जलसाक्षरता अभियान रँलीचे औशात जोरदार स्वागत
- आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन
- औसा/प्रतिनिधी:कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यात पाण्याअभावी विकास होऊ शकलेला नाही.हा विकास साध्य करून विकासाचे नंदनवन फुलवायचे असेल तर हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळालेच पाहिजे,असे मत आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.
जलसाक्षरता अभियानातील दुचाकी रॅली रविवारी (दि.२४) सकाळी लातूरहून निघाली.दिवस्भरात बुधोडा,हासेगाव,लामजना पाटी,किल्लारी,लामजना गांव,तपसे चिंचोली,
नागरसोगा व औसा येथे दुचाकी रॅली पोहोचली. ठिकठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.निलंगेकर यांनी सांगितले की,भौगोलिक दृष्ट्या मराठवाड्याचे स्थान असे आहे जेथे कायमच कमी पाऊस पडतो.या भागात मोठ्या नद्या नाहीत त्यामुळे सिंचन तर सोडा पण पिण्यासाठीही पाणी मिळत नाही.त्यामुळे उद्योगधंदे या परिसरात येत नाहीत.शेतीला पाणी मिळत नसल्याने अपेक्षित उत्पन्न पदरात पडत नाही. त्यामुळे हा भाग विकासापासून कायमच वंचित राहिला आहे.आता शासनाने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्याचा निर्णय घेतला असून हे पाणी मांजरा व तेरणा खोऱ्यात सोडावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आ.निलंगेकर यांनी सांगितले.
ठिकठिकाणी आ. निलंगेकर यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. गावोगावचे तरुण व नागरिक दुचाकी रॅलीत सहभागी झाले.स्थानिक लोकप्रतिनिधी,गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.
ना राजकारणासाठी ना जातीसाठी….
उपस्थितांशी संवाद साधताना आ.निलंगेकर म्हणाले की,हा लढा राजकारणासाठी किंवा जातीसाठी नाही.मतदार जोडण्यासाठीही नाही तर आपले हक्काचे पाणी मिळावे यासाठी आपण हा लढा सुरू केला आहे. पाणी हा प्रत्येकाचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांसाठी पाणी आवश्यकच आहे.त्यामुळे आपण हा लढा सुरू केला आहे.या माध्यमातून हक्काचे पाणी पदरात पाडून घेऊ,असा आशावाद आ.निलंगेकर यांनी व्यक्त केला.
स्वागत नाही आशीर्वाद…
आ.निलंगेकर म्हणाले की, मी ज्या-ज्या गावी जातो तिथे नागरिक उत्स्फूर्तपणे स्वागत करत आहेत. पुष्पहार घातले जात आहेत.अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. या स्वागताने मी भारावून गेलो आहे.आपण करत असलेले हे स्वागत माझ्यासाठी आशीर्वाद आहेत.आपण उधळण केलेल्या फुलाच्या प्रत्येक पातळीतून उतराई होत हक्काचे पाणी आपल्या दारापर्यंत आणून देण्यासाठी मी वचनबद्ध आहे,असेही ते म्हणाले.
तन मन धनाने सोबत राहू – आ.अभिमन्यू पवार
बुधोडा येथे आ. अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघात जलसाक्षरता रॅलीचे स्वागत केले.यावेळी बोलताना ते म्हणाले की, आ.संभाजीराव पाटील निलंगेकर हे आमचे नेते आहेत.सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी हे अभियान सुरू केले आहे.तन-मन-धनाने, सर्वशक्तीनिशी या अभियानात आम्ही त्यांच्या पाठीशी राहू,अशी ग्वाही आ.अभिमन्यू पवार यांनी यावेळी बोलताना दिली.
शेतकरी पुत्र असल्याने जाणीव
- नानासाहेब जावळे पाटील
आ.संभाजीराव पाटील हे शेतकरी पुत्र आहेत.
त्यामुळेच त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे.या जाणिवेतूनच त्यांनी हे अभियान सुरू केले आहे.
मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यासाठी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.हा प्रश्न सोडवून हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले.
सक्षम नेते – अफसर शेख
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जो जो प्रश्न हाती घेतला तो सोडवून घेतला आहे.
पाण्याचा प्रश्न सोडवून घेण्यासही ते सक्षम आहेत.या नेतृत्वाला आपण पाठबळ दिले पाहिजे,असे ते म्हणाले.