मराठी चित्रपटसृष्टीतील रुबाबदार, देखणा नायक आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे
जुन्या काळातील अभिनेत्री दुर्गाबाई कामत यांचे पणतू, त्यांच्या कन्या कमलाबाई गोखले यांचे नातू आणि अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र असल्याने विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा घरातूनच लाभला होता. महानंदा, बाळा गाऊ कशी अंगाई, कळत नकळत, वजीर असे मराठी चित्रपट तर कमला, बॅरिस्टर, संकेत मिलनाचा, नकळत सारे घडले अशा अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचं सामर्थ्य दाखवलं.
फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपला असा ठसा उमटवला. भूलभुलैय्या, हम दिल दे चुके सनम, अग्निपथ, मिशन मंगल अशा अनेक चित्रपटांमधूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली. अग्निहोत्र, अल्पविराम, या सुखांनो या अशा मराठी- हिंदी मालिकांमधूनही ते झळकले होते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट-मालिका आणि नाट्यसृष्टीत शोककळा पसरली आहे.
सहज सुंदर अभिनयाचे देणे लाभलेल्या विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
उत्तम अभिनयाची, भारदस्त आवाजाची देणगी लाभलेले प्रतिभाशाली, दमदार व्यक्तिमत्त्व म्हणजे विक्रम गोखले ! मराठी नाटक, सिनेमासोबत हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे अद्वितीय कलाकार विक्रम गोखले यांच्या निधनामुळे कलाक्षेत्राची भरून न निघणारी हानी झाली आहे.
माहेरची साडी, नटसम्राट, भूलभुलैया, मिशन मंगल सारख्या सिनेमातून ते चाहत्यांच्या स्मरणात अजरामर राहतील.
लेखन : जयंती देशमुख