प्रासंगिक
शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त
■ राजेंद्र शहापूरकर ■
बाळासाहेबांची शिवसेना हा एक अमेझिंग प्रकार होता (एकेकाळी) तेव्हाची शिवसेना ही पक्ष नसून एक संघटना होती…एक झंझावात होता. त्याकाळी बाळासाहेबांचं वाक्य म्हणजे परमेश्वरी आदेश वाटायचा सैनिकांना…तेव्हा “एक घाव दोन तुकडे” अशी तडाखेबंद योजना असायची साहेबांची. साहेब बोलायला उठले की का कुणास ठावूक त्यांच्या शब्दागणिक आपल्याही मनगटात जोर यायचा, आपलंही रक्त उसळायचं…मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा कोणीतरी आपल्यातलाच वाघ समोर उभा दिसायचा….बाळासाहेब #वाघ होते. त्यांच्या किंचित अशक्त शरिरयष्टीच्या आत खरोखरच एक वाघाचं बिनधास्त काळीज होतं, बाळासाहेबांच्या शब्दाखातर प्राण पणाला लावणारे शिवसैनिक होते. साहेबांचा आदेश ब्रह्मवाक्यासारखा पाळून तुरुंगात जाणं असो की एखाद्या राड्यात उतरणं असो लोकांना फिकिर नसायची…..

खूप जुनी गोष्ट आहे…१९८८ मध्ये मनपा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त साहेब पहिल्यांदा संभाजीनगरला आले होते .मी गोवा शिवसेनेच्या संस्थापक सदस्यापैकी एक . १९८७ मध्ये माझ्या पुढाकारानेच गोव्यात शिवसेनेची स्थापना झाली होती त्यांमुळे साहेबांशी परिचय होताच . मराठवाड़ा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेच्या ठिकाणी येताच साहेबांनी सरपोतदार दादाच्या हाती सभेनंतर ‘औरंगाबाद अशोका’ मध्ये येण्यासंबधी मला निरोप दिला . त्याप्रमाणे मी भेटलोही . साहेबांनी सभेबद्दल प्रतिक्रिया विचारली , अन्य माहिती घेतली . साहेब दुसऱ्या दिवशी सिडकोतील सभा झाल्यानंतर ‘लोकमत’ ला भेट देणार असल्याचे गप्पात समजले. अशोक पडबिद्री तेव्हा ‘लोकमत’ चे संपादक होते आणि ते साहेबांचे स्नेही सुद्धा होते , त्याच्याखातीर साहेब जाणार होते . मग मी सुद्धा आग्रह धरला माझ्या ‘मराठवाड़ा’ ला सुद्धा भेट दिली पाहिजे … अरे ते तुमचे दळभद्री समाजवादी ….काही नाही तुम्ही यायला पाहिजे , मी नोकरी करतो तिथे . साहेबांनी माझे निमंत्रण स्विकारले आणि ‘लोकमत’ च्या गेटवर त्याच्या गाडीत बसूनच त्यांना ‘मराठवाड़ा’ त आणले . मधुकरराव सरपोतदार (दादा) माझ्या लग्नाला येऊ शकले नाही म्हणून आम्हा दोघांना वान्द्राला घरी ‘विनायक’ मध्ये आग्रहाने बोलावले मंगला वहिनींनी माझ्या बायको शुभांगीची साडीचोळी देऊन ओटी भरली होती….विलास भानुशाली , कमलाकर पाटिल, वामन भोसले अशी दादा माणसं तेव्हा शिवसेनेत होती…ह्यानीच शिवसेनेची बांधणी केली संभाजीनगरला….
मी तसा व्यवसायाने पत्रकार पण कधी शिवसैनिक झालो ते समजलंही नाही…खूप मंतरलेले दिवस होते…तेव्हा डिप्लोमॅटिक वाटाघाटी, सफाईदार बोलणी, बोटचेपेपणा नव्हता.. राजकीय डावपेच नव्हते, होते ते फक्त आदेश, सामनाचे अग्रलेख आणि मार्मिकमधले कुंचल्याचे बोचरे फटकारे…खूप छान दिवस होते ते शिवसेनेचे…आजही स्टेजवर भगवी शाल सावरत उभे राहिलेले साहेब आठवतात मला…कडकडीत शब्दात समोरच्या लाखो लोकांच्या मनात झंझावात निर्माण करत भाषणाच्या शेवटी त्यांच्या खर्जातल्या दणदणीत आवाजातलं “जय महाराष्ट्र” ऐकलं की धन्य वाटायचं आम्हाला… साहेब बरोबर होते का? आम्ही चुकलो का? याचं आत्मभानच नव्हतं आम्हाला…तशी गरजही नव्हती….

दु:खं हेच वाटतंय की आता शिवसेना बदलली…स्पष्टपणे म्हणतोय, होय शिवसेना बदलली…सर्वार्थाने बदलली…आता मनगटात स्फुरण चढावं असं कोणीच बोलत नाही…आता सगळे डिप्लोमॅटिक आणि सावध बोलतात, वागतात. काल बोललेलं आज विसरतात…आज बोललेलं उद्या लक्षात ठेवत नाहीत. आता आदेश द्यावा आणि डोळे मिटून तो पाळावा असं कुणी राहिलेलं नाही…आता आदेशाखातर तुरुंगात जाण्याइतका वेळही कुणाकडे नाही…
आणि शिवसेनेतल्या या बदलाचं दु:खं माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाइतकं कोणालाही नसेल…आज खरंच मनापासून सांगतो,
साहेबतुमची खूप आठवण येते !

लेखन: राजेंद्र शहापूरकर,जेष्ठ पत्रकार, औरंगाबाद