शाहीर विजय जगताप अमृतमहोत्सव गौरव समिती
इचलकरंजी दि. १५–( प्रतिनिधी)- ‘‘शाहीर विजय जगताप यांचे शाहिरी कला, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय या सर्व क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. विशेषतः शाहिरी क्षेत्रातील त्यांची कॅसेटस्, विविध पुस्तके, संशोधनपर प्रबंध, आणि देशभर विविध ठिकाणी जाहीररित्या त्याचबरोबर आकाशवाणी, दूरदर्शन इ. प्रसार माध्यमांद्वारे झालेले हजारो जाहीर शाहिरी कार्यक्रम यामुळे ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांत परिचित व ख्यातनाम आहेत. नुकतीच त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने शाहीर विजय जगताप यांना अमृतमहोत्सवी गौरव मानपत्र अर्पण समारंभ व त्याचबरोबर आत्मचरित्र व गौरव ग्रंथ प्रकाशन असा भव्य समारंभ जून महिन्यामध्ये इचलकरंजी येथे करण्यात येणार आहे. या सत्काराबरोबरच ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या संकल्पनेवर आधारित शाहिरी महोत्सव कार्यक्रम त्याच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती गौरव समितीच्या वतीने प्रताप होगाडे, अहमद मुजावर, पुंडलिकराव जाधव, श्यामसुंदरजी मर्दा व मदन कारंडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे .
अमृतमहोत्सवी गौरव समितीच्या आज झालेल्या प्राथमिक बैठकीत कार्यक्रमाचे स्वरूप व संबंधित विविध समित्यांची स्थापना करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर शाहीर विजय जगताप यांच्या बरोबर शाहिरी, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय इत्यादी सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या शहरातील व राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने या समारंभासाठी सक्रीय सहकार्य व भरीव योगदान द्यावे असे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तपशीलवार कार्यक्रम निश्चितीसाठी गौरव समितीची व्यापक बैठक शनिवार दिनांक २१ मे रोजी घेण्यात येईल अशीही माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे…
प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली गौरव समितीची प्राथमिक बैठक महासत्ता चौक येथील महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीसाठी बाळासाहेब कलागते, भगतरामजी छाबडा, प्रसाद कुलकर्णी, कॉम्रेड सदा मलाबादे, डी.एम कस्तुरे, संजय होगाडे, संतोष सावंत, मुकुंद माळी, संजय कांबळे, अनिल डाळ्या, महादेव गौड, डॉ. अरुण नागवेकर, जुगनू पीरजादा, सुकुमार चौगुले, जावेद मोमीन, नौशाद जावळे, पद्माकर तेलसिंगे, शिवाजी साळुंखे व अन्य अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते…