‘जय जय जय शिवाजी ’ च्या गजराने महाराष्ट्र सदन दुमदुमले
शिवजयंती उत्साहात साजरी
नवी दिल्ली दि. १९ :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळयातील ढोल-ताशांचे दिमाखदार सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फुर्त घोषणांमुळे आज राजधानीतील ल्युटियन दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचा परिसर दुमदुमला.
शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. भव्य महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज्ञी राजे संयोगिता राजे छत्रपती ,युवराज राजे शहाजी राजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा केला. यानंतर पालखी पुजन करण्यात आले.
महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळयाला छत्रपती परिवारातील सदस्य, खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हसंराज अहिर, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांसह वरिष्ठ अधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर कुमार बिस्वास, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त डॉ. निधी पांडे, महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
ढोल ताशांचे सादरीकरण ठरले आकर्षण
ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले होते आणि सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातारवण निणादून गेले होते. नाशिक येथील ३० वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या वाद्यवृदांच्या सादरीकरणाने उपस्थितांना ठेका धरायला लावला.
संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
तत्पूर्वी, सकाळी संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले.यावेळी युवराज राजे शहाजी राजे छत्रपती, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.