◆मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणजे मराठवाड्याच्या अस्मितेचा लढा◆
- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
- ◆शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमालेचे उद्घाटन ◆
- ■ मुक्तिसंग्रामातील लातूरच्या योगदानाचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार ■
लातूर, दि. 11( वृत्तसेवा ): अन्यायकारक निजाम राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी देण्यात आलेला लढा हा मराठवाड्याची अस्मिता आहे. या लढ्याचा इतिहास या भूमीत जन्मलेल्या प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. हा लढा आणि या लढ्यातील लातूर जिल्ह्याचे योगदान भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मुक्तिसंग्रामातील वीरांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा पुढील पिढीला समजावी, यासाठी जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व बाबासाहेब परांजपे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव गोमारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, डी. एन. शेळके, मुख्याधापक एस. एम. वाघमारे यावेळी यावेळी उपस्थित होते.
इतिहास हा भविष्याचा वेध घेणारा असतो, आपण ज्या भूमीत राहतो, तेथील इतिहास आपण जाणून घ्यायला हवा. आपल्या भूमीला अन्यायकारक राजवटीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्रामात अनेक शूरांनी हौतात्म्य पत्करले. त्यांचा इतिहास आपल्याला देश, समाजाप्रती समर्पण, त्याग शिकविणारा असून या इतिहासापासून प्रेरणा घ्यावी. सर्वांनी आपल्या मनात माणुसकीची ज्योत तेवत ठेवून देशासाठी, समाजाच्या कल्याणासाठी कर्तव्य भावनेने काम करून विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षातील उपक्रमांत सहभाग नोंदवा : श्री. सागर
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे ऐतिहासिक महत्व खूप वेगळे आहे. या लढ्याचा इतिहास विद्यार्थ्यांना माहिती व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यापुढेही विविध उपक्रम आयोजित केले जाणार असून यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अनेक महत्वाचे लढे लातुरात झाले- श्री. उमाटे
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही चार मोठ्या संस्थानांनी भारतामध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यामध्ये हैद्राबाद संस्थानाचाही समावेश होता. संस्थानाचे विलीनीकरण व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरु होतेच, सोबत या संस्थानातील नागरिकांनीही लढा उभारला. यामध्ये लातूर जिल्ह्यातही अनेक महत्वपूर्ण लढे लढले गेले. किसान दलाने लढलेला हत्तीबेटचा लढा, लातूरच्या गंजगोलाई येथील टॉवरवरील असफशाही ध्वज उतरवून तिरंगा फडकविल्याची घटना, रझाकार, मुक्तिसंग्रामातील पहिले हुतात्मा वेद प्रकाश, आर्य समाजाचे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील योगदान याविषयी श्री. उमाटे यांनी विस्तृत माहिती दिली.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास भावी पिढीने समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे व्याख्याते भाऊसाहेब उमाटे यांनी सांगितले. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करताना या संग्रामातील महत्वाच्या घटनांचा इतिहास सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रास्ताविकात ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमालेबाबतची भूमिका विशद केली. डॉ. बी. आर. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*****