विदर्भातला गुणवंत गझल गायक, संगीतकार- रुद्रकुमार
कला, कौशल्य, गुणवत्ता, ही कुठल्या एका विशिष्ट वर्गापुरती किंवा प्रदेशापुरती मर्यादित असू शकत नाही. महाराष्ट्रात विविध ठिकाणी अतिशय गुणवंत कलाकार आहेत, जे पुण्या-मुंबईच्या तुलनेत रसिकांसमोर पोहोचत नाहीत, परंतू ते आपापल्या परीने आपली कला जोपासत असतात आणि रसिकांना आनंद देत असतात. अश्या विविध कलावंतांना वाचक-रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा 'माध्यम वृत्तसेवाचा' एक प्रयत्न.
विदर्भातील असाच एक गुणवंत गायक-संगीतकार म्हणजे रुद्रकुमार.
घाटंजी जि. यवतमाळ येथील श्री. रुद्रकुमार हे एक उत्तम गझल गायक. आत्तापर्यंत त्यांनी मसूद पटेल, गौरवकुमार आठवले, किरणकुमार माडावी, अबेद शेख, श्रीपाद अपराजित, आनंद देवगडे, व्यंकटेश कुलकर्णी, शरद बुधकर, योगेश देवकर, सुदाम सोनुले, सुनील ठाकूर आणि इतर विविध गझकारांच्या गझला संगीतबद्ध करून रसिकांसमोर विविध मैफिलीतून सादर केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या वर्धा-यवतमाळ येथील स्थानिक वादक, संगीत संयोजकांना सोबत घेऊन ध्वनीमुद्रितही केलेल्या आहेत.
अतिशय गोड आवाज असलेले रुद्रकुमार जेव्हा आपल्या मधाळ आवाजात तल्लीन होऊन गातात तेव्हा ऐकणारा त्यांच्या गायनात हरवून जातो. आत्तापर्यंत खूप छान छान रचना त्यांनी मराठी रसिकांना दिलेल्या आहेत. हैदराबाद येथील गझलकार व्यंकटेश कुलकर्णी यांची एक गझल, ‘मला सांजवेळी’ ऐकताना रुद्रकुमार यांच्या गायन, संगीत कौशल्याची प्रचिती येते.