दिन विशेष
मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी मोठ्या शोर्याने निजामशाहीच्या विरुद्ध लढा दिला, अशा स्वातंत्र्य सैनिकांमध्ये बीड जिल्ळ्यातील पाटोदा ता.अंबाजोगाई येथील दिवंगत स्वातंत्र्य सेनानी विश्वनाथराव हरिभाऊ उगले यांचा १३ जुलै हा स्मृतिदिन. म्हणून त्यांच्या कार्य -कर्तृत्वाचा घेतलेला हा धांडोळा… —- संपादक
मराठवाडा मुक्ती संग्रामात बीड जिल्ह्यातील पाटोदा ता. अंबाजोगाई (मोमिनाबाद) गावचे मोठे योगदान आहे. ऐन तरुणाईत स्वातंत्र्य आंदोलनाने भारलेले स्वातंत्र्य सैनिक विश्वनाथराव उगले हे याच गावचे भूषण. १९४८ पर्यंत मराठवाडा विभाग निजाम राजवटीत होता. भारत देश स्वतंत्र झाला तरी निजामाने स्वतंत्र भारतात विलीन होण्यास नकार दिला होता. त्यामुळे निजामशाही विरुध्द गावा गावात वातावरण निर्माण होत होते. विविध कार्यक्रम, आंदोलने केली जात होती. पाटोदा ता. अंबाजोगाई तत्कालिन मोमिनाबाद येथील विश्वनाथराव उगले, श्रीरंगजी लोहिया, भानुदास पनाळे या तरुणांच्या मनामध्येही निजामशाहीच्या विरोधात काहीतरी कार्यक्रम घेतला पाहिजे म्हणून ठिणगी पेटत होती. या तीन तरुणांनी निजामाच्या विरोधात बंड पुकारुन पुढाकार घेवून पाटोदा गावातून तिरंगा झेंड्याची मिरवणूक काढून गावातील चौकात भारतीय तिरंगा ध्वज फडकवला. निजामाच्या विरोधात जनजागृती केली. त्यामुळे निजामाने त्या तिघांनाही ३० ऑगस्ट १९४७ ला अटक करून औरंगाबाद आताच्या संभाजीनगरातील हर्सुल जेलमध्ये डांबले. या ऐतिहासिक घटनेचे पडसाद पाटोदा पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये उमटले. रझाकारांच्या अन्यायाविरुद्ध गावोगावी लोक संघटित होऊ लागले. आणि मराठवाडा मुक्ती लढ्याला बळ मिळू लागले. एक ते दिड वर्षांनंतर विश्वनाथ उगले, श्रीरंगजी लोहिया व भानुदास पनाळे यांची २५ एप्रिल १९४८ रोजी जेलमधून सुटका करण्यात आली. या तिन्ही कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत निजामाची माफी मागितली नाही. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, स्वतंत्र भारतात आम्ही राहू इच्छितो म्हणूनच आम्ही शांततेच्या मार्गाने झेंडा सत्याग्रह केला. आम्ही माफी मागणार नाहीत. अशी ठाम भूमिका त्यांची होती. अखेर १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्त झाला. या स्वातंत्र्य लढ्यातील
स्वातंत्र्य सैनिक विश्वनाथराव उगले म्हणजे पाटोदा गावचे बप्पा. विश्वनाथराव उगले यांची आर्थिक परिस्थिती तशी हलाखीचीच होती. तरी त्यांना शिक्षणाबद्दलची तळमळ होती. म्हणून त्यांनी आपल्या मुला- मुलींना चांगले शिकवले. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना जीवनाची दिशा दाखवण्याचे महत्कार्य केले. शिक्षणातून त्यांनी भावी पिढीमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.

स्वत:च्या आदर्श आचरणाने, संस्काराने, सदवर्तनाने तरूण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला. बप्पानी पाटोदा गावातील जलसंधारणाच्या कामासाठी एक लाख रुपयांचा निधी देऊन सामाजिक बांधिलकी जपली. त्याच बरोबर समतेचा विचार रुजविण्यासाठी त्यांनी आंतर जातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन अनेक आंतरजातीय विवाह त्यांनी लावून दिले.शेतकर्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. बप्पांच्या संघर्षशील जीवनात त्यांची सहचारिणी पार्वतीबाई यांची त्यांना खंबीर साथ मिळाली. बप्पा म्हणजे एक झुंजार स्वातंत्र्य सेनानी होते. १५ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांच्या कार्य कृतत्वावर प्रकाश झोत टाकणारा ’विश्वपर्व’ नामक गौरवग्रंथ मुक्तरंग प्रकाशनांद्वारे बप्पांच्या भाचेसुनबाई प्रा. डॉ. सुरेखा बनकर-बादाडे, ऍड. वसंत विश्वनाथराव उगले, रवींद्र विश्वनाथराव उगले, अशोक विश्वनाथराव उगले हे चिरंजीव व सुकन्या केशरबाई उगले- काळे यांनी प्रकाशित केला . या ग्रंथाने बप्पांचे मराठवाडा मुक्ती लढ्यातील कार्य आणि जीवन परिचय उजेडात आला. नव्या पिढीसाठी त्यांचे जीवन आणि कार्य प्रेरणादायी आहे.
स्वातंत्र्य सेनानी विश्वनाथराव उगले उर्फ बप्पांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.!

- अँड. वैभव उगले
उच्च न्यायालय, मुंबई
मो. 9595246252