श्रद्धांजली…अमित देशमुख

0
314

दिलीपकुमार यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान सदैव स्मरणात राहील

-सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी वाहिली श्रद्धांजली

 

मुंबई, दि. ७ –

आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून बॉलिवूडच नाही तर जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान सदैव स्मरणात राहील, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

शोकसंदेशात श्री. देशमुख यांनी म्हटले आहे की, १९४४ मध्ये बॉम्बे टॉकिजची निर्मिती असलेल्या ‘ज्वार भाटा’ चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले, यानंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. आपल्या दर्जेदार अभिनयातून विविध अविस्मरणीय चित्रपट केले, त्यातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. बेस्ट ॲक्टरसाठी सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड जिंकण्याचे रेकॉर्डही दिलीपकुमार यांच्याच नावावर आहे.अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमुना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर यासारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिलीपकुमार यांनी केवळ अभिनयच केला नाही तर त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीदेखील केली.

 

१९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड केला. एकापेक्षा एक सरस आणि दर्जेदार चित्रपटांतून अभिनय करणाऱ्या दिलीपकुमार यांचे चित्रपट सृष्टीतील योगदान हे अनन्यसाधारण असून त्यांचा अभिनय सदैव स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त करून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here