30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeकृषी*शेतकऱ्यांनी निश्चित राहावे सरकार आपल्या पाठीशी - आ. अभिमन्यू पवार*

*शेतकऱ्यांनी निश्चित राहावे सरकार आपल्या पाठीशी – आ. अभिमन्यू पवार*

 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने मदतीसाठी प्रयत्न सुरू – आ. अभिमन्यू पवार 

औसा – शासकीय नियमात ढगफुटी व गोगलगायमुळे नुकसान झाल्यास मदतीची तरतूद नसल्याने याबाबत झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये गोगलगाय प्रादुर्भावाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी माझ्या मागणीवरून वेगळे परिपत्रक काढायचे मान्य होत आहे.तर खरडुन गेलेल्या जमिनीसाठी एनडीआरएफ च्या माध्यमातून तसेच ढगफुटीने नुकसानीसाठी संततधार पावसांच्या नियमाने मदत होईल.याचबरोबर विमा नियमानुसार अपेक्षित उत्पन्नात सरासरीच्या पन्नास टक्के घट असल्यास पन्नास टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याचा नियम आहे. या नियमानुसारही शेतकऱ्यांना मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांनी निश्चित राहावे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.असा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांशी बोलताना व्यक्त केला आहे. 

                    दि. ६ आॅगस्ट रोजी आ. अभिमन्यू पवार यांनी पोमादेवी जवळगा, हसलगण, सारणी, नांदुर्गा, मंगरूळ, गुबाळ आदी ठिकाणी शंखी गोगलगाय, ढगफुटी व संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहाणी केली. या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी पाटील, औसा तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, सार्वजानिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सारडा, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, सरचिटणीस संजय कुलकर्णी, माजी जि. प. सदस्य बंकट पाटील, किल्लारी कारखान्याचे माजी संचालक युवराज बिराजदार, परिक्षीत अभिमन्यू पवार, तुराब देशमुख, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन अनसारवाडे, बालाजी सुर्यवंशी आदी उपस्थित होते.यावेळी आ. अभिमन्यू पवार पुढे बोलत होते की २०१७ मध्ये विदर्भात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे नुकसान झाले होते.त्यावेळी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वेगळ्या परिपत्रकाव्दारे शेतकऱ्यांना मदत दिली होती.याच धर्तीवर लातूर जिल्ह्य़ात शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेगळे परिपत्रक काढून मदत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. याव्दारे व अन्य वेगवेगळ्या मार्गाने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यात शेतकरी हिताचे सरकार आले आहे.हे सरकार येताच जलयुक्त शिवार ,सौरउर्जा योजना, शेतीमधील वीजजोडणी आदी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनेबद्दल पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला.औसा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जलयुक्त शिवार योजनेला गती देण्याचे काम हाती घेण्यात येईल यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी किल्लारी साखर कारखाना लवकर सुरू करण्याबाबत हालचाली सुरू होतील. असे त्यांनी सांगितले.यावेळी संबंधित गावातील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, सरपंच, उपसरपंच व शेतकरी उपस्थित होते. 

जलयुक्तमुळे लातूर जिल्हा टॅकरमुक्त… 
 राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर जिल्ह्य़ात जलयुक्त शिवार अभियानातून मोठ्या प्रमाणात कामे केली होती. या कामामुळे जलस्रोतात मुबलक पाणी साठा उपलब्ध होवू शकल्याने लातूर जिल्हा आज टॅकरमुक्त झाला असून राज्यात पुन्हा शेतकरी हिताचे सरकार आल्याने हि योजना पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी प्रत्येक गावांनी हि योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]