*विद्यानंद सागर महाराजांची लातूरात श्रीमद् भागवत कथा*

0
687


 *लातूर ; दि.२२ ( प्रतिनिधी )* — श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने दि. २५ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ या कालावधीत लातूर नगरीत प.पु. विद्यानंदजी सागर महाराज बाबा यांच्या अमोघ वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे ,  अशी माहिती संयोजक व समितीचे अध्यक्ष संजय बोरा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.    

राजीव गांधी चौक रिंग रोड भागातील पंचमुखी मंदिर परिसरातील भव्य मंडपात दररोज दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत परमपूजनीय विद्यानंद सागर महाराज बाबा यांचा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन होत आहे. ही कथा भव्य दिव्य अशा स्वरूपात होण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून बाबांच्या मार्गदर्शनाखाली हजारो स्वयंसेवक  व समितीचे पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत .    

 प.पू. विद्यानंद सागर महाराज यांची भागवत कथा आतापर्यंत महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक , आंध्र , मध्य प्रदेशासह अनेक राज्यातील विविध भागात यशस्वीरित्या संपन्न झाली असून अतिशय अमोघ वाणीने व  सुश्राव्य पणे बाबा कथा सांगतात त्यामुळे त्यांच्या कथेस संपूर्ण देशभरातून मागणी होत असते. गातेगाव येथील राधाकृष्ण मंदिर अध्यात्म आश्रमामध्ये प.पू. विद्यानंद सागर महाराजांचे अनेक धार्मिक कार्यक्रम व श्रीमद् भागवत कथा वारंवार होतात. या कार्यक्रमास देशभरातून भाविक व ऋषी , महंत येत असतात.  काही वर्षांपूर्वी बाबांनी गातेगाव येथील आश्रमात भागवत कथेच्या निमित्ताने मिनी कुंभमेळाच भरवला होता .

दि. २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता औसा रस्त्यावरील आदर्श काँलनी पासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा  , राजीव गांधी चौक मार्गे कथास्थळी पोहोचेल. दि. १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी दहा ते बारा या वेळात बाबांच्या काल्याच्या कीर्तनाने या भागवत कथेची सांगता होणार आहे , असेही समितीचे अध्यक्ष संजय बोरा यांनी शेवटी सांगितले.या पत्रकार परिषदेस समितीचे सचिव विशाल जाधव ,उपाध्यक्ष राजेश्वर बुके, सुरेश पवार ,गणपतराव बाजूळगे, हरिप्रसाद मंत्री ,अँड प्रदीप मोरे ,हेमंत रामढवे, रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडरे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here