‘
लातूर/प्रतिनिधी:आषाढी वारीनिमित्त पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने पाठविण्यात आलेल्या वैद्यकीय पथकाने ३ अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचवले.या पथकाने १० हजाराहून अधिक वारकऱ्यांवर मोफत उपचार केले,अशी माहिती दिंडी प्रमुख शाम बरुरे यांनी दिली. मागील १८ वर्षांपासून विवेकानंद रुग्णालय आषाढी वारी मधील वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय पथक पाठवत आहे.यावर्षीही दि.३० जून रोजी विवेकानंद रुग्णालयाचे पथक रवाना झाले होते.या पथकामध्ये डॉ.आकाश हौशट्टे यांच्यासह चालक राजाभाऊ साळुंके,गोविंद सावंत,सहदेव गावकरे,संगमेश्वर बरुरे,प्रताप चव्हाण,विष्णू पंडगे या परिचारकांचा समावेश होता. आषाढी वारी करून परतल्यानंतर गुरुवारी (दि.२१ जुलै )सायंकाळी अनुभव कथन आणि स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बरुरे यांनी ही माहिती दिली.या कार्यक्रमास पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका,डॉ.गोपीकिशन भराडिया, संस्थेचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर,डॉ.दिलीप देशपांडे, संस्थेचे कार्यवाह डॉ.राधेश्याम कुलकर्णी यांच्यासह वारीमध्ये रुग्णालयाच्या पथकातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करणारे शाम बरुरे व चंद्रकांत आरडले यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बरुरे व आरडले यांच्यासह वारकऱ्यांना पायाला लावण्यासाठी मलम उपलब्ध करून देणारे शाम भराडिया यांचा सत्कार करण्यात आला.
वारीतील अनुभव सांगताना डॉ.आकाश अवशेट्टे यांनी वाखरी येथे एक महिला अत्यवस्थ झाल्याचे सांगितले.ती महिला बेशुद्ध होती. नाडी देखील लागत नव्हती.अशा स्थितीत तिच्यावर उपचार केले. उपचारानंतर ती महिला पुन्हा एकदा चालत वारीत सहभागी झाल्याचे ते म्हणाले.अनेक ठिकाणी वारकऱ्यांना झाडाखालीच सलाईन लावत उपचार केले.रुग्णवाहिकेजवळ, रस्त्याच्या कडेला जेथे जागा मिळेल तिथे उपचार करण्यात येत होते.दिवस-रात्र याचा विचार न करता केलेल्या या उपचारातून समाधान मिळाल्याचेही ते म्हणाले.
शाम बरुरे यांनी सांगितले की, कांही वर्षांपूर्वी आम्ही रुग्णालयाकडे येऊन वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी पथक पाठवण्याची विनंती केली होती.रुग्णवाहिकेचे इंधन भरण्यास आम्ही तयार होतो परंतु रुग्णालयाने सर्वच सुविधा उपलब्ध करून दिल्या.विवेकानंद रुग्णालयाच्या उपचारांवर लातूर जिल्ह्यातील नागरिकांना तर विश्वास आहेच परंतु वारीतील वारकरीही विवेकानंदच्या पथकाला आपला दवाखाना असे संबोधतात.यंदाच्या वारीत तीन रुग्ण अत्यवस्थ झाले होते. विवेकानंद रुग्णालयाच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले.ते सर्व रुग्ण ठणठणीत बरे झाले.नंतर ते रुग्ण डॉक्टरांचा सत्कार करून आभार मानण्यासाठी आले होते. परंतु तोपर्यंत विवेकानंदचे पथक पंढरपूर येथे पोहोचले होते. पथकाकडून मोफत उपचार केले जातात परंतु त्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही.भविष्यात मोफत उपचार असा उल्लेख करायला हवा.या पथकात महिला परिचारकांचाही समावेश हवा,अशी सूचना त्यांनी केली. यावेळी विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.