविता संग्रहाचे रीतसर प्रकाशन मान्यवर डाॅ. जयंत कुलकर्णी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा डाॅ.विद्याताई देवधर , मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष श्री. खळदकर यांच्या हस्ते झाले.
डाॅ.जयंत कुलकर्णी आपल्या भाषणात म्हणाले की, प्रकाश धर्म यांचे लेखन समजून घ्यायला ते बऱ्याच वेळा वाचावे लागते व त्या नंतर अर्थबोध होतो. आज प्रकाश धर्म आणि साहित्य कट्टा हैदराबाद च्या कलाकारांनी, प्रकाश धर्म यांच्या शब्दांचा अर्थ आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सादरीकरणावर जी मेहनत घेतली,ती निश्चित कौतुकास्पद आहे…….
प्रकाश यांच्या ‘श्रावणी इंद्रधनूचे झेले ‘ या पुस्तकाच्या कव्हर पेज वर तुम्हाला दोन दगड, दोन पक्षी, दोन सूर्य असे लिहिलेले दिसते. चित्रात दोन पक्षी व दोन दगड दिसतात पण सूर्य दिसत नाही आणि प्रकाश तर म्हणतो दोन सूर्य . आता याची संगती प्रत्येकजण आपापल्या बुध्दी/प्रतिभे प्रमाणे लावू शकतो. हेच प्रकाशच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे की तो वाचकाला आपापल्या परीने विचार करायला भाग पाडतो. राम शेवाळकर यांचा एका भाषणाचा संदर्भ देत जयंतराव म्हणाले की खरा कलाकार तुम्हाला अष्टमीच्या चंद्रा पर्यंत घेऊन जातो व पुढे पौर्णिमेचा चंद्र कसा रंगवायचा हे वाचकावर सोडून देतो. उदाहरणार्थ ते म्हणाले प्रकाश म्हणतो ‘ मधाळ मासा, खाऱ्या समुद्राच्या पाण्यात विरघळतो’. आता वाचक विचार करायला लागतो,मासा मधाळ कसा? साधारणपणे मासा पोहतो तर याने विरघळतो लिहिले याचा अर्थ काय? जयंतराव यांनी त्यांना लागलेला अर्थ छान उलगडून दाखवला. आणि म्हणाले, “मला प्रकाशला हेच म्हणायचे होते की नाही हे माहिती नाही. हीच खरी प्रकाशच्या कवितेची मजा आहे. तो लिखाणात गाठी मारून ठेवतो व वाचकांना त्या सोडवायचा आनंद देतो”.
डाॅ.जयंत कुलकर्णी यांनी या पुस्तकातील एका कवितेचा संदर्भ दिला. शब्द आहेत….
अरे, बासऱ्या तर
सगळेच आळीपाळीने वाजवतात
पण
ज्यातून कृष्णधून निघते
फक्त
राधा तिथेच मोहित होते.
आता ‘आळीपाळीने’ हाच शब्द प्रकाशने का वापरला असेल हे कोडे श्रोत्यांना घालून पुढे त्यांनी त्यांना काय वाटते ते सांगितले.
डॉ. जयंत कुलकर्णी यांचे भाषण ऐकणे ही नेहमीच एक मेजवानी असते हे मात्र खरं.
प्रकाश धर्म यांच्या काही मित्रांच्या, क्लायंटच्या, सहकाऱ्यांच्या तसेच पेंटिंगच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छांची चित्रफीत दाखवली गेली.
डाॅ. विद्याताई देवधर यांनी पण प्रकाश धर्म आणि साहित्य कट्टा कलाकारांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले. प्रकाश व उज्वला धर्म यांच्या सामाजिक जाणीवांविषयी पण त्यांनी या दोघांचे विशेष कौतुक केले. ‘वाचू आनंदे’ या उपक्रमा अंतर्गत हे गरीब मुलांना गोष्टी वाचून दाखवतात, त्यांना पुस्तके वाटतात, त्यांच्या कडून गोष्टी वाचून घेतात. सुबक हस्ताक्षराबद्दल पण मार्गदर्शन करतात. डॉ.विद्याताई यांनी पण या पुस्तकातील एक कविता म्हंटली व त्याचे रसग्रहण त्यांच्या भाषणातून केले.
प्रकाश धर्म आपल्या मनोगतात म्हणाले, माझ्या कवितेवर दिलीप चित्रे व ग्रेस या कवींचा प्रभाव आहे. मी या दोन कवींना माझ्या तरूणपणी ओळख नसतांनाही घरी जाऊन भेटलो होतो. ग्रेस यांच्या घरी तर मी पहिल्या भेटीतच साडे आठ तास त्यांच्या़शी गप्पा मारीत होतो. या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाबद्दलच्या भावनांनी मी अतिशय भारावून गेलो आहे, त्यामुळे मी त्या आज व्यक्त करणार नाही.
सुप्रिया आगाशे हिने कार्यक्रमाचे निवेदन खूप छान पद्धतीने केले.
आभार प्रदर्शन प्रकाश फडणीस यांनी केले .
प्रकाश धर्म यांची प्रत्येक कला कवितेच्या रुपाने बाहेर आल्यामुळे कविता सादरीकरणातून विविध कलांचे इंद्रधनु प्रेक्षकांना बघायला मिळाले हे मात्र खरं.
- अरूण डवलेकर आणि गिरीश मोंडकर