एकाच दिवशी मतदारसंघातील ४०० किलोमीटर लांबीच्या शेतरस्ते कामाचे होणार शुभारंभ..
औसा – औसा विधानसभा मतदारसंघात शेत तिथे रस्ता या अभियानाच्या यशस्वी वाटचालीतून अल्पावधीत एक हजार किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे शेतरस्ते कामे पूर्ण झाली असताना आता मातोश्री शेत/पाणंद व मनरेगातून शेतरस्ते या कामाच्या तिसऱ्या टप्याचा शुभारंभ २५ डिसेंबरला दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांच्या हस्ते होणार असून एकाच दिवशी मतदारसंघातील २०० किलोमीटर लांबीच्या शेतरस्ते कामाचे मजबुतीकरण व २०० किलोमीटर लांबीच्या शेतरस्ते मातीकाम आशा ४०० किलोमीटर लांबीच्या शेतरस्ते कामाचा शुभारंभ केले जाईल अशी माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.

दि. १९ सप्टेंबर रोजी औसा येथील प्रशासकीय इमारतीत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., औशाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, निलंगा उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, औशाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी, निलंगा तहसीलदार सुरेश घोळवे, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने, आदीसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.शेतरस्ते कामांना गती देऊन यावर्षी नकाशावरील सर्व उर्वरीत शेतरस्ते प्रशासनाने मोकळे करुन द्यावेत. असे निर्देश आ. अभिमन्यू पवार यांनी या बैठकीत दिले.यावेळी प्रामुख्याने गाव तिथे स्मशानभूमी या उपक्रमातून मतदारसंघातील स्मशानभूमी संदर्भात आढावा घेण्यात आला यामध्ये जिथे स्मशानभूमी ला जागा नाही आशाठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पर्यायी गायरान, वनविभाग व खाजगी जमिनीसाठी प्रस्ताव सादर करावे.सदरील प्रस्ताव परिपूर्ण असावेत यामध्ये स्मशानभूमी च्या खाजगी जमिनीच्या भुसंपादनासाठी जनसुविधा अंतर्गत पंधरा लाखापर्यंत निधीची तरतूद केली जाईल. यासाठी प्रस्ताव सादर करावेत. तसेच स्मशानभूमी संरक्षण भिंतीसाठी बांबूची लागवड करावी. यासाठी मनरेगातून अनुदान मिळते तसेच यामुळे बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळेल.सरंक्षण भिंतीसाठी वापरण्यात येणारा निधी स्मशानभूमी अंतर्गत विकास कामाला वापरण्यात यावा.ज्या स्मशानभूमीला रस्ता, शेड, पाण्याची व्यवस्था, पेव्हर ब्लॉक आदीसाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव संबंधित ग्रामसेवकांनी सादर करावा त्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल.असे सांगून ज्या स्मशानभूमीला नाला /नदी ओलांडून जायचे असेल तर यासाठी रस्त्याला लागणारा निधी जनसुविधा, आमदार किंवा खासदार फंडाचा वापर करून पुर्ण करण्यात यावा असे निर्देश प्रशासनाला आ. अभिमन्यू पवार यांनी या बैठकीत दिले.

या बैठकीत आ. अभिमन्यू पवार यांनी फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांना जनावरांचे गोटे देण्याच्या सूचना देऊन असा एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहाता कामा नये असे सांगून ज्याठिकाणी सहकारी संस्था अथवा कारखान्याच्या जागा उपलब्ध आशाठिकाणी मोठ्या प्रमाणात सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्ष लागवड करण्यात यावे.औसा विधानसभा मतदारसंघातील साठवण तलाव, शेततळे, वनविभाग आदी विषयांवर संबंधित विभागाचा आढावा या बैठकीत आमदार अभिमन्यू पवार यांनी घेतला.
सेवा पंधरवाडा निमित्ताने विविध प्रमाणपत्राचे वाटप..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होत असलेल्या सेवा पंधरवाडा निमित्ताने आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते नागरिकांना शिधापत्रिका, उत्पन्नाचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र, फेरफार व सातबारा तसेच रहिवासी आदी प्रमाणपत्राचे वाटप यावेळी करण्यात आले.