आमदार धिरज देशमुख यांची पालकमंत्र्यांकडे मागणी; लातूर ते टेंभुर्णी आणि खरोळा फाटा ते पानगाव रस्ता मार्गी लावावा
लातूर : अतिवृष्टी व संततधार पावसातून बचावलेल्या पिकांचे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सरसकट भरीव आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी गुरुवारी पालकमंत्र्यांकडे केली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार श्री. धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध विषय उपस्थित केले.
‘लातूर ग्रामीण’मध्ये यंदा अतिवृष्टी, संततधार पाऊस आणि गोगलगाय प्रादुर्भाव या संकटांमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, ऊस, फुले, फळभाज्या, पालेभाज्या यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. पण, सरसकट भरीव आर्थिक मदत मिळाली नाही. आता परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकरी बांधवांना सरसकट भरीव मदत करावी, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.
आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, लातूर ते टेंभुर्णी आणि खरोळा फाटा ते पानगाव हे दोन्ही रस्ते लातूरकरांसाठी अत्यंत महत्वाचे व वर्दळीचे बनले आहेत. पण, या रस्त्यांची स्थिती वाहतुकीस अत्यंत अयोग्य झाली असल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्यांचे काम सुरू व्हावे. लातूरमधील प्रादेशिक पशुसंवर्धन विभागासाठी रोगनिदान प्रयोगशाळा मंजूर करावी.
सकारात्मक प्रतिसादाबद्दल आमदारांनी मानले आभार
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान रेणापूर क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी आमदार श्री. धिरज देशमुख यांनी पालकमंत्री श्री. गिरीश महाजन यांच्याकडे विनंती केली. त्यांनी तत्काळ पाच कोटी निधीला तत्वतः मंजूरी दिली. तसेच, मतदारसंघातील स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्या, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ्तागृह, रस्ते इत्यादीसाठी देखील निधीची तरतूद करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. तसेच, ‘लातूर ग्रामीण’मधील इतर प्रश्नांबाबतही सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल आमदार श्री. धिरज देशमुख यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.—