शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध
आ. ज्ञानराज चौगुले व आ. अभिमन्यू पवार यांचे प्रतिपादन
निलंगा -( वृत्तसेवा )- येणाऱ्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना बारा तास वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्या अनुषंगाने राज्याचे काही योजना आणल्या असून जास्त वीज निर्मिती झाली तर शेतकरी वर्गाला आर्थिक मदत होवू शकणार आहे.शेतकरी राज्य शासनाला आपली पडीक जमीन ३० वर्षासाठी भाडेतत्त्वावर देतील त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार एकरी पन्नास हजार रुपये देणार आहेत.त्याचबरोबर त्या जागेत शासनाकडून सौर पंप लावले जातील आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे.व या व्यतिरिक्त पुढील तीस वर्षेपर्यंत या शेतकऱ्याला एक एकर मागे ५० हजार रुपये भेटत राहणार आहेत. तसेच या रकमेत पुन्हा वाढ होईल यासह अन्य योजनेतून राज्य सरकार शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ. ज्ञानराज चौगुले व आ. अभिमन्यू पवार यांनी केले आहे.
व्हि.ई.एच.रिन्यूएबलस एनर्जी प्रा लिमिटेड १२५ मेगावॉट पवनऊर्जा प्रकल्प कासारसिरसी (ता.निलंगा) च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.(दि.९) आॅगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमास व्यवस्थापकीय संचालक सिफि टेक्नॉलॉजीचे राजू वेगेसना, मुख्य वित्त अधिकारी व कार्यकारी संचालक सिफि टेक्नॉलॉजी एम.पी.विजयकुमार, व्यवस्थापकीय संचालक व्हायब्रेट एनर्जी श्रीनिवास विश्वनाथन, मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायब्रेट विनयकुमार पब्बा, भाजपचे कासारसिरसी मंडळाध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे,सरपंच सोनाली मडूळे, गोरख होळकुंदे, धनराज होळकुंदे,नितिन पाटील, विरेश चिंचनसुरे,ज्ञानेश्वर मडूळे, जिलानी बागवान, अरविंद कदम, अनिस बागवान, नाना धुमाळ, ओम बिराजदार, वैजनाथ पसारे, विठ्ठल गुत्ता आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना आवश्यक वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार वेगवेगळ्या योजनेतून प्रयत्न करीत आहेत. या सरकारने अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत भर पडणार आहे केंद्र व राज्य सरकारच्या या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी दोन्ही आमदारांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश तुळजापूरे यांनी केले तर पवनऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून आ. ज्ञानराज चौगुले व आ. अभिमन्यू पवार यांचे या प्रकल्प उभारणीसाठी मोठे सहकार्य मिळाल्याचे नमूद केले.