रेणापूर येथे सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा;शेतकरी संमेलनाचे धिरज देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
रेणापूर :
सहकारमहर्षी तथा माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रेणापूर येथे आयोजित शेतकरी संमेलनात तालुक्यातील ४० हून अधिक प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. देशाचे भरणपोषण करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कृषी विभाग व रूपनारायण फर्टिलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी संमेलनाचे उद्घाटन आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते सोमवारी येथे झाले. शेतकरी बांधवांच्या जीवनात समृध्दी यावी यासाठी आदरणीय श्री. दिलीपराव देशमुख साहेब यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. कृषी, सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. शेतकरी, पशुपालकांचे ते कैवारी आहेत. त्यांच्या वाढदिवसाला शेतकरी बांधवांचा सन्मान करणे, शेतकऱ्यांना मदत होईल असे उपक्रम घेणे हे अत्यंत स्तुत्य आहे, असे श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.

श्री. धिरज देशमुख म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात अनेकांना घरी बसावे लागले. उद्योग धंदे बंद राहिले. पण, शेतकरी बांधवांनी या संकटाच्या काळात आपले कर्तव्य पार पाडले. त्यामुळे राज्याचे अर्थचक्र सुरळीत राहिले. ही जाणीव आपण कधीही विसरता कामा नये. शेतकरी हिताच्या अनेक योजना राज्य सरकारने आणल्या आहेत. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्याही अनेक कल्याणकारी योजना आहेत. यापुढेही आम्ही अशाच विविध योजना आणू.
यावेळी हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, त्र्यंबक भिसे, अॅड. प्रमोद जाधव, वैशाली माने, कृषी विकास अधिकारी चोले, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, तालुका कृषी अधिकारी हरिराम नागरगोजे, निखिल मानकर, संभाजी रेड्डी, लाला साहेब चव्हाण, मतीन अली सय्यद, उमेश सोमाणी, मधुसूदन सोमाणी, गणेश कलाल, भूषण पनुरे, उमेश सोमाणी आदी उपस्थित होते.

पशुपालकांना मिळाला आधार
सहकारमहर्षी तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रेणापूर येथील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय येथे रेणा सहकारी साखर कारखाना व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित पशुरोग निदान व उपचार शिबीराचा आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला. या शिबीराच्या माध्यमातून पशुधनाची आरोग्य तपासणी, उपचार व औषधांचे वाटप करून अनेक पशुपालकांना आधार देण्यात आला. त्यामुळे या उपक्रमाचे आमदार श्री धिरज देशमुख यांनी कौतुक केले..