डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार
लातूर, दि. १९ – उच्च शिक्षणातील बदलते नव तंत्रज्ञान आणि माहितीची देवाण-घेवाण करुन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर यांच्यात बुधवारी शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरिंग विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर आणि दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश एस. दरगड यांनी या करारावर स्वाक्षर्या केल्या.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूलचे प्रमुख डॉ. सुनील कराड, प्रा. प्रकाश माईनकर, ईएनटीसी विभागाचे प्रा. नाथराव जाधव, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सिध्देश्वर बेल्लाळे, डॉ. ललित ठाकरे, डॉ. ब्रीजमोहन दायमा, डॉ. रविंद्र सोळंके व डॉ. विश्वनाथ मोटे हे उपस्थित होते.
या करारानुसार विद्यार्थ्यांना रोबोटिक डिझाईन मध्ये इंटरफेसिंग व प्रोग्रामिंगसाठी काम करता येईल, शिक्षण आणि उदयोगातील चालू वापरावर संकाय विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांना कार्यशाळेसाठी तंत्रज्ञानाचे व्यासपीठ निर्माण करणे, हुशार विद्यार्थ्यांना रोबोटिक थ्रीडी प्रिटिंग, कृत्रिम बुद्धीमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ टिचिंग उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांसाठी उद्योग क्षेत्रातील सध्याच्या बदलत्या परिस्थितीचे ज्ञान देणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नवनिर्मिती आणि फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम आदींचा या करारात समावेश आहे.
डॉ. प्रसाद खांडेकर म्हणाले, या सामंजस्य करारातील कार्यशाळा आणि तज्ञांच्या व्याख्यानामुळे तसेच, नवीन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. विज्ञान महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांना रोबोटिक्सबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल. दोन्हीं संस्थेचे प्राध्यापक एकत्रितपणे संशोधन करतील. या करारांतर्गत एमआयटी डब्ल्यूपीयूव्दारे उद्योगातील सध्याच्या ट्रेंडवर कार्यक्रम घेतले जातील. याचा नक्कीच विद्यार्थ्यांना आपले भावी करिअर घडविण्यासाठी उपयोग होईल. हा करार ५ वर्षांसाठी करण्यात आला आहे. सदरील करार वाढविणे अथवा संपुष्टात आणणे हे दोन्ही संस्थांच्या संमतीने ठरविले जाईल.
यावेळी डॉ.जयप्रकाश एस. दरगड म्हणाले, आमच्या महाविद्यालयाबरोबर एमआयटी डब्ल्यूपीयूचा होत असलेला करार हा ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे. त्यांना अदयावत तंत्रज्ञान शिकण्यास मिळणार आहे. वैश्विक स्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी त्यांना मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स हा विषय शिकणार्या विद्यार्थ्यांना सर्किंट डिझाईन आणि इंटरफेसिंग टेक्निकच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखविण्याची व करिअर करण्याची संधी मिळेल. संगणक विभागातील विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग कौशल्य व आधुनिकीकरणा सारख्या क्षेत्रात करिअर घडविता येईल. संशोधनाच्या क्षेत्रात सहभागी होऊन आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. त्यासोबतच औद्योगिक क्षेत्रात पर्दापण करता येईल. फॅकल्टी एक्सचेंजच्या माध्यमातून प्रशिक्षण, नवनिर्मिती आणि मार्गदर्शनही मिळेल.
फोटो ओळ डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार झाला. त्याप्रसंगी डावीकडून डॉ. विश्वनाथ मोटे, डॉ.सुनिल कराड, डॉ. जयप्रकाश दरगड, डॉ. प्रकाश माईनकर, प्रा. नाथराव जाधव, डॉ.सिध्देश्वर बेल्लाळे व डॉ. ललित ठाकरे.