परभणी,दि.26(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा नूतन विद्या समितीचे सचिव संतोष धारासूरकर तर परभणी महानगर जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ तथा बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी महामंडळाच्या घटनेप्रमाणे प्रत्येक महानगरपालिकेला स्वतंत्र महानगर अध्यक्ष पद नियुक्त करण्याच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. नावंदर व उर्वरीत परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून धारासूरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हा कार्याध्यक्ष तथा राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून उदयराव देशमुख, उपाध्यक्ष म्हणून सूर्यकांतराव हाके व सचिव म्हणून बळवंतराव खळीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहणार आहेत. महामंडळाचे सरकार्यवाह तथा माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे यांनी परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून धारासूरकर तर महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ.नावंदर यांना हे नियुक्तीपत्र सादर केले. यावेळी उदयराव देशमुख, अजय गव्हाणे हे उपस्थित होते.
महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सौ.सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजयनवल पाटील, उपाध्यक्ष अशोकराव थोरात, वसंतराव भूईखेडकर, सौ. आबेदा इनामदार, कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील, सरकार्यवाह अॅड.गव्हाणे, रविंद्र फडणवीस, औरंगाबाद विभागीय अध्यक्ष संपतराव जवळकर, कार्यवाह वाल्मिक सुरासे यांच्यासह परभणी जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी व सदस्यांनी या दोघांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.
दरम्यान, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांनी 1971 साली महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची स्थापना केली. त्यातून शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न मार्गी लावले. त्या पाठोपाठ थोर स्वातंत्र्य सैनिक स्व. गोविंदभाई श्रॉफ, रयत शिक्षण संस्थेचे स्व. नागनाथआप्पा नलावडे, डॉ. देविसिंह शेखावत, माजी केंद्रीयमंत्री विजयनवल पाटील आदींनी या महामंडळाचे सक्षम व फलदायी असे नेतृत्व केले. महामंडळाला सद्यस्थितीत 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सांगलीत 2 ऑक्टोंबर रोजी महामंडळाचे राज्यव्यापी महाअधिवेशन होणार आहे.