●उदगीर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचे अनेक प्रकल्प●
◆महाविकास आघाडीला येथून भरघोस पाठिंबा मिळेल◆
●माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते●
◆उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामाचे व विविध विकास कामांचे लोकार्पण◆
लातूर प्रतिनिधी २२ आक्टोंबर २२ :
साखर कारखाना, बाजार समिती, आणि विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकारातून उदगीर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचे अनेक प्रकल्प आकार घेत आहेत याची जाणीव येथील जनतेला नक्कीच आहे, त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या सर्वच निवडणुकांमधून महाविकास आघाडीला येथून भरघोस पाठिंबा मिळेल असा विश्वासही यावेळी बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते आज शनिवार दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी उदगीरशहरा नजीकच्या सोमनाथपूर येथील उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या गोदाम क्रमांक चार (क्षमता पाच हजार मे. टन) व सिमेंट काँक्रीट रस्ता व संरक्षण भिंतींसह विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश्वर निटुरे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, सचिव अभय साळुंखे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, सचिव भगवान पाटील, जळकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, जळकोटचे उपनगराध्यक्ष ममनथआप्पा किडे, रामराव बिराजदार, लक्ष्मीताई भोसले, प्रभावती कांबळे, उदगीर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मंजूरखा पठाण, प्रीती भोसले, बाबासाहेब गायकवाड उषाताई कांबळे, सूर्यशीलाताई मोरे, चंद्रकांत वैजापूरे, प्रवीण पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उदगीर तालुकाप्रमुख कैलास पाटील, राष्ट्रवादीचे उदगीर तालुकाध्यक्ष सय्यद, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटूरे, बाबासाहेब गायकवाड, प्रवीण सूर्यवंशी आदीसह उदगीर बाजार समितीचे सर्व संचालक,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी, आडते, हमाल मापाडी गुमास्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, आदरणीय चंद्रशेखर भोसले यांनी ग्रामीण भागाचे नेतृत्व दमदारपणे केले, त्या काळात उदगीरमध्ये त्यांच्या छत्राखाली सर्वजण होते. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारांची व चंद्रशेखर भोसले यांच्या संघटनात्मक कौशल्याचे बसवराज पाटील नागराळकर, राजेश्वर निटुरे यांच्यामुळे न भूतो न भविष्यती असे यश या बाजार समितीत आपल्या पॅनलला मिळाले. शेतकरी, शेतमजूर, हमाल, गुमास्ता, मापाडी यांचे भविष्य सातत्याने उज्वल कसे राहील यासाठी आम्ही काम करतो. विरोधकांना शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा विश्वास जिंकून निवडणुका जिंकता येत नाहीत लातूर आणि उदगीर या नावाजलेल्या क्रमांक एक व दोनच्या बाजार समिती आहेत राज्यात लातूरच्या बाजारपेठेला उत्कृष्ट बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळाला आहे असे सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरमध्ये तेलबियावर प्रक्रिया करण्यासाठी टीना कारखाना आणला १९८० च्या दशकात लातूरमध्ये सोयाबीनवर तेल बियावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिले, त्या उद्योगांना आता ४० वर्षे पूर्ण झाले आहेत. हे तेलबिया प्रक्रिया उद्योग उभे राहिल्याने परिसरात अनेक कारखाने उभे राहिले आहेत, आज सोयाबीनचा दर विचारण्यासाठी अमेरिकेतील शिकागोहून लातूरच्या बाजारपेठेत फोन येतो ही सर्व किमया लोकनेते विलासराव देशमुख यांच्यामुळे झाली आहे. साखर व तेलबिया प्रक्रिया उद्योग हे जपले पाहिजेत, आज लातूरच्या पावलावर पाय ठेवून उदगीर काम करत आहे याचा मला आनंद आहे. उसाला सर्वाधिक भाव देणारा, उच्च प्रतीची साखर तयार करणारा कारखाना विलास सहकारी साखर कारखाना तोंडार युनिट क्रमांक दोन आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना मांजरा परिवाराने घेतला. आम्ही येथे आपला विश्वास कामातून प्राप्त केला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी उदगीर बाजार समिती अनेक योजना राबवते आहे. शेतकऱ्यांचा कृषी माल पावसात भिजू नये म्हणून या बाजार समितीने गोडाऊन उभारले अशा प्रकारची गोडाऊन छोट्या स्वरूपात जिल्हा परिषद सर्कल मध्ये उभरावे अशी त्यांनी सूचना केली. येत्या निवडणुकीत काँग्रेसच्या विचाराचे पॅनल या बाजार समितीमध्ये निवडून दिल्यानंतर पाच रुपयात जेवण या बाजार समितीमध्ये सुरू करू अशी घोषणा करून त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात उदगीर मध्ये विकास कामे झाली आहेत. राज्यात आताही आम्ही महाविकास आघाडी रूपात कार्यरत आहोत. सोयाबीनचे भाव पडले आहेत ते वाढत नाहीत, कारण केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे सोयाबीनचे भाव पडले, सध्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, ग्रामीण भागामध्ये महागाई जास्त प्रमाणात आहे, बेकारी वाढत आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारची चुकीची धोरणे आहे. येत्या उदगीर बाजार समितीच्या निवडणुकीच्या आतापासूनच कामाला लागा असे सांगून त्यांनी लोकनेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना उदगीरमध्ये सिंचनाच्या मोठ्या सोयी सुविधा उभारल्या तिरु नदीवर बॅराज उभे राहणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना बारमाही पिके घेता येतील असे ते म्हणाले.

माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे म्हणाले की, महाविकास आघाडीने विविध लोककल्याणकारी काम केले, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हिताचे चांगले निर्णय घेतले आहेत. मागील तीन वर्षात उदगीर विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे केली. आज लोकनेते विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते असे सागून बाभळगावच्या दसरा मेळाव्याला एक चांगली परंपरा आहे असे नमूद केले. भारताने 75 वर्षात प्रगती केली आहे, काँग्रेस सरकारने अन्नसुरक्षा कायदा केला, लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरला रेल्वे आणली, लातूर मुंबई रेल्वेचे काम रोजगार हमीच्या माध्यमातून करण्यात आले, तसेच लातूर विमानतळाचे कामेही रोजगार हमीच्या माध्यमातून करण्यात आली, त्यांनी उदगीर मतदार संघातील नदीवर बॅरेजेस बांधले, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाली असे सांगून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विलास सहकारी साखर कारखानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक भाव दिल्याबद्दल आमदार बनसोडे यांनी त्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील यांनी करून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती दिली. उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश्वर नीटूरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजीराव देवनाळे यांनी केले.
——