डॉ. प्रकाश आनंदगावकर ‘डॉक्टर- जानाईश्री ‘ पुरस्काराने सन्मानित
देखणा व नेटका कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
माध्यम वृत्तसेवा
…………….
लातूर ; दि. १ – ” सगळ्या आजाराचे मूळ हे आपला आचार विचार हेच असून ; आचार विचार शुद्ध व सात्विक नसतील तर त्याचा आपल्या पेशींवर , मनावर विपरीत परिणाम होऊन त्यातून कॅन्सर सारखे अनेक दुर्धर आजार बळवतात . हे जर टाळायचे असेल तर शुद्ध आचार विचाराची कास धरा , असा निरामय जीवनाचा मूलमंत्र देत डॉ. प्रकाश आनंदगांवकर यांनी उपस्थितांची मने जिंकली.

श्री जानाई प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा
‘ डॉक्टर -जानाईश्री पुरस्कार ‘ डॉ. आनंदगांवकर यांना देण्यात आला 25 हजार रुपये रोख , म्हैसूर संस्थांची सुप्रसिद्ध पगडी , सन्मानपत्र , शाल ,श्रीफळ व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच आनंदगांवकर यांच्या धर्मपत्नी सो. मीरा आनंदगांवकर यांचाही यावेळी साडीचोळी , शाल , श्रीफळ, हार देऊन सन्मान करण्यात आला. ‘ जानाई ‘ ने विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचा अखंड यज्ञ चालू ठेवला आहे ; याचे डॉक्टर आनंदगावकर यांनी आपल्या भाषणात कौतुक करून आपल्याला दिलेली पंचवीस हजार रुपयाची रक्कम तेवढ्याच विनम्रतेने प्रतिष्ठानला परत करीत या ज्ञानदानाच्या यज्ञात आपली सेवारुपी यज्ञात समिधा टाकल्या .

मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनकल्याण समितीचे प्रांत उपाध्यक्ष प्रा. रमेश जोशी , लातूरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. राम पाटील , जानाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभियंते अतुल ठोंबरे , श्री जानाई प्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. वैशाली टेकाळे , जानाई विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष अवधूत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कारास उत्तर देताना डॉ. आनंदगांवकर यांनी आपल्या सेवाव्रत्ती , निरामय, यशस्वी जीवन जगण्या मागच्या काही आठवणी, गोष्टी सांगत आपले भाषण रंजक केले. माजलगाव( जिल्हा बीड ) येथील हजारो गरीब लोकांचे फॅमिली डॉक्टर प्रकाश आनंदगांवकर यांना त्यांच्या वैद्यकीय , शैक्षणिक , सामाजिक , अध्यात्मिक , राजकीय व सहकार क्षेत्रातील नि:स्वार्थ सेवेबद्दल 1 जुलै 2022 डॉक्टर डे रोजी जाहीर करण्यात आलेला हा पुरस्कार रविवारी( 31 ऑगस्ट रोजी ) औषधी भवनच्या सभागृहात एका शानदार व दिमाखदार कार्यक्रमात देऊन सन्मानित केल्याबद्दल बीड व लातूर जिल्ह्यातून आलेल्या अनेक मान्यवर डॉक्टर व सर्व स्तरातील नागरिकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून स्वागत केले.

प्रमुख वक्ते प्रा.रमेश जोशी यांचे यावेळी प्रभावी भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. आनंदगांवकर यांच्या सेवाव्रती, निरामय जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या. जानाई प्रतिष्ठानने एका आदर्श डॉक्टराची या पुरस्कारासाठी केलेली निवड उचीत अशीच आहे. हा सन्मान डॉ. आनंदगांवकर यांच्या विचारांचा, त्यागाचा व देशभक्तीचा आहे, तो समाजाला प्रेरणादायी देणारा आहे , असे प्रशंसोद्गार काढले.

अतुल ठोंबरे यांनी जानाई प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमाची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली .तसेच डॉक्टर जानाईश्री पुरस्कार देण्यामागची भूमिका विषद केली .डॉ. अतुल निरगुडे यांच्या सूचनेवरून हा पुरस्कार देण्याची कल्पना सुचली असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. डॉ. अमित उटीकर , डॉ. मनोज शिरुरे यांनी प्रमुख वक्ते व सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला . सुनील अयाचित, डॉ.चंद्रशेखर औरंगाबादकर , डॉ.ऋजुता अयाचित, डॉ. आरती संदीकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. रमेश जोशी, डॉ. राम पाटील यांची यावेळी समायोजित भाषणे झाली .
डॉ.वैशाली टेकाळे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले .डॉ. जयंती आंबेगावकर यांनी आनंदगावकर यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा पाटील – कुलकर्णी यांनी केले. अवधूत जोशी यांनी आभार मानले.