17.2 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसांस्कृतिक*'शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमालेची यशस्वी सांगता*

*’शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमालेची यशस्वी सांगता*

मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व मिळाले-ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख
• ■मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास बहुआयामी आणि प्रेरणादायी■
•● मुक्तिसंग्राम हा फ्रेंच क्रांती इतकाच ताकदीचा लढा

लातूर, दि. 15( वृत्तसेवा ) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास हा अतिशय ज्वलंत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्या इतकाच मराठवाडा मुक्तिसंग्रामही महत्वपूर्ण आहे. मुक्तिसंग्रामामुळे हैदरबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त झाल्याने भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व मिळाले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी श्री. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा होते.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष ऍड. मनोहरराव गोमारे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उद्योजक शिवशंकर लातुरे, सनदी लेखापाल महेश मालपाणी, बी. आर. पाटील, भाऊसाहेब उमाटे यावेळी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य लढा हा ब्रिटीशांविरुद्ध लढला गेलेला राजकीय लढा होता. मात्र, ब्रिटीशांच्या तुलनेत अनेकपटीने जुलमी असलेल्या सरंजामशाही वृत्तीच्या निजामाविरुद्ध लढला गेलेला मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा हा अतिशय कठीण होता. हैदरबाद संस्थानावर निजामाचे अनेक वर्षे राज्य असल्याने येथील नागरिकांची धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गळचेपी मोठ्या प्रमाणात झाली. याविरुद्ध सर्वसामान्य जनतेने उभारलेल्या या लढ्याला म्हणून वेगळे महत्व आहे. आर्य समाजाने या लढ्यात अतिशय मोलाची भूमिका बजाविली. या लढ्यात, आंदोलनात मोठ्या प्रमाणात आर्य समाजातील लोकांना तुरुंगवास झाला. वेदप्रकाश हे आर्य समाजाचे पहिले हुतात्मा ठरले. त्यानंतर अनेकांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी बलिदान देत निजामाची राजवट उलथून टाकण्यासाठी आपले योगदान दिले, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास अतिशय प्रेरणादायी असून भावी पिढीने आपल्या भूमीचा हा इतिहास अभ्यासाला पाहिजे. जो आपला इतिहास विसरतो, तो भविष्य घडवू शकत नाही, हे लक्षात ठेवून प्रत्यकाने मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास समजून घ्यायला हवा. तसेच मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना सिंहावलोकन करणेही तितकेच महत्वाचे असल्याचे श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी हैदरबाद संस्थानमधील मराठी, हिंदी आणि तेलगु भाषिक नागरिकांनी दिलेल्या लढ्याविषयी त्यांनी माहिती दिली. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांच्यासह विविध व्यक्तींशी संबंधित घटना, लातूरमध्ये झालेली दुसरी महाराष्ट्र परिषद, महिला परिषद यासह हैदरबाद स्टेट कॉंग्रेस, ऑपरेशन पोलो याविषयी त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा उदारमतवादी भूमिकेतून गेला : पन्नालाल सुराणा

सरंजामी वृत्तीच्या निजामाच्या जोखडातून मुक्त होवून लोकशाहीची जोपासना करण्यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढला गेला. अन्यायी, जुलमी राजवटीत होणाऱ्या जुलूम, अत्याचाराचा सूड उगविण्यासाठी नव्हे, तर सर्व समाज घटकांना आपले हक्क, अधिकार मिळायला हवेत, या उदारमतवादी भावनेतून हा लढा लढला गेला, असे ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये फुट पाडण्यासाठी निजामाने दलित बंधावानाचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्कालीन दलित नेत्यांनी त्याला दाद दिली नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही दलितांना निजामाविरुद्ध लढण्यासाठी मार्गदर्शन करून लढ्यात सहभागी होण्यास सांगितले. या लढ्यामध्ये विद्यार्थी, महिला यांचे महत्वपूर्ण योगदान होते. सरंजामशाहीपासून मुक्तिसाठी सर्व समाजाने अतिशय ताकदीने लढा दिला. त्यामुळे हैदरबाद संस्थानातील सर्वसामान्य जनतेला लोकशाहीचा मार्ग खुला झाला, असे श्री. सुराणा यांनी यावेळी सांगितले. तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित व्याख्यानमालेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. विद्यालयीन आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. पुढील पिढीपर्यंत मुक्तिसंग्रामाचा इतिहास पोहचावा, हा यामागील उद्देश होता, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यावेळी म्हणाल्या. तसेच जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, इतिहास अभ्यासक तथा व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक भाऊसाहेब उमाटे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. बी. आर. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमालेतील वक्ते, समन्वयकांचा सन्मान

जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ या व्याख्यानमालेमध्ये जिल्ह्यातील विविध विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 75 व्याख्यानांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत 87 व्याख्याने झाली आहेत. या व्याख्यानमालेत योगदान देणारे व्याख्याते, समन्वयक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, इतिहास संशोधक भाऊसाहेब उमाटे, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, इतिहास अभ्यासक विवेक सौताडेकर, साहित्यिक धनंजय गुडसूरकर, प्रा. अर्जुन सोमवंशी, प्रा. डॉ. भूषण जोरगुलवार, प्रा. डॉ. सुनील पुरी, प्रा. डॉ. सदाशिव दंदे, प्रा. डॉ. अर्चना टाक, प्रा. डॉ. नारायण सूर्यवंशी, प्रा. डॉ. अशोक नारनवरे, प्रा. डॉ. जयद्रथ जाधव, प्रा. डॉ. ओमशिवा लिगाडे, प्रा.डॉ.सचिन हंचाटे, प्रा.डॉ.संजय तोंडारकर, साहित्यिक सतीश हानेगावे, प्रा. श्रीहरी वेदपाठक, डॉ. नरसिंग वाघमोडे, डॉ. हर्षवर्धन प्रकाशवीर आर्य, प्रा. डॉ. द.मा.माने, रमेश चिल्ले, प्रा. डॉ. प्रमोद चव्हाण यांनी व्याख्याते म्हणून जबाबदारी पार पाडली.

मुख्य समन्वयक म्हणून भाऊसाहेब उमाटे, डॉ. बी. आर. पाटील, रमेश चिल्ले यांनी तर तालुका समन्वयक म्हणून दिलीप कानगुले, चव्हाण व्ही.बी., सतीश गंपले, धनंजय गुडसूरकर, नारायण चिटबोने, गोविंद गजभार यांनी काम पहिले.


1 COMMENT

  1. सुंदर कव्हरेज दिले आहे.धन्यवाद सर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]