हौशी माणसं..!
आमच्या शेजारच्या बंगल्यात एक म्हातारे इंग्लिश आजी-आजोबा रहातात. आजोबा साधारण ८०-८१ वर्षांचे. गाड्यांची भरपूर आवड. संपूर्ण आयुष्य गाड्या आणि ट्रक्ससोबत काढलेलं. घराजवळ १० मिनीटांच्या ड्राईव्हवर त्यांचं स्वत: चं मोठ्ठ गॅरेज आहे. ह्या वयातही ‘पैलतीर’ किंवा ‘हरी-हरी’ वगैरे न करत बसता ते रोज सकाळी बरोबर ६:५५ वाजता त्यांच्या गॅरेजमध्ये जातात. दिवसभर काम करतात. संध्याकाळी ५ वाजता घरी परत येतात. त्यांच्याकडे बऱ्याच ‘व्हिंटेज’ गाड्याही आहेत. मस्त पॉलिश वगैरे करून त्या ठेवलेल्या असतात. उन्हाळयात आजोबा त्या गाड्या बाहेर काढतात आणि आजोबा-आजी दर विकेंडला फिरायला जातात. दोघेच. दक्षिण इंग्लंडच्या किनाऱ्यावर त्यांची एक छोटीशी बोटही आहे ठेवलेली. बहुतेकदा तिथेच. शनिवारी आजोबा मस्त हॅट वगैरे घालून फिरायला जाताना एकदम मस्त दिसतात. आजोबा स्वत: ‘हॅंडस ऑन’ मेकॅनिक असल्याने ‘गाडी बिघडली तर’ वगैरेची त्यांना अजिबात भिती वाटत नाही.
सोबत फोटोत आहे ती आमची फेव्हरेट गाडी. मॉरिस मायनर. १९५३चं मॉडेल. सुमारे ७० वर्ष जुनी गाडी आहे ही. पण कशी चकचकीत ठेवली आहे पहा. आणि सगळे ओरिजिनल पार्टस बरं का. (जगभरातून त्यांच्या गाड्यांसाठी त्यांनी पार्टस कसे आणि कुठून कुठून मिळवले ह्याबद्दल तर एक संपूर्ण पुस्तकच होऊ शकेल!)
मी आमची गाडी सहसा संध्याकाळी उन्हं उतरल्यावर धुतो. त्यांची गॅरेजमधून परत यायची तीच वेळ साधारणपणे. ‘हाय-हॅलो’ होतंच. परवा बोलताना विषय निघाला तेव्हा ते म्हणाले की त्यांचे आजोबा पहिल्या महायुध्दात लढले होते आणि बेल्जियममध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. मी त्यांना विचारलं की फक्त त्यांच्या सैनिकी युनीटचं नाव सांगा बाकी मी सगळी माहिती काढून ठेवतो. दोन दिवस बसून मी ती सगळी माहिती काढून ठेवली आहे. आता उन्हाळा संपला की शेजारच्या दोघा आजीआजोबांना घरी जेवायला बोलावून ते सगळं दाखवायचा बेत आहे. बघूया कधी जमतंय!
– संकेत कुलकर्णी (लंडन)
तळटीप: सोबत दिसणारी दुसरी गाडी नवीन कोणती – हा प्रश्न पडला असेल त्यांच्यासाठी. आजोबांना नव्या गाड्यांचीही हौस आहे. रोज गॅरेजमध्ये जायला त्यांचाकडे दणदणीत व्हॉल्वो एक्ससी ९० आहे. २०२० चं मॉडेल!