आजची शिक्षणपद्धती भांडवली प्रधान
आणि शोषण करणारी : डॉ. जयद्रथ जाधव
लातूर : ( वृत्तसेवा ) यशवंतराव चव्हाण यांनी सर्वांसाठी,सर्वसमावेशक आणि मूल्याधारित शिक्षण व्यवस्था असावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले . मात्र, आजची शिक्षण पद्धती भांडवल प्रधान व शोषण निर्माण करणारी झाली आहे, असे प्रतिपादन डॉ जयद्रथ जाधव यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभा आयोजित नववे शिक्षक साहित्य संमेलन दयानंद सभागृहात सुरु आहे. या संमेलनात “शिक्षण काल,आज आणि उद्या” या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.प.म.शहाजिंदे होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सहभागी प्राचार्य डॉ कुसुमताई मोरे,डॉ जयद्रथ जाधव व डॉ ज्ञानदेव राऊत होते. या परिसंवादाचे प्रास्ताविक ब्रिजलाल कदम यांनी केले.
डॉ. जयद्रथ जाधव यांनी काल आणि आजच्या शिक्षण सद्यस्थितीवर परखड विचार मांडले. ना.यशवंतरावांचा शिक्षणातून सामाजिक कल्याणाचा विचार पुढच्या राज्यकर्त्यांनी चालविला नाही.जागतिकीकरणानंतर शिक्षणाची जबाबदारी सरकार हळूहळू कमी करीत दोनहजार सालानंतर तर शिक्षण बहुजन, वंचित घटकांपासून दूर जात आहे.शिक्षणात देणग्यांना प्राधान्य आहे म्हणून शिक्षण धनदांडग्ययांचे होत असून सर्वासामान्यापासून दूर जात आहे.कायम विनाअनुदानित धोरणामुळे शिक्षणातील मूल्यव्यवस्था उद्ध्वस्त केली जाते आहे.यामुळे ज्ञान, संस्कार,उपयोजन आणि व्यावसायिकता संपेल.प्राथमिक शिक्षकांना शंभर प्रकारची कामे, नोकरभरती बंद, विज्ञान साहित्य, क्रीडा साहित्य नाहीत तर अध्यापनाला शिक्षक नाहीत अशा वेळी अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया कशी सक्षमपणे पूर्ण होणार असा प्रश्न आहे.संपूर्ण जगाने ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञानाने प्रगती केली हे सत्य असतांनाच नवीन शैक्षणिक धोरण हे मध्ययुगीन विचार देणारे आहे.यामुळे भारतीय समाजाला न्याय मिळणार नाही.
यावेळी प्राचार्य डॉ कुसुमताई मोरे यांनी कालची शिक्षण पध्दती ही ध्येयाची, खस्ता घाणारी होती.या ध्येयवादी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचा प्रसार खेड्यापाड्यापर्यंत केला.म.फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्री-शुद्रांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.कायम विनाअनुदानित धोरणांने शिक्षणाचा लोककल्याणकारी ढाचा नष्ट होईल अशी भीती आहे.डॉ ज्ञानदेव राऊत यांनी जूनी शिक्षण पध्दती ही गुरुकुल पद्धतीची होती तर आधुनिक कुलगुरू पध्दतीची आहे. म.फुले, मेकॉले शिक्षण पध्दती,शिक्षण आयोगाचा आढावा घेतला.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा.फ.म.शहाजिंदे यांनी वर्ण-धर्म प्रधान व पुरूषसत्ताक समाज व्यवस्था ही गुलामीची आहे.गुलामीच्या वृत्तीमुळे समाजात शिक्षणाची मूल्ये रूजणार नाहीत.स्वातंत्र्यांच्या इतक्या वर्षात सर्वासमावेशक शिक्षण झाले नाही आणि ते होऊच नये अशी परिस्थिती आहे. परिसंवादासाठी कालीदासराव माने,अनंत कदम, गोविंद माने,नयन राजमाने, दयानंद बिरादार, योगीराज माने,यु.टी.गायकवाड, दिलीप गायकवाड व साने गुरुजी शिक्षण संस्थेचे शिक्षक,पालक वर्ग उपस्थित होते.सूत्रसंचालन पतंगे यांनी केले तर आभार सुषमा गोमारे यांनी मानले.
————————-