38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeशैक्षणिक*शाळापूर्व तयारी अभियान विभागस्तरीय मेळावा*

*शाळापूर्व तयारी अभियान विभागस्तरीय मेळावा*

बालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी शाळा पूर्वतयारी अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

शाळापूर्व तयारी अभियान विभागस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन
• लातूरसह नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांचाही सहभाग
• इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी गावस्तरावर विशेष उपक्रम

लातूर, दि. 21 (वृत्तसेवा ) : इयत्ता पहिलीतील प्रवेश हा प्रत्येक बालकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. येथूनच खऱ्या अर्थाने औपचारिक शिक्षणाला सुरुवात होते. त्यामुळे या बालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी शाळापूर्व तयारी अभियानाच्या माध्यमातून शिक्षकांची योग्य प्रकारे क्षमता बांधणी व्हावी, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

बालशिक्षण व मानवशास्त्र, एससीईआरटी, पुणे द्वारा आयोजित स्टार्स प्रकल्प अंतर्गत लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) वतीने लातूर येथील श्रीकिशन सोमाणी विद्यालय येथे आयोजित शाळापूर्व तयारी अभियान विभागस्तरीय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या.

लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, लातूर डायटच्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी, नांदेड डायटचे प्राचार्य डॉ. सुदर्शन चुटकुलवार, धाराशिव डायटचे प्राचार्य दयानंद जटमुरे, लातूर जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, नांदेडच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, लातूरच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, नांदेडच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्यासह लातूर, धाराशिव, नांदेड येथील शिक्षक, पालक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

इयत्ता पहिलीपासूनच शिक्षणाची गोडी निर्माण झाली, तर विद्यार्थ्याचे आयुष्य घडते. त्यामुळे पहिलीमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया घडविण्याची आणि आयुष्याला दिशा देण्याची जबाबदारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले. लातूर जिल्ह्यात शिक्षकांनी लोकसभा निवडणुकीत अतिशय चांगली कामगिरी केली, त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. आता जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या वृक्ष लागवड मोहिमेतही शिक्षक, शाळांनी सक्रीय सहभाग नोंदवावा. शाळेत प्रवेश घेणाऱ्या ‘विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रम राबवून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावे शाळेमध्ये एक झाड लावावे. तसेच विद्यार्थ्यांचा वाढदिवसादिवशी झाडाचाही वाढ दिवस साजरा करावा, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

ग्रामीण भागातील इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळापूर्व तयारी अभियान उपयुक्त ठरेल. हे अभियान इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित होणाऱ्या बालकांसाठी असल्याने यामध्ये शिक्षण विभागासोबतच एकात्मिक बाल विकास प्रकल्प, आरोग्य विभाग यांनीही सहभाग देणे आवश्यक आहे, असे लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले. तसेच लातूर जिल्ह्यात 860 अंगणवाडीमध्ये ‘वन स्टॉप सेंटर’च्या माध्यमातून महिला व मुलांना समुपदेशन, लसीकरण यासह विविध सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात ‘आकार’ आणि ‘आरंभ’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.

शाळापूर्व तयारी अभियान यशस्वी होण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्नांची आणि शिक्षक, पालक यांची भूमिका महत्वाची आहे. एकही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच शिक्षकांना याबाबत योग्य प्रकारे प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सांगितले.

शाळापूर्व तयारीसाठी हा विभागस्तरावरील पहिलाच मेळावा असून या अभियानामुळे कोणता विद्यार्थ्यी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित होणार असल्याचे लक्षात येवून त्याचा प्रवेश जलदगतीने होण्यास मदत होते. पहिलीमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत भाषिक आणि गणितीय कौशल्य शिकविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यावेळी म्हणाले.

प्रारंभी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर व डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरुपात स्वागत करण्यात आले. तसेच मेळाव्याच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या विविध दालनांची मान्यवरांनी पाहणी केली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘गाथा यशाची : समावेशनाकडून शिक्षणाकडे…’ या पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी यांनी केले, सतीश भापकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]