सिनेमा सिनेमा
वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे…
मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे…
‘सावरखेड एक गाव’ मध्ये अजय अतुलच्या गाण्यावर डोलणारा अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा त्याच्या मराठमोळ्या गावात आला आहे….!
आपण आपल्या छोट्याशा गावात लहानाचे मोठे होतो… आणि मग या गावातून झेप घेऊन आणखी मोठ्या शहरात, मोठ्या जगात जातो. तिथे आपली ओळख निर्माण करतो. आपलं गाव आपल्याला दुरूनच पण आस्थेने निरखत असतं…
पुढे काही वर्षांनी आपण आपली ही मोठी ओळख घेऊन गावात येतो तेव्हा गावाला आपला कोण अभिमान वाटतो!
या प्रवासात आपण जसे बदलतो तसं आपलं गावही बदललेलं असतं. ते आता पूर्वीसारखं साधंसुधं नसतं, गावातल्या वाटांचे हमरस्ते झालेले असतात, नदीवरच्या लहान पुलाच्या शेजारी बांधलेल्या मोठ्या पुलावरून मोठमोठ्या गाड्या जात असतात, गावातले तरुणच काय पण सगळेच लहानथोर इंटरनेटच्या या ट्रेंडिंग जमान्यात हायटेक झालेले असतात आणि तरीही गावानं आपलं गावपण आणि सौंदर्य तसंच जपून ठेवलेलं असतं.
आपल्याला दुरून निरखणारं आपलं गाव आता आपल्या अगदी जवळ येतं, आपल्याशी प्रेमाने बोलू लागतं आणि आपण आणि आपलं गाव यांच्यात पुन्हा एकदा एका सुंदर नात्याची गुंफण होते…
मराठी प्रेक्षकांच्या रेशीमगाठी
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता श्रेयस तळपदे आणि मराठी चित्रपटसृष्टी यांच्यात आता अशाच एका नव्या नात्याची सुरुवात झाली आहे. त्याच्या आणि मराठी प्रेक्षकांच्या रेशीमगाठी पुन्हा एकदा नव्याने जुळल्या आहेत.
श्रेयसच्या वाढदिवसाला ‘आपडीथापडी’ च्या सेटवरून त्याने, मुक्ता बर्वेने आणि संदीप पाठकने शेअर केलेल्या पोस्ट पाहिल्या आणि श्रेयस पुन्हा एकदा या आपल्या सुंदर गावात किती रमला आहे याची खात्री पटली.
अभिनेता श्रेयस तळपदे तब्बल 17 वर्षांनी पुन्हा एकदा मराठी टेलिव्हिजनवर आला आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत श्रेयसने साकारलेला जंटलमन यशवर्धन चौधरी पाहिला आणि आपल्या सगळ्यांनाच आभाळमाया, अवंतिका मधला हा लोभस कलाकार पुन्हा भेटल्याचा आनंद झाला.
श्रेयस सांगतो, ‘मला जेव्हा ही गोष्ट सांगण्यात आली तेव्हा ती मला फारच भावली. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर यांच्या मनात या गोष्टीची जी मांडणी होती तीही मला वेगळी वाटली.
‘असं बघा, गोष्टी इथून तिथून सारख्याच असतात पण तुम्ही ती गोष्ट मांडता कशी… हे जास्त महत्त्वाचं असतं.’
‘हो पण ही गोष्ट टीव्ही मालिकेची आहे आणि आत्ता या टप्प्यावर तुम्ही टीव्ही मालिकेची निवड कशीकाय केलीत…?’
श्रेयस तळपदेला हा प्रश्न जवळजवळ सगळ्यांनीच हक्काने विचारून पाहिला आणि त्यावरचं त्याचं उत्तर मला फार आवडलं.
बदलता काळ आणि….
श्रेयस म्हणतो, ‘सिनेमा असो की सीरियल की नाटक…आणि आता वेब सीरिज. प्रेक्षक हे सगळं मोबाइलच्या पडद्यावर बघत असतात. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या या सतत बदलत्या काळात हाच पडदा सगळ्यात महत्त्वाचा झाला आहे आणि तुम्ही सांगू पाहताय ती गोष्ट जर छान असेल तर माध्यम कोणतं आहे हे फारसं महत्त्वाचं ठरत नाही.’
सध्या सोशल मीडियावर, प्रसारमाध्यमांमध्ये श्रेयसच्या आवाजातल्या हिंदी पुष्पा ची चर्चा आहे. ‘पुष्पा नाम सुनके फ्लाॅवर समझी क्या… फायर हूँ मैं… या ढासू डायलॉगवर लहानलहान मुलंही मस्त व्हिडिओ बनवतायत, ते सोशल मीडियीवर ट्रेंड होतायत…
पुष्पा च्या यशानंतर श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने सगळ्यांचे आभार मानलेच पण एक गोष्टही सांगितली.
‘माझ्याकडे जेव्हा काही काम नव्हतं तेव्हा माझ्या एका मित्राने मला डबिंग करायचा सल्ला दिला पण मी जेव्हा त्यासाठी आॅडिशन दिली तेव्हा मला रिजेक्ट करण्यात आलं’, त्याने मोकळेपणाने सांगून टाकलं.
याआधीही त्याने हिंदी लायन किंग मधल्या ‘टिमाॅन’ ला आवाज दिला आहे. एवढंच नव्हे तर या चित्रपटातलं हकुना मटाटा हे गाणंही त्याने गायलं आहे!
‘इक्बाल’ मनात ठसला
‘इक्बाल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायमचा ठसला आहे. ये हौसला कैसे रुके.. ‘डोर’ मधलं गाणंही मनाचा असाच ठाव घेतं आणि त्याने साकारलेला बहुरुपिया आपलं मन जिंकून घेतो. दिग्दर्शक नागेश कुकूनूरसोबत श्रेयसची जोडी जमली आणि याच मैत्रीतून आला त्याचा ‘बाॅम्बे टू बँकाॅक’ हा आणखी एक सुंदर चित्रपट. मला हा चित्रपट थायलंडमधल्या समुद्रकिनाऱ्यांसारखाच मोहक वाटला.
श्याम बेनेगल यांच्या ‘वेलकम टू सज्जनपूर’मध्ये श्रेयस तळपदेने एका छोट्याशा गावातल्या गावकऱ्यांना पत्र लिहून देणाऱ्या लेखकाची भूमिका साकारली आहे. गावातल्या चावडीसारख्या जागेवर त्याचं बस्तान मांडलेलं असतं आणि अख्ख्या गावाची सुखदु:ख जाणून घेत तो त्यांना पत्र लिहून देत असतो..
श्रेयसचा कोणताही चित्रपट बघताना त्याची भूमिकांची निवड आपल्या लक्षात येते. कथानकामध्ये वेगळेपणा असतो, भूमिका हटके असते आणि ती साकारण्याची त्याची शैलीही अगदीच भिन्न असते.
झुळूक …एक मोहक स्पर्श … हा असाच एक आगळावेगळा चित्रपट श्रेयसने केला आहे. ऐश्वर्या नारकर, डाॅ.गिरीश ओक आणि श्रेयसचा हा चित्रपट नात्यांबदद्लचा एक नाजूक संदेश देऊन जातो…
श्रेयसच्या अभिनयाइतक्याच मला आवडतात त्या त्याने दिलेल्या मुलाखती.
‘मी जी व्यक्तिरेखा साकारतो आहे तिची ओळख पहिल्या पाच मिनिटांतच प्रेक्षकांना झाली पाहिजे,’ तो अत्यंत आत्मविश्वासाने म्हणतो.
मराठी, हिंदी, इंग्लिश…मुलाखत कोणत्याही भाषेत असो श्रेयसची संवाद साधण्याची शैली त्याच्यासारखीच खास आहे… जे आहे तसंच्या तसं त्याला मांडता येतं. तो त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलतो, यशाबद्दल जितक्या आस्थेने बोलतो तितक्याच उमदेपणाने काही अपूर्ण गोष्टींबद्दलही बोलतो, त्याचं लहानपण, त्याचं कुटुंब, त्याचे सहकलाकार, त्याच्या अवतीभवतीचं जग, थोरामोठ्यांचे अनुभव, एका कलाकाराचं जगणं, त्याची प्रेमकथा… याबद्दल तो अगदी पारदर्शी सूरात सांगत असतो तेव्हा आपल्या बालपणीचा मित्र भेटल्याचा भास आपल्याला होतो.
वैयक्तिक पातळीवर बोलायचं झालं तर त्याच्या या मुलाखतीतून मला खूप शिकायला मिळालं. यश कसं साजरं करायचं, अपयशातून काही शिकून पुढे कसं जायचं, काही कडूगोड अनुभव आले तर शांतपणे ते समजून घेऊन पुढचा प्रवास कसा करायचा, ज्याला आपण sorted म्हणतो तसा आयुष्याकडे बघण्याचा एक सुष्पष्ट, सुंदर दृष्टिकोन कसा जपायचा हे सगळं मी श्रेयसच्या या मुलाखतींतून शिकले.
बऱ्याच मुलाखतींमध्ये त्याला विचारलं जातं, तुम्हाला आणखी कितीतरी प्रभावी भूमिका मिळाल्या नाहीत याची खंत वाटते का … काहीतरी राहून गेल्याची भावना मनात आहे का…
यावर‘बॉलीवुड हंगामा’ च्या मुलाखतीत सिनेपत्रकार फरीदुन शहरयार यांना त्याने दिलेलं उत्तर खूप विचार करायला लावणारं आहे. श्रेयस म्हणतो, ‘मला माझ्या निर्णयांचा कधीही पश्चाताप होत नाही कारण ते निर्णय माझे आहेत.’
जो काळ सरला आहे त्याबद्दल विचार करत बसलं तर पुढचा निर्मितीचा प्रवास कसा करणार, असंच काहीसं त्याला म्हणायचं असावं.
त्याच्या याच मनस्वीपणामुळे आपल्याला तो जे काही करतो ते आवडतं. कमाल धमाल मालामाल या चित्रपटात तो इश्क की डफली बाजे रे… या गाण्यावर इतका मस्त नाचला आहे की बघत राहावं.. शाहरुख खानसोबत त्याने केलेला ‘ओम शांती ओम’ ही त्याच्या आयुष्यातली खास आठवण आहे..
श्रेयसच्या या कलाकृतींबद्दल, त्याच्या मुलाखतींबद्दल आणि आपल्या सगळ्यांना त्याने इतका जो असीम आनंद दिला आहे त्याबद्दल मला त्याला भेटून सांगावंसं वाटलं, त्याला थँक यू म्हणावंसं वाटलं आणि म्हणूनच त्याच्या वाढदिवसाचं निमित्त साधून मी त्याला भेटायला गेले…
या स्टार कलाकाराला सेटवर पाहिलं तेव्हा जाणवलं, तो त्याच्या natural smile इतकाच natural आहे.
त्याच्यासाठी मी काही पुस्तकं घेऊन गेले होते… त्याला एका दिवसात बरेच आउटडोअर आणि इनडोअर सिक्वेन्स करायचे होते तरीही त्याने उत्सुकतेने मी आणलेलं गिफ्ट रॅप उघडून पाहिलं.
‘ओह. इकिगाई. वाचलंय मी.’ त्याने सहज सांगून टाकलं. मग मी आणखी काही पुस्तकं दिली…
‘तुम्हाला वाचायला वेळ मिळतो का ?’
‘हो. काढतो मी वेळ येताजाता.. श्रेयसने आणखी एका मुलाखातीसाठी तयार होताहोता माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली.
फरीदुनशी गप्पा मारताना, त्याला जेफ्री आर्चर आवडतो हे त्याने सांगितलं होतं. याच मुलाखतीत त्याने फरीदुनला विजय तेंडुलकरांच्या लेखनाबद्दल सांगितलं. ते कसे काळाच्या पुढे होते, तेव्हा कुणी विचारही केला नसता असं कितीतरी त्यांनी कसं लिहून ठेवलं आहे हेही श्रेयसने हिंदी प्रेक्षकांसाठी मुद्दाम सांगितलं तेव्हा मला खूपच छान वाटलं.
कलाकाराचं आयुष्य काय असतं याबद्दल त्याच्या सीनिअर्सनी सांगितलेल्या गोष्टीही तो सांगतो. अभिनेते जाॅनी लिव्हर यांनी अशीच एक गोष्ट सांगितली होती…
यश..अपयश… प्रसिद्धी
सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी एक प्रखर प्रकाशझोत फिरत असतो… हा लाइट कधी एका व्यक्तिरेखेवर असतो तर कधी फिरून दुसऱ्या व्यक्तिरेखेवर जातो.. कलाकाराचं आयुष्य असं आहे. हा प्रकाशझोत कायमच तुमच्यावर असेल असं नाही पण तो फिरून पुन्हा तुमच्यावर येतो तेव्हा तुम्ही काय करता हे जास्त महत्त्वाचं असतं !
श्रेयसच्या मुलाखतीतून मी फक्त सिनेमाबद्दलच नाही तर आयुष्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी ऐकल्या… यश, अपयश, प्रसिद्धी, याहीपलीकडचं कलाकराचं जगणं, स्वत:सोबत केलेला निर्मितीचा प्रवास या सगळ्याबद्दलचे त्याचे अनुभव विलक्षण आहेत. या मनस्वी कलाकाराच्या अनुभवांमधून सर्जनशील माणसालाच नव्हे तर प्रत्येकालाच खूप काही घेण्यासारखं आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून श्रेयस रोजच आपल्याला भेटत असतो पण आता त्याचे काही नवे सिनेमे येऊ घातले आहेत. चित्रपटसृष्टीबद्दल लिहिणारे अमोल उदगीरकर म्हणतात तसं श्रेयसकडून आणखी एक इक्बाल, आणखी एक डोर पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
नुकताच मी श्रेयसने अँकर केलेला Mindwars नावाचा एक Quiz show पाहिला. शाळकरी विद्यार्थ्यांसोबतच्या या गेम शो ला श्रेयसने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
श्रेयस मुलांशी त्याच्या अस्खलित इंग्रजी, हिंदीमध्ये संवाद साधतो. या शोमध्ये प्रश्न विचारता विचारता तो त्याचे ‘नाॅनसेन्स जोक्स’ सांगतो, मस्ती करतो आणि मनोज तिवारीच्या गाण्यावर नाचतोसुद्धा!
याच शो मध्ये त्याने त्याच्या वडिलांची एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली. श्रेयस सांगतो, लहानपणी सुटीच्या दिवशी आम्ही माझ्या आजीआजोबांकडे जायचो. त्यांच्या घराच्या शेजारी एक बस स्टॉप होता आणि बसची वाट बघताना एक खेळण्यांचं दुकान दिसत राहायचं. मला तिथला एक क्रिकेट गेम खूपच आवडला होता. मी नेहमी बाबांकडे हट्ट करायचो.. तो गेम किती महाग होता हे बाबांना माहीत होतं…
एकदा मी फारच हट्ट केला… बाबा मला घरी घेऊन आले आणि त्यांनी स्वत:च्या हातांनी तसाच एक गेम बनवला आणि तुम्हाला माहितीय का… तो गेम त्या दुकानातल्या क्रिकेट गेमपेक्षा कितीतरी पटीने सरस होता….!
मुलांना ही गोष्ट सांगताना अँकर श्रेयस तळपदेचा आवाज कातर झाला… डोळे पाणावले… काही काळ सगळंच स्तब्ध झालं. स्पर्धकांपैकी एका मुलीने श्रेयसला त्यांच्याकडे बोलवलं आणि सगळ्यांनी मिळून त्याला एक घट्ट मिठी मारली… शो पुन्हा सुरू झाला…
मराठमोळा श्रेयस
मराठमोळा श्रेयस जेव्हा अस्खलित इंग्रजी आणि खास लहेजा असलेल्या हिंदीत बोलतो तेव्हा मला त्याच्या भाषाकौशल्याची कमाल वाटते. त्याने इंग्रजी नाटकांमध्येही काम केलं आहे आणि त्याचा आवडता विषय आहे, संस्कृत.
लाॅकडाउननंतर आता रंगभूमीच्या कलाकारांसाठी श्रेयसने 9 Rasa हे अॅप सुरू केलं आहे. अशा प्रकारे थिएटरसाठी सुरू केलेला हा पहिलाच OTT मंच आहे. रंगभूमी आणि Performig Arts मधल्या कलाकारांना आॅनलाइन विश्वात एक हक्काचा मंच मिळावा, असा उद्देश यामागे आहे.
माझे सहकलाकार, मित्र आणि मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या सगळ्यांशीच माझा ऋणानुबंध आहे. या निमित्ताने रंगभूमीसाठी काहीतरी करता येतंय याचाही आनंद वाटतो, असं श्रेयस सांगतो.
‘मी शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय करत राहीन..’ एका मुलाखतीत तो म्हणाला होता.
‘आपण तेच करतो जे आपण सगळ्यात जास्त Enjoy करतो,’ त्याचं हेही वाक्य मला मनोमन पटलं आणि श्रेयसच्या ‘इक्बाल’ सारखाच त्याच्याशी झालेला हा संवाद मला खूपच ऊर्जा देऊन गेला…
लेखन: आरती कुलकर्णी