संपादक, साहित्यिक संजय आवटे यांचे मत; तरुणांना ‘आयडिया ऑफ इंडिया’ सांगण्याची गरज
—-
लातूर : ज्या कालावधीत लोकनेते विलासराव देशमुख हे सर्वाधिक हवे होते, त्याच कालावधीत ते आपल्यातून गेले. ते असते तर जगनमोहन रेड्डी यांच्यासारखा झंझावात विलासरावांनी इकडे निर्माण केला असता आणि आजचे चित्र वेगळे राहिले असते, असे मत संपादक – साहित्यिक श्री. संजय आवटे यांनी येथे व्यक्त केले.
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या ७८व्या जयंतीचे औचित्य साधून ऊस उत्पादक शेतकरी मांजरा परिवार यांच्या वतीने श्री. संजय आवटे यांचे ‘लोकचळवळीतील समर्पित लोकनेता : विलासराव देशमुख’ या विषयवार शुक्रवारी (ता. २६) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेक दुर्मिळ आठवणी, किस्से सांगत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी सहकारमहर्षी, माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख हे अध्यक्षस्थानी होते.
श्री. आवटे म्हणाले, विलासराव देशमुख हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. ते महाराष्ट्राचे महानायक, महानेते होते. त्यांना एकणे, त्यांच्याशी बोलणे हा एक सुंदर अनुभव असायचा. ‘मुख्यमंत्री असावा तर असा’, असे प्रत्येकाला वाटायचे. त्यांचे वक्तृत्व, कर्तुत्व, नेतृत्व निःसंशय मोठे होते. सर्व जाती-धर्माचे लोक त्यांच्यासोबत होते. त्यांनी कोणालाही दूर केले नाही. हे त्यांचे वेगळेपण होते. सर्वसामान्य माणसाला मी काय देवू शकतो, याचा विचार त्यांनी प्रथम केला. कारण ते सर्वसामान्यांमधून आले होते. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य माणसांच्या व्यथा, दुःख, स्वप्न माहिती होते. असा नेता आता होणे नाही.

सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र राहणे, हा खरा भारत आहे. हा भारत सध्या काहींना नकोय. खरा भारत पुसून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न रोखण्यासाठी खरा भारत काय आहे, हे आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितले पाहिजे. समाजात जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे तरुणाई भरकटत आहे. त्यांना ‘आयडिया ऑफ इंडिया’ म्हणजेच भारताचा विचार, भारताची गोष्ट सांगण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले, राजू कसबे, राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी, सत्तार पटेल, संजय जगताप, नवनाथ शिंदे, सुधीर गोजमगुंडे, श्रीनिवास शेळके, श्रीशैल उटगे, सर्जेराव मोरे, संभाजी सुळ, श्रीपतराव काकडे, सुभाष घोडके आदी उपस्थित होते.
—
हे प्रारूप राज्यासमोर यायला हवे
ज्या विचारांसाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरते तोच विचार करणारा माणूस आत खुर्चीवर आहे. असे दुर्मिळ उदाहरण लातूरमध्ये पहायला मिळत आहे. वास्तविक, हे प्रारूप महाराष्ट्रासमोर येण्याची आवश्यकता आहे. इथे शेतकरी संघटना आणि चेअरमन-संचालक हे शेतकरी हिताच्या एकाच धाग्याने बांधले गेले आहेत. हा संस्कार, हा विचार विलासराव देशमुख आणि दिलीपराव देशमुख यांनी इथल्या मातीत रुजवला, हे फार महत्वाचे आहे, असे श्री. संजय आवटे यांनी सांगितले.
—