विद्यार्थीप्रिय प्राचार्य प्रतापराव बोराडे काळाच्या पडद्याआड
शिक्षणमहर्षी प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर, दि. ५ : मराठवाड्याच्या अभियायांत्रिकी शिक्षणाचा पाया रचणारे शिक्षण तज्ञ, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे आज एमजीएम रुग्णालयात सकाळी ११:४५ वाजता दु:खद निधन झाले.
आपल्या आठ दशकांच्या आयुष्यात त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली. नावीन्यता, वैविधता, कल्पकता, शिस्त हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मुख्य पैलू होते. आपल्या संपूर्ण शैक्षणिक कार्यकाळात त्यांनी विद्यार्थी केंद्रित धोरणे राबवित कायम विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले.

शालेय आयुष्यातच ते राष्ट्र सेवादलाच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांची वाटचाल समाजवादी विचारांप्रमाणे झाली. आयुष्यातला प्रत्येक निर्णय त्यांनी विचारपूर्वक घेतला व प्रचंड मेहनत घेऊन तो यशस्वी करून दाखवला. पवई आयआयटीसारख्या नामवंत संस्थेतून प्लॅस्टीक इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांना नामवंत कंपनीत रुजू होण्याची संधी होती. मात्र ते विचारपूर्वक गुजरातमधील वापीसारख्या ग्रामीण भागातील एका नवीन कंपनीत रुजू झाले. कंपनीतील मशिनरी उभारणीपासून ते उत्पादनापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर काम केले. प्रतिकूल परिस्थिती असतानाही अल्पावधीत हा कारखाना यशस्वी करून दाखवला. या कारखान्यात इंजिनिअर बोराडे यांनी जी कार्यपद्धती अवलंबली, तिच्यात या यशाचं गमक सामावलं आहे. त्यांनी आपल्या वागण्या, जगण्यातूनच कारखाना यशस्वीपणे कसा चालवायचा हे दाखवून दिलं.

कारखाना हा केवळ मालकाचा नसतो तर कामगारांचाही असतो ही भावना कामगारांमध्ये निर्माण केली. कारखान्याचा फायदा म्हणजे कामगारांचा फायदा हे सूत्र त्यांनी कामगारांना पटवून दिलं. त्यामुळं वापीसारख्या गावातील ही प्लॅस्टीक कंपनी तीन-चार वर्षांमध्येच नावारुपाला आली. बोराडे यांचे हे यश लक्षात घेऊनच फॅक्टरी मालकाने त्यांना कांदीवलीच्या फॅक्टरीत जनरल मॅनेजर म्हणून पाठवले. ही कंपनी कामगारांच्या संपामुळे तीन वर्षांपासून बंद होती. कंपनी सुरु करणे हेच एक आव्हान होते. त्यांनी कंपनी तर चालू केलीच, शिवाय स्थिरस्थावरही केली. यासाठी त्यांनी जी कार्यपद्धती वापरली, ज्या पद्धतीचं प्रशासन उभारलं तेच याच्या यशाचं गमक आहे. त्यानंतर प्रतापराव बोराडे यांनी औरंगाबादमध्ये भागीदारीत स्वतःची कंपनी ‘स्पॅडमा प्लास्टीक’ची उभारणी करून तिला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या उद्योगाची सुरुवात करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या अडचणी सगळ्याच लघुउद्योजकांच्या मार्गातील काटे आहेत हे त्यांनी जाणले. यातूनच त्यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन मराठवाडा लघु उद्योजक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून सगळ्या लघुउद्योजकांचे प्रश्न सरकारसमोर मांडलेच शिवाय विविध पातळ्यांवर संघर्ष करून त्या प्रश्नांची सोडवणूकही करून घेतली. त्यामुळे अल्पावधीतच प्रतापराव बोराडे हे नाव उद्योगविश्वात आदराने घेतले जाऊ लागले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन सरकारने त्यांना ‘स्मॉल स्केल इंडस्ट्रिज’ या संस्थेवर संचालक म्हणून नेमले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभरातील लघू उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.

बँकाकडून सुलभपणे लोण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न केले. या मंडळाचे संचालक म्हणून पैठणच्या साडी कारागिरांना प्रशिक्षण देऊन व त्यांना नवे मार्ग उपलब्ध करून देऊन, पैठणी साडीचे बंद पडलेले उत्पादन नव्याने सुरु केले. त्यामुळे पैठणची काळाआड जाऊ पाहणारी भरजरी साडी पुन्हा स्त्रियांच्या अंगावर शोभू लागली. मराठवाडा विकास महामंडळावरही संचालक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या माध्यमातूनही मराठवाड्यातील लघुउद्योगांना उभारी देण्याचे काम त्यांनी केले. ते टेक्नॉलॉजी बँकेच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना तंत्रज्ञान पुरवले. यामुळे प्रतापराव बोराडे हे नाव औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात कायमचे कोरले गेले.
कुठल्याही नोकरी, व्यवसाय किंवा उद्योगात एखादा माणूस स्थिरावला की, शक्यतो तो त्यातून बाहेर पडत नाही. त्याच क्षेत्रात तो यशाची नवी शिखरं सर करण्याचा प्रयत्न करतो. हा सर्वसाधारण मानवी स्वभाव आहे. मात्र प्रतापराव बोराडे यालाही अपवाद आहेत. १९८३ साली बोराडे यांना तत्कालीन शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांनी त्यांना इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्यपद स्विकारण्याची गळ घातली. ते नकार देऊ शकले असते. मात्र एक आव्हान म्हणून काही दिवसांसाठी जवाहरलाल नेहरू इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्यपद त्यांनी स्विकारले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विना अनुदान तत्वावरील हे कॉलेज त्यांनी यशस्वी केले. एवढेच नाही तर ‘जेएनईसी’ या नावाचा देशभर दबदबा निर्माण केला.

एक इंजिनिअर म्हणून, जनरल मॅनेजर म्हणून, एक उद्योजक म्हणून, उद्योजकांचा प्रेरक, संघटक म्हणून जसे ते यशस्वी झाले तसेच ते प्राचार्य म्हणूनही ख्यातनाम झाले. तब्बल एकवीस वर्षे प्राचार्य पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पेलली. जेएनईसी म्हणजे प्राचार्य बोराडे सर, अशी ओळख निर्माण केली.
बोराडे सरांनी नावारुपाला आणलेली ही जेएनईसी पाहून शरद पवार यांनी त्यांना आग्रहाने बारामती इंजिनिअरींग कॉलेजचं प्राचार्यपद दिलं. अल्पावधीतच ते कॉलेजही त्यांनी नावारुपाला आणलं. बोराडे सरांनी आयुष्यात विविध भूमिका बजावताना मिळवलेलं प्रचंड यश पाहिलं तर प्रत्येकाला यातून प्रेरणा मिळेल.
राष्ट्र सेवादलाच्या विचारातून घडल्यामुळे असो की, आईवडीलाचे संस्कार असोत, त्यांनी तत्वनिष्ठेला सर्वाधिक महत्त्व दिल आहे. भ्रष्ट मार्गाचा वापर करायचा नाही. कुणाला लाच द्यायची नाही, घ्यायची नाही. लाच मागणाऱ्यांबरोबर व्यवहार करायचा नाही, ही त्यांची जीवननिष्ठा अतिशय दुर्मिळ म्हणावी लागेल. मी माझ्या आयुष्यात एकदाही, कोणालाही लाच दिली नाही, असे अभिमानाने सांगणारे प्रतापराव बोराडे हे असामान्य व्यक्तिमत्त्व आहेत. अशी व्यक्ती समाजात अपवादानेच पाहायला मिळते.

प्रतापराव बोराडे यांचा जीवन प्रवास म्हणजे जीवनात हमखास यशस्वी होण्याचा खात्रीलायक मार्ग आहे. ते ज्या विचाराने जगले, त्यांनी जी कार्यपद्धती अवलंबली, ती कार्यपद्धती कोणीही कुठल्याही व्यवसायात, उद्योगात किंवा नोकरीत वापरली तर, तो माणूस त्यात निश्चितपणे यशस्वी होईल. त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले भरीव योगदान तर दिलेच त्याचप्रमाणे साहित्य, कला, नाटक, संगीत याचा आस्वाद घेत, आयुष्य अधिकाधिक आनंददायी कसं घालवावं, याचा वस्तूपाठ त्यांच्या जीवनातून आपल्याला मिळतो.
समाजात असलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन ते कायम कार्यरत राहिले. विद्यार्थ्यांच्या चुकीबद्दल शिक्षा करणारे प्राचार्य बोराडे सर एकीकडे आणि त्यांच्या दु:खामध्ये सहभागी होणारे पालक दुसरीकडे अशी भूमिका घेत ते कायम विद्यार्थ्यात रमले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची जाण त्यांनी विद्यार्थ्यात रुजवली. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी बिहार राज्यात १९८८ साली आलेल्या महापुराच्यावेळी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन २ लाख रुपये जमवणे असो की भुज भूकंप मदत, केरळ महापूर मदत त्याचप्रमाणे किल्लारी येथील भूकंपाच्यावेळी ७ लाख रूपयांचा मदत निधी देणे असो ते कायम अडचणीच्या काळामध्ये पुढाकार घेऊन कार्यरत राहिले.

त्यांचा व्यासंग मोठा होता. साहित्यिकांशी त्यांचा असलेला ऋणानुबंध कायमच प्रेरणादायी आहे. साहित्यिक, संगीतकार, शिक्षणतज्ञ, राजकारणी, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. ज्ञानाचा प्रचंड खजिना असलेला एक संवेदनशील, विद्यार्थीप्रिय प्राचार्य आज काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे शिक्षण क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
प्राचार्य बोराडे यांच्या पश्चात पत्नी शशिकला, मुलगा शशीभूषण, मुलगी मृण्मयी, भाऊ, बहिणी, नातवंड असा परिवार आहे.
बालपण :
प्रतापराव बोराडे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९४२ रोजी पाटोदा येथे झाला. शालेय जीवनात ते राष्ट्र सेवा दलाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांची पुढील वाटचाल समाजवादी विचारसरणीत झाली. शालेय जीवनापासून त्यांना वाचनाची आवड होती, ती त्यांनी कायम जोपासली.
शिक्षण :
१९५५ साली नूतन विद्यालय, सेलू येथे सहावी पासून पुढचे शिक्षण
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून अभियांत्रिकीही पदवी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई येथून प्लॅस्टिक इंजिनियरिंग मध्ये पदविका.
वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर मधीन एम.ई. ची पदवी
निर्मिती :
‘स्पॅडमा प्लॅस्टिक’ कंपनीची उभारणी
मराठवाडा लघु उद्योजक संघटनेची स्थापना
पुरस्कार :
१९९१ : नाफेन पुरस्कार
१९९२ : ऍक्मे एक्सलन्स अवॉर्ड
१९९५ : औद्योगिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल बक्षीस
१९९७ : भारत सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार
२०२० : मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार

कारकिर्दीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय :
१. जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यलयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी गणवेश सुरू केला.
२. सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय स्तरावरील अनेक परिषदा, संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानांचे आयोजन.
३. जेएनईसी महाविद्यालयात संगणक वापर आणि अभ्यासक्रम सुरूवात
४. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण मिळावे म्हणून जेएनईसी महाविद्यालयात सुरुवातीचे ७ – ८ वर्षे शैक्षणिक शुल्क न घेण्याचा निर्णय.
पुस्तके
‘मी न माझा’ आत्मकथन
पालक प्राचार्य ( गौरवांक )
एका दैदीप्यमान कारकीर्दीचा आज अंत झाला आहे.
कारकीर्द :
१९८३ ते २००३ असे एकवीस वर्ष जेएनईसी महाविद्यालयाचे प्राचार्य
१ नोव्हेंबर २००३ रोजी विद्या प्रतिष्ठान बारामती येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य
१९८१ साली महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज संस्थेवर संचालक म्हणून नेमणूक
मराठवाडा साहित्य परिषदेचे १५ वर्ष कोषाध्यक्ष
मराठवाडा विकास महामंडळ संचालक.
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत,महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त,विद्या प्रतिष्ठान,बारामतीचे माजी प्रशासकीय अधिकारी, ऋषीतुल्य विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आज दुःखद निधन झाल्याची बातमी समजली.
मागील पाच दशके प्रतापरावांचा आणि माझा स्नेह होता.जगभरात एखादा देश क्वचितच आढळेल जिथे त्यांचा विद्यार्थी सापडणार नाही.आपल्या ज्ञानदानाने व उत्तम प्रशासकीय कौशल्याने त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था नावारूपास आणल्या.राज्यातील अनेक परिवर्तनवादी संघटना व संस्था यांच्यासोबत त्यांचा संवाद होता.मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ते आग्रही होते.आज त्यांच्या निधनाची बातमी ही मला वैयक्तिक वेदनादायी आहे.त्यांच्या कुटुबियांना व एमजीएम परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो.

प्रतापरावांच्या स्मृतींना भावपूर्ण वंदन !
: पद्मविभूषण शरदचंद्र जी पवार
एमजीएमचे विश्वस्त आणि जेएनईसीचे प्राचार्य म्हणून प्रतापराव बोराडे यांनी केलेले काम येणाऱ्या असंख्य पिढ्यांना प्रेरक असे असून त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. उच्च शैक्षणिक गुणवत्ता, उत्कृष्ट व्यवस्थापन व सामाजिक मूल्यांबाबत तडजोड न करणाऱ्या प्रतापरावांनी जेएनईसीला जगभर पोहचविले. निराधारांना आधार देणाऱ्या, अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या, तत्वासाठी कुठलीही तडजोड न करणाऱ्या एका सहकार्याच्या अशा जाण्याने माझ्या जीवनात एक पोकळी निर्माण झालेली आहे. सतत नवनवीन उपक्रम, अथक परिश्रम व अदम्य उत्साह असणाऱ्या प्राचार्यांना विद्यार्थी आता कायमचे पोरके झाले आहेत.
कमलकिशोर कदम,
अध्यक्ष,
महात्मा गांधी मिशन,

जेएनईसीची सुरुवात झाली तेव्हा इमारतीपूर्वी आम्ही प्राचार्याचा शोध सुरू केला होता. एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात कुणीही प्राचार्य म्हणून यायला राजी नव्हते. आम्ही प्रतापरावांकडे गेलो तर त्यांनीही सुरुवातीला नकार दिला. मात्र, आमच्या आग्रहास्तव अन्य प्राचार्याच्या नियुक्तीपर्यंत पद सांभाळण्यास होकार दिला. प्राचार्यपद त्यांनी स्वीकारताच आम्ही मात्र अन्य प्राचार्याचा शोधच थांबवला. जेएनईसी हे एमजीएमचे पहिले महाविद्यालय असून ते उभारण्यात आणि त्याचा नावलौकिक करण्यात प्रतापरावांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रतापराव हेच खऱ्या अर्थाने आजच्या एमजीएम विश्वाचे जनक होते. त्यांच्या जाण्याने एमजीएम परिवाराची मोठी हानी झाली आहे.

. अंकुशराव कदम,
कुलपती, एमजीएम विद्यापीठ