शिरुर अनंतपाळ येथे शिवस्मारक उभारण्यास बांधील
आ. निलंगेकरांची शिवजन्म महोत्सव समितीस ग्वाही
लातूर/प्रतिनिधीः- छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्याची जी संकल्पना मांडलेली आहे. त्या संकल्पनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच माझी राजकीय वाटचाल सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आणि त्यांचे प्रेरणा सर्वांनाच सातत्याने मिळत रहावी याकरीता शिवस्मारकाची उभारणी अत्यंत गरजेची आहे. शिरुर अनंतपाळ येथे शिवजन्म महोत्सव समितीने शिवस्मारक उभारण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो पुर्णत्वास नेण्यासाठी आपण बांधील असल्याची ग्वाही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

शिरुर अनंतपाळ शहर व तालुक्यातील शिवजन्म महोत्सव समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची लातूर निवासस्थानी भेट घेऊन शिरुर अनंतपाळ येथे शिवस्मारक उभारले जावे या मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी महोत्सव समितीच्या पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधताना आ. निलंगेकर बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन राज्य स्थापन केल्याचे सांगत या राज्याच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांचा विकास साधण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न आणि राज्यकारभार चालविण्याची संकल्पना ही सर्वांसाठी आदर्शदायी असल्याचे आ. निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपली राजकीय वाटचाल सुरु असून या वाटचालीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांचा विकास करण्यासाठी आपले अविरत प्रयत्न सुरु असल्याचे आ. निलंगेकरांनी स्पष्ट केले. शिरुर अनंतपाळ येथे शिवस्मारक उभारले जावे ही मागणी रास्त असून याकरीता आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत आपण देऊ असा शब्दही आ. निलंगेकर यांनी यावेळी दिला. शिवस्मारक उभारत असताना याकरीता एका समितीची स्थापना करून यामध्ये समाजातील सर्व घटकांना स्थान द्यावे अशी अपेक्षा आ. निलंगेकरांनी यावेळी व्यक्त करून शिवस्मारक भव्य आणि दिव्य होण्याकरीता आपण प्रशासकिय व शासन स्तरावर आवश्यक असणार्या सर्व प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू असे सांगून शिवस्मारक उभारण्याकरीता समिती जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार मला दिलेली जबाबदारी मी पार पाडेल. त्याचबरोबर शिरुर अनंतपाळ येथे शिवस्मारक उभारण्यासाठी आपण बांधील असल्याची ग्वाही आ. निलंगेकर यांनी यावेळी दिली.

शिरुर अनंतपाळ शिवजन्म महोत्सव समितीच्या वतीने यावेळी आ. निलंगेकर यांचा शिवप्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शिवस्मारक उभारण्यासाठी निवेदनही देण्यात आले. या निवेदनावर धनराज पाटील, अॅड. सुहास मादलापुरे, काकासाहेब पाटील, अमोल पाटील, किशोर मोहिते, अमर माडजे, गोविंद बन, विवेक जाधव, राहुल पाटील, राजन सावंत, पांडुरंग शिंदे, धनराज काकनाळे, अनंत जाधव आदींसह महोत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
