मंगलमय ,धार्मिक वातावरणात अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरुद्ध महायाग एवं श्रीमद् भागवत कथेस प्रारंभ
लातूर; दि. 14 (वृत्तसेवा)- अत्यंत मंगलमय व धार्मिक वातावरणात तसेच वेद मंत्रोच्चारात श्री श्री अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरुद्ध महायागास बुधवारी प्रारंभ झाला. सर्वांचे आकर्षण असलेल्या आणि गेल्या कित्येक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या प.पू. विद्यानंदजी सागर महाराज( बाबा ) यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास सुरुवात झाली .कथा प्रवक्ते बाबाजींनी आपल्या अमोघ वाणीने यज्ञ व धर्माचे महत्त्व सांगत भाविक भक्तांना भक्ती सागरात तल्लीन केले.
श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग समिती लातूरच्या वतीने मानव कल्याण एवम विश्वशांतीसाठी लातूर मधील राजीव गांधी चौकातील पंचमुखी हनुमान परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य कथा मंडपात बुधवार दि। 14 फेब्रुवारी 2024 पासून परमपूज्यनीय विद्यानंदजी सागर महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास प्रारंभ झाला. 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कथेची सांगता काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
आज सकाळी क्रीडा संकुल येथून विशाल शोभायात्रा काढण्यात आली. नंदी स्टॉप ,खर्डेकर स्टॉप, राजीव गांधी चौक या प्रमुख मार्गावरून अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने काढण्यात आलेल्या या शोभायात्रेने लातूरकरांचे लक्ष वेधले. जवळपास तीन तासानंतर ही शोभायात्रा कथास्थळी पोहोचली. यावेळी प.पू. विद्यानंदजी सागर महाराज यांच्या हस्ते गोमातेची पूजन करून यज्ञशाळेत प्रदक्षिणा घातल्यानंतर ब्रह्मव्रदांच्या वेद मंत्रोच्चारात श्री श्री अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरुद्ध महायागास प्रारंभ करण्यात आला. यावेळी 108 दम्पती (जोडप्यांनी ) यज्ञात आहुती टाकली .दररोज सात दिवस १०८ जोडपे यज्ञास बसणार आहेत. यज्ञ आचार्य वेधशास्त्र संपन्न सुरेश शिवपुरी (पैठण ) यांच्या अधिपत्याखाली यज्ञ कार्य होत आहे. यावेळी देशभरातून आलेल्या सर्व संतांनी यज्ञशाळेत भेट दिली.
क्रीडा संकलातून शोभायात्रेस प्रारंभ झाला .यावेळी अग्रभागी घोडेस्वारावरावर छत्रपती शिवाजी महाराज ,जिजाऊंच्या वेशभूषेत बाल कलावंता आरुढ झाले होते .यानंतर डोईवर मंगल कलश घेतलेल्या जवळपास अकरा हजार माता - भगिनी होत्या. वासुदेव, आराधी, वारकरी पथक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. मध्यभागी एका सजवलेल्या रथावर श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते प.पू. विद्यानंदजी सागर महाराज होते .यानंतरच्या रथात देशभरातून आलेले साधुसंत होते. शोभायात्रेत पांढरे कपडे परिधान केलेले पुरुष आणि भगव्या साडी परिधान केलेल्या माता -भगिनी सहभागी झाल्या होत्या. अनेकांच्या हातात भगवे ध्वज होते . धनगरी ढोल, लेझीम पथक, हलगी, ढोल ताशे ,डीजेच्या तालावर तल्लीन होऊन भावीक भक्त नृत्य करताना दिसून येत होते. यावेळी देशभरातून आलेल्या साधू संतांना देखील नृत्य मध्ये सहभागी होण्याचा मोह आवरता आला नाही.
या शोभायात्रेत स्वामी ब्रह्मानंदजी (इंदौर ) ,स्वामी गोविन्दानंद गिरिजी( हरिद्वार ),स्वामी राघवानंद गिरिजी (राजस्थान ), स्वामी सुनिल भारतीजी(राजस्थान ),स्वामी शिवांक गिरि (हरिद्वार),स्वामी कैवल्य गिरिजी( हरिद्वार ), स्वामी सोमेश्वर गिरिजी (त्र्यंबकेश्वर), स्वामी गौरक्षानंद गिरिजी,स्वामी बालकानंद गिरिजी ( आंध्र प्रदेश ) याच्यासह समिती प्रमुख हरिप्रसाद मंत्री, तसेच संजय बोरा, चंद्रकांत बिराजदार, विशाल जाधव, राजेश्वर बुके, सिद्राम जाधव, दगडे पाटील आदी उपस्थित होते.