दसरा, दिवाळी गोड होणार की नाही, याची शेतकऱ्यांना चिंता
लातूर : गोगलगायींचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी, संततधार पाऊस या एकामागून एक आलेल्या संकटांमुळे यंदा राज्यासह लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सरकारने ओला दुष्काळ जाहीर न करता आर्थिक मदत जाहीर केली. पण, तीही अद्याप शेतकरी बांधवांना मिळाली नाही. सरकार ही मदत ‘गोगलगायी’च्या गतीनेच देणार आहे का, असा सवाल ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी सोमवारी उपस्थित केला.
खरीप हंगामातील पेरण्या झाल्यानंतर संततधार पाऊस झाला. त्यामुळे सुरवातीलाच मोठे नुकसान झाले. त्यातच गोगलगायीचा प्रादुर्भाव सुरू झाला. गोगलगायीनी सोयाबीनसह इतर पिके फस्त केली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार तर काहींना तिबार पेरण्या कराव्या लागल्या. हे संकट संपते न संपते तोच येलो मोझॅक रोगाने डोके वर काढले आणि अतिवृष्टीही सुरू झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.
याबाबत लातूरचे माजी पालकमंत्री श्री. अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी वेळोवेळी राज्य सरकारकडे प्रश्न उपस्थित केले. पावसाळी अधिवेशनातही महविकास आघाडीतील नेत्यांनी आंदोलन करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. याची दखल घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली. पण, ती सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्याना सरसकट जाहीर केली नसल्याने ग्रामीण भागात संभ्रमावस्था वाढली आहे.
सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप शेतकरी बांधवांना मिळाली नाही. दसरा, ईद, दिवाळी हे सण जवळ आले आहेत. या सणांची तयारी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना करता यावी, त्यांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलीत व्हावी म्हणून तरी सरकारने लवकर पावले उचलून मदत देणे अपेक्षित आहे, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.—-चौकट :पशुपालकांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही
लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लंपी स्कीन रोगाची साथ पसरल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या रोगामुळे २० पेक्षा अधिक पशुधनाचा मृत्यू झाला असून शासनाकडून अद्याप संबंधित पशुपालकांना नुकसान भरपाई मिळाली नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा कधी मिळणार, याकडेही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी लक्ष वेधले.—