लातूर - कृषि महाविद्यालय, लातूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महापूर येथे दिनांक १४ ते २० मार्च दरम्यान अतिशय शिस्तबद्धपणे, उत्साहात संपन्न होत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचा सर्वाना नकोसा वाटणारा समारोपाचा दि:२० मार्च २०२३ हा दिवस उजाडला. परंतु तोही तितक्याच उत्साहात साजरा करून सर्व शिबिरार्थीनी एक आदर्श वस्तुपाठ सर्वांसमोर घालून दिला. या समारोप दिनाची सुरुवात झाली सकाळी पशुरोग निदान व उपचार शिबिराने. यावेळी ग्रामस्थांनी आपापल्या गोधनाची तज्ञांकडून मोठ्या संख्येने आरोग्य तपासणी करवून घेतली. समारोप कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभले होते या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे. मार्गदर्शक म्हणून लाभले होते पर्यावरणतज्ञ डॉ.भास्कर बोरगावकर, प्रमुख अतिथी म्हणून गळीत धान्य संशोधन केंद्र प्रभारी डॉ.महारुद्र घोडके, कृषि तंत्र विद्यालय, लातूरचे प्राचार्य डॉ.पद्माकर वाडीकर, श्री.कुणाल घुंगार्डे, श्री.संदीप माने, श्री. भागवत भोसले.
या समारोपप्रसंगी सुरुवातीला मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थ्यांनी आपली मते त्यांच्यासमोर मांडली. या शिबिरामुळे आम्हाला काय काय शिकायला भेटले, श्रम संस्कार शिबिरातून, श्रमाचे महत्व कळले, ग्रामीण लोकजीवन जवळून अनुभवता आले, अनेकांनी असेही मत व्यक्त केले की, आमच्यात सभाधीटपणा, वेळेचे, कामाचे नियोजन आले हे अतिशय आत्मविश्वासाने सांगितले.मार्गदर्शक डॉ.बोरगावकर म्हणाले विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्व समजून घ्यावे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याकरिता कचरा जाळू नये. त्यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्याला घोका आहे. डॉ.घोडके म्हणाले शेती, शासन व शास्तज्ञ याच्यातला दुवा म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. यानंतर डॉ वाडीकर म्हणाले शिस्तप्रिय विद्यार्थ्यांमुळे शिक्षकांचा भार कमी होतो. जो काळ्या आईची सेवा करतो तो मुलगा / मुलगी पालकांची साथ सोडत नाही.श्री.कुणाल घुंगार्डे म्हणाले शिक्षणाबरोबर प्रात्यक्षिक ज्ञान अतिशय गरजेचे आहे. भागवत भोसले म्हणाले आपण ज्ञान घेवून जर त्याप्रमाणे बदलत गेलो तर आपण निश्चित यशस्वी होवू शकतो.संदीप माने म्हणाले की, शिबिरातून आपल्याला मानसं कळतात.
ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक होते, ते डॉ.बाबासाहेब ठोंबरे अध्यक्षीय समारोपात म्हणाले, खरा कार्यकर्ता हा राष्ट्रीय सेवा योजनेत पाहायला मिळतो.चांगल्या विद्यार्थ्याने घड्याळ्याच्या काट्यासोबत चालावे. या प्रकारच्या शिबिरातून संस्कार पाझरले जातात. याप्रकारे त्यांनी सर्वाना विस्तृत मार्गदर्शन केले. यानंतर सर्व शिबिरार्थींच्या मनात अनामिक हुरहूर सुरु झाली. सतत सात दिवस अनेक नवनवीन उपक्रम, विविध मान्यवरांशी साधलेला संवाद, थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाची ही मालिका आता खंडित होणार होती.परंतु त्यांनी चेतविलेल्या ज्ञानयज्ञातून जे ज्ञान त्यांना मिळाले त्यामुळे तृप्तीची, कृतार्थतेची भावना ही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अनिलकुमार कांबळे यांनी , सूत्रसंचालन परितोष कुलकर्णी याने केले. या संपूर्ण शिबिराच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्या सर्व समिती, पदाधिकारी, कर्मचारी यांचे सत्कार झाल्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार श्री. गजेंद्र काळे यांने मानले. या कार्यक्रमासाठी व संपूर्ण शिबिरासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ.अनिलकुमार कांबळे, डॉ.संघर्ष शृंगारे, श्री. राहुल औंधकर, श्रीमती मीना साठे, श्री.उत्तम पवार, श्री.सचिन सूर्यवंशी व श्री. दिपक जाधव तसेच सर्व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.