लातूर 🙁 वृत्तसेवा )- रोटरी क्लब ऑफ चाकूरच्या वतीने चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द (खुर्दळी) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सोमवार दि.१४ रोजी मराठी, सेमी इंग्रजी शब्दकोशाचे व क्रीडा साहित्यांचे वाटप करण्यात आले. रोटरीच्या वतीने तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शब्दकोशाचे वाटप करण्यात येत आहे. यावेळी रुद्राक्ष जनगावे या विद्यार्थ्यांने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेचे सर्वांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बालाजीराव पाटील होते. सरपंच सौ.प्रचिता संजयकुमार भोसले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तर रोटरी अध्यक्ष चंद्रशेखर मुळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून परिवर्तन संचालक सुरेश हाके पाटील, आंतरराष्ट्रीय सेवा संचालक शैलेश पाटील, विन्स संचालक सागर रेचवाडे, प्रकल्प दृष्टी चे संचालक संगमेश्वर जनगावे, चेअरमन जलील पटेल, उपसरपंच रमेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते हावगिराज जनगावे, विमा प्रतिनिधी संजयकुमार भोसले, शालेय समितीचे अध्यक्ष शिवशंकर हैद्राबादे आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.

रोटरी क्लब च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. रोटरीच्या वतीने साक्षरता उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे इंग्रजी शब्दकोश वाटप करण्यात येत आहे. याच बरोबर शैलेश पाटील यांच्यातर्फे क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी रोटरीचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे यांनी रोटरीच्या विविध सामाजिक कार्य व उपक्रमाची माहिती दिली. तर संगमेश्वर जनगावे यांनी मागील व वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह शिक्षिका श्रीमती नंदा नरहरे यांनी केले. यावेळी प्रभारी केंद्र प्रमुख रामराव हावडे, मंगल हत्ते, आत्माराम बिरादार, राधिका रेड्डी, अनुसया रोकडे, कल्पना देशपांडे, सुनीता राडकर, करुणा शिंदे यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.