लातूर जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार
- आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
विश्वजीत गायकवाड यांची बिनशर्त माघार
लातूर ( माध्यम वृत्तसेवा) :--उदगीर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा इंजिनियर विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे यांना पाठिंबा दिला असल्याची असल्याची घोषणा आमदार संभाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाकडून विकसित भारत ही संकल्पना राबवली जात आहे. विकासाची ही गंगा महाराष्ट्रात यावी यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येण्याची आवश्यकता आहे.या अनुषंगाने राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशी थेट लढत व्हावी अशी नेतृत्वाची धारणा आहे.
यासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी दाखल केलेल्या पदाधिकाऱ्यांकडून आपले अर्ज मागे घेतले जात असून उदगीर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले विश्वजीत गायकवाड यांनी आपली उमेदवारी बिनशर्त मागे घेतली असल्याची घोषणा माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.
लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. निलंगेकर बोलत होते. यावेळी राज्याचे क्रीडा व युवककल्याण मंत्री संजय बनसोडे,माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड व विश्वजीत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकारांशी बोलताना आ.निलंगेकर म्हणाले की, विश्वजीत गायकवाड हे एक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत.निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी यापूर्वी अनेक वेळा व्यक्त केली.परंतु पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार प्रत्येक वेळी त्यांनी माघार घेतली. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे यासाठी आजही त्यांनी माघार घेतली आहे.ज्या विश्वासाने गायकवाड यांनी आपली उमेदवारी मागे घेतली तो विश्वास उदगीरचे आ.संजय बनसोडे सार्थ ठरवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आ.निलंगेकर म्हणाले की,ज्या-ज्या ठिकाणी महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल केले आहेत त्यांच्याशीही चर्चा सुरू आहे.हे पदाधिकारीही आपले अर्ज मागे घेतील. जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होईल.सर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येतील,असा विश्वासही आ.निलंगेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार मंत्री संजय बनसोडे म्हणाले की,गेल्या काही महिन्यांपासून विश्वजीत गायकवाड उदगीर मतदार संघातील नागरिकांच्या संपर्कात आहेत. महायुतीकडून लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे.राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे यासाठी एक- एक जागा अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सूचनेचा आदर करून विश्वजीत गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे निश्चित केले आहे.त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.
उदगीर मतदारसंघात विश्वजीत गायकवाड यांच्यासह भाजपा आणि महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची ग्वाही मी देतो. आगामी काळात प्रचारासाठी विश्वजीत गायकवाड माझ्यासोबत असतील,असा विश्वासही बनसोडे यांनी व्यक्त केला.
आपले मत व्यक्त करताना विश्वजीत गायकवाड म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांचे पालन मी केले आहे.राज्यात महायुतीचे सरकार आले पाहिजे यासाठी मी माघार घेत आहे.सरकार आणण्यासाठी मी काम करणार आहे.संजय बनसोडे मतदारसंघातील नागरिकांच्या नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवतील. माझ्याकडून असणाऱ्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष व फाउंडेशनच्या माध्यमातून मी सतत संपर्कात राहीन. पक्ष योग्य वेळी,योग्य ठिकाणी मला संधी देईल, असेही विश्वजीत गायकवाड म्हणाले.
पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड यांनी केले.