विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची पालकत्वाच्या भूमिकेतून काळजी घ्या – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
• प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक यांची बैठक
• आरोग्य, सुरक्षिततेच्याबाबतीत हलगर्जीपणा नको
• वसतिगृह, शाळेत सीसीटीव्ही बंधनकारक; सुरक्षारक्षक नेमा
• पिण्याच्या पाण्याची शुद्धता, आहाराची गुणवत्ता नियमितपणे तपासा
लातूर, दि. ०८ : आई-वडील आपल्या मुलांना अत्यंत विश्वासाने शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहात पाठवितात. या विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही प्रत्येक शाळा, महाविद्यालायचे प्राचार्य, वसतिगृहाचे अधीक्षक यांची जबाबदारी आहे. केवळ जबाबदारी म्हणूनच नव्हे पालकत्वाच्या भूमिकेतून त्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी. यामध्ये कोणत्या प्रकारची कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक वर्षा ठाकूर-घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, तहसीलदार सौदागर तांदळे यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व शाळा, वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची शुद्धता, वसतिगृहातील भोजनाची गुणवत्ता, शाळा आणि वसतिगृहात विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षितता याकडे विशेष लक्ष दिले जावे. यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे सर्व शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहचालकांना बंधनकारक आहे. विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, महिला सुरक्षारक्षक यांची नेमणूक करावी. स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे आवश्यक आहे. प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक, गृहपाल यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी सुसंवाद ठेवून त्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घ्याव्यात. त्याचे तातडीने निराकरण करावे. प्रत्येक शाळा, वसतिगृहात तक्रार पेटी लावण्यात यावी. या तक्रार पेटीत येणाऱ्या तक्रारींची योग्य दखल घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.
शाळा, महाविद्यालयाच्या दर्शनी भागात महत्वाचे दूरध्वनी क्रमांक लावणे, पिण्याचे शुद्ध पाणी, वसतिगृहातील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी, सीसीटीव्ही, भोजनाची गुणवत्ता, स्वच्छतागृहांची साफसफाई आणि सुरक्षितता, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसची सुरक्षितता, तक्रार पेटी, सुरक्षा रक्षक नियुक्ती आणि शाळा, महाविद्यालये व वसतिगृहात नियुक्त कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी आदी बाबींविषयी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सूचना दिल्या. तसेच या सूचनांची आठ दिवसात अंमलबजावणी करून अहवाल सादर करावा. यापुढे शाळा, वसतिगृह यांची अचानकपणे तपासणी करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहात करावयाच्या उपाययोजनांबाबत नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली सर्वांसाठी बंधनकारक असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाल्यास संबंधित संस्थेला जबाबदार धरण्यात येईल. तसेच प्रत्येक शाळांनी ‘सिक्युरिटी ऑडिट’ करून घ्यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने संभाव्य धोक्यांवर वेळीच उपाययोजना करणे शक्य होईल. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालक, मदतनीस, शाळेतील, वसतिगृहातील कर्मचारी, भोजन व्यवस्था पाहणारे ठेकेदार व कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले.
प्रारंभी उपजिल्हाधिकारी श्रीमती गाठाळ, शिक्षणाधिकारी श्री. मापारी, समाज कल्याण सहायक आयुक्त श्री. चिकुर्ते आणि तहसीलदार श्री. तांदळे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक, गृहपाल यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.