औसा – प्रतिनिधी दि. 22
प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या माध्यमातून विश्वशांतीचा संदेश देण्याचे महान कार्य शिवबाबा यांनी सुरू केले. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये आज त्यांच्या अनमोल विचाराने अनेक ब्रह्माकुमारी व ब्रह्माकुमार आपल्या जीवनाचे मार्गक्रमण करीत आहेत. शिवबाबा यांचे विचार राज योगिनी ब्रह्माकुमारी यांच्यासाठी प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन सोलापूर उपविभागाच्या संचालिका राज योगिनी सोमप्रभादिदी यांनी केले.
औसा येथे शिवबाबा यांच्या 54 व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित विश्वशांती दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालय औसा येथे आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर गुलबर्गा केंद्राचे संचालक व समाजसेवा विभागाचे माउंट आबू येथील मार्गदर्शक ब्रह्माकुमार प्रेमभाई, नाथ संस्थानचे पाचवे पिठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर, अँड मुक्तेश्वर वागदरे यांच्यासह लातूर,नांदेड, बीड, उदगीर, निलंगा, अहमदपूर, सोलापूर येथील राजयोग शिक्षण केंद्राच्या संचालिका व ज्येष्ठ ब्रह्माकुमारी भगिनी यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना राजयोगिनी सोमप्रभा दीदी म्हणाल्या की, प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय अंतर्गत राजीव शिक्षण केंद्राच्या माध्यमातून दररोज ज्ञानदानाचे काम केले जाते तसेच मनशांतीसाठी ध्यानधारण्याचे अविरत कार्य सुरू असल्याने सुदृढ आणि आरोग्यदायी जीवनासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या अनेक राजयोगिनी ब्रह्माकुमारी यांचे कार्य सुरू आहे. त्यांच्या कार्याचा प्रसार देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमध्ये पोहोचला असून प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या कार्याने अनेकांचे जीवन प्रकाशमान झाले आहे औसा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी सुशिला दिदी यांनी आपले संपूर्ण आयुष्य राजयोग शिक्षण केंद्राला समर्पित केल्यामुळे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे कार्य केल्यामुळे त्यागमूर्ती बनल्या असेही शेवटी त्यांनी स्पष्ट करून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला.

यावेळी नाथ संस्थानचे पाचवे पिठाधीपती सद्गुरु गुरुबाबा महाराज यांचेही आशीर्वचन झाले. औसा केंद्राच्या दिवंगत संचालिका सुशीलाबहिणजी यांना या कार्यक्रमांमध्ये आदरांजली अर्पण करण्यात आली.शिवबाबा यांच्या 54 व्या स्मृती दिनानिमित्त विश्वशांती दिनाच्या कार्यक्रमासाठी लातूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड व गुलबर्गा जिल्ह्यातून हजारो ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारीज यांची उपस्थिती होती.