शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.आ. कराड

0
164

१ सप्‍टेंबर रोजी तात्‍याच्‍या समाधी स्‍थळावर आंदोलनाची दिशा ठरणार

मांजरा परिवाराने शंभर रूपयाचा हफ्ता देवून

शेतकर्‍यांच्‍या तोंडाला पाने पुसली–आ. कराड

लातूर दि. ३० – गाळप केलेल्‍या ऊसाला एफआरपी प्रमाणे फरकाची रक्‍कम द्यावी अशी शेतकर्‍यांची मागणी असताना मांजरा परिवारातील साखर कारखान्‍यांनी शंभर रूपयाच्‍या आसपास दुसरा हफ्ता देवून शेतक-यांच्‍या तोंडाला पाने पुसली असून याबाबत शेतकर्‍यात तिव्र असंतोष निर्माण झाल्‍याने येत्‍या १ सप्‍टेंबर बुधवार रोजी मांजराचे संस्‍थापक चेअरमन स्‍व. बब्रुवानजी काळे तात्‍यांच्‍या समाधी स्‍थळावर कष्‍टाचा, घामाचा आणि हक्‍काचा दाम मिळवून घेण्‍यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्‍याची माहिती भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी दिली.

मांजरा परिवारातील मांजरा, विकास आणि रेणा या साखर कारखान्‍यांनी गाळप केलेल्‍या ऊसाला आतापर्यंत केवळ २२०० /- रूपये ऊसाचे बिल अदा केले आहे. शासनाने निश्चित केलेल्‍या एफआरपी नुसार फरकाची रक्‍कम शेतकर्‍याच्‍या खात्‍यात जमा करावी या मागणीसाठी गेल्‍या ९ ऑगस्‍ट २०२१ क्रांतीदिनी मांजरा कारखान्‍यासमोर शेतकर्‍यांनी आंदोलन केले. यावेळी ३० ऑगस्‍ट पर्यंत ऊसाची रक्‍कम शेतकर्‍यांच्‍या खात्‍यात जमा करण्‍याचा इशारा आंदोलन प्रसंगी दिला होता. सदरील आंदोलनाची दखल घेवून मांजरा परिवारातील मांजरा, विकास आणि रेणा कारखान्‍याने प्रतिटन शंभर रूपयाच्‍या जवळपास ऊसाचे बिल शेतकर्‍याच्‍या बॅक खात्‍यात जमा केले असल्‍याचे दिसून येते.

मांजरा परिवारातील मांजरा साखर कारखान्‍याची मुळ एफआरपी ३४२२/- रू. इतकी असून तोडणी, वाहतूक ६४७/- रू. वगळता २७७५/-  रूपये शेतकर्‍यांना प्रतिटन भाव देणे बंधनकारक आहे. ऊसाचे गाळप केल्‍यानंतर पहिला हफ्ता  २२००/- रू. देण्‍यात आला. उर्वरीत ५७५/- रू. प्रतिटन शेतकर्‍यांना देणे असताना केवळ १०९/- रू. देण्‍यात आले. विकास साखर कारखान्‍याची मुळ एफआरपी ३३३१/- रू. इतकी असून तोडणी, वाहतूक ६३२/- रू. वगळता २६९९/-  रूपये शेतकर्‍यांना प्रतिटन भाव देणे बंधनकारक आहे. ऊसाचे गाळप केल्‍यानंतर पहिला हफ्ता  २२००/- रू. देण्‍यात आला. उर्वरीत ४९९/- रू. प्रतिटन शेतकर्‍यांना देणे असताना केवळ १००/- रू. देण्‍यात आले. तर रेणा साखर कारखान्‍याची मुळ एफआरपी ३४८२/- रू. इतकी असून तोडणी, वाहतूक ६२६/- रू. वगळता २८५६/-  रूपये शेतकर्‍यांना प्रतिटन भाव देणे बंधनकारक आहे. ऊसाचे गाळप केल्‍यानंतर पहिला हफ्ता  २२००/- रू. देण्‍यात आले. उर्वरीत ६५६/- रू. प्रतिटन शेतकर्‍यांना देणे असताना केवळ १००/- रू. देण्‍यात आले आहेत.

शासनाच्‍या एफआरपी नुसार गाळप केलेल्‍या ऊसाला भाव देणे बंधनकारक असतानाही मांजरा परिवारातील साखर कारखान्‍याने केवळ शंभर रूपयाच्‍या जवळपास दुसरा हफ्ता देवून शेतकर्‍याच्‍या  घामाची, कष्‍टाची अवहेलना करून तोंडाला पाने पुसण्‍याचे काम मांजरा परिवाराने केले आहे. शेतकर्‍यांना देण्‍यात आलेला शंभर रूपयाचा दुसरा हफ्ता कुठल्‍या धारे देण्‍यात आला असा प्रश्‍न उपस्थित करून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, मांजरा कारखान्‍याकडून ४७५/- रू. विकास कारखान्‍याकडून ३९९/- रू. आणि रेणा कारखान्‍याकडून ५५६/-रू. याप्रमाणे शेतकर्‍याच्‍या हक्‍काची प्रतिटन रक्‍कम येणे अजूनही बाकी आहे.

शेतक-यांना दुसरा हफ्ता देवून उपकार केले नाहीत केवळ शंभर रूपयाचा हफ्ता दिल्‍याने शेतकर्‍यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून शेतकर्‍यांची उर्वरीत रक्‍कम कधी देणार असा प्रश्‍न उपस्थित करून आ. रमेशअप्‍पा  कराड म्‍हणाले की, येत्‍या १ सप्‍टेंबर २०२१ बुधवार रोजी मांजरा कारखान्‍याचे संस्‍थापक चेअरमन स्‍व. बब्रुवानजी काळे तात्‍या यांच्‍या चिखुर्डा या जन्‍म गावी त्‍यांच्‍या समाधीस अभिवादन करून शेतकर्‍याच्‍या न्‍याय हक्‍कासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरवीली जाणार आहे. शेतकर्‍यांच्‍या हक्‍काचे ऊसाचे बिल जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत स्‍वस्‍थ बसणार नाही.

मांजरा कारखान्‍याच्‍या उभारणीत मेहनत घेणार्‍या आणि शेतक-यांना मान सन्‍मान देणार्‍या स्‍व. बब्रुवानजी काळे तात्‍या यांचे मांजरा कारखाना परिसरात स्‍मारक व्‍हावे यासह एफआरपी प्रमाणे शेतक-यांना ऊसाचे बिल मिळावे यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरवि‍ण्‍याकरीता १ सप्‍टेंबर २०२१ बुधवार रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या चिखुर्डा येथील बैठकीस तात्‍यावर प्रेम करणा-या शेतक-यांस मांजरा परिवारातील ऊस उत्‍पादक शेतकरी सभासदांनी मोठया संखेने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे रमेशअप्‍पा कराड, किसान मोर्चाचे जिल्‍हाध्‍यक्ष साहेबराव मुळे, भागवत सोट, हणमंतबापू नागटिळक, बन्‍सी भिसे, भैरवनाथ पिसाळ, धनराज शिंदे, शाम वाघमारे, सुरज शिंदे, अनंत कणसे, वैभव सापसोड, विनायक मगर, विश्‍वास कावळे, काशिनाथ ढगे, रशिद पठाण, संतोष जगताप यांच्‍यासह अनेकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here